द्वारका चौकात चार तास ‘रास्ता रोको’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

नाशिक - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर आज नाशिक शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. द्वारका भागात नेत्यांना न जुमानता कार्यकर्त्यांनी चार तास ‘रास्ता रोको’ केला. सातपूरलाही महिला कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ करत लक्ष वेधले. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर शाळेत विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती होती. पदाधिकारी व कार्यकर्त्यांत निषेध रॅलीवरून एकमत न झाल्याने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला न जुमानता स्वतंत्रपणे येऊन घोषणाबाजी केली.

नाशिक - कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर आज नाशिक शहरात पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. द्वारका भागात नेत्यांना न जुमानता कार्यकर्त्यांनी चार तास ‘रास्ता रोको’ केला. सातपूरलाही महिला कार्यकर्त्यांनी ‘रास्ता रोको’ करत लक्ष वेधले. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर शाळेत विद्यार्थ्यांची अल्प उपस्थिती होती. पदाधिकारी व कार्यकर्त्यांत निषेध रॅलीवरून एकमत न झाल्याने कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या आवाहनाला न जुमानता स्वतंत्रपणे येऊन घोषणाबाजी केली.

कोरेगाव भीमा घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज नाशिक जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी अकराला शिवाजी रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निषेध रॅली काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली. प्रत्येकजण घोषणा देऊ लागला. पदाधिकाऱ्यांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत काही कार्यकर्ते नव्हते. एक गट द्वारकाकडे आगेकूच करू लागला. मात्र, पोलिसांनी त्यांना शालिमार चौकातच अडविले.

गुन्हेगारांना शासन करण्याची मागणी
आंबेडकर पुतळ्याजवळ जमा झालेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या.  गुन्हेगारांना कठोर शासन झालेच पाहिजे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. कार्यकर्ते विखुरले गेल्याने सभा, रॅली झालीच नाही.

द्वारका चौकात चार तास आंदोलन; दोघे ताब्यात
जुने नाशिक - नाशिक- पुणे महामार्गावरील द्वारका चौकात  चार तासांच्या ‘रास्ता रोको’नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, परतीच्या मार्गावरील कार्यकर्त्यांनी परतताना पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने पोलिसांची धावपळ झाली. पण पोलिसांच्या संयमी भूमिकेमुळे अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, गाड्यांच्या नुकसानप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ‘रास्ता रोको’ची माहिती मिळताच पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक निरीक्षक डॉ. राजू भूजबळ, भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील नंदवाळकर, इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी द्वारका चौकात धाव घेत चोख बंदोबस्त तैनात केला. राज्य राखीव दलाच्या तुकडीने या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली.

उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत
द्वारका चौकात ‘रास्ता रोको’मुळे या मार्गावरील वाहतूक बायपास मार्गाने मुंबई, मालेगाव, नाशिककडे वळविण्यात आली. तर उड्डाणपुलावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पुलावर जाणारे रस्ते बॅरिकेड्‌सने बंद करण्यात आले. पाथर्डी फाटा, इंदिरानगर बोगदा, औरंगाबाद नाका, नांदूर नाका हे बायपासचे मार्ग सुरू ठेवण्यात आले होते. 

ट्रॅव्हल्स बसगाड्यांना फटका
खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील अडीचशे बसही काल (ता. २) रात्रीपासून जागीच थांबून राहिल्या आहेत. बंद आंदोलनात विनाकारण नुकसान होण्यापेक्षा आहे, त्या सुरक्षित ठिकाणीच थांबून राहा, अशा सूचना टुरिस्ट कंपन्यांच्या मालकांनी दिल्याने नाशिकच्या अडीचशे बस आज धावू शकल्या नाहीत. २५ लाखांचा फटका या व्यवसायास सहन करावा लागला.

पंचवटीत अघोषित संचारबंदी
पंचवटी - पंचवटीतील सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या पेठ रोडवर सकाळपासूनच तणाव होता. येथे पोलस तैनात होते. नववर्षानिमित्त काळाराम, कपालेश्‍वरासह अन्य मंदिरे गर्दीने गजबजून गेली होती. पण कालच्या घटनेमुळे आज सर्व महत्त्वाच्या मंदिरांसह तपोवनातही शुकशुकाट होता. शहरात आलेल्या अनेक भाविकांनी हॉटेल, धर्मशाळांमध्येच थांबणे पसंत केले. काळाराम मंदिर पूर्व दरवाजाजवळही अघोषित संचारबंदीसारखे 
वातावरण होते.

सर्वपक्षीय संघटनांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
डॉ. आंबेडकरी सर्वपक्षीय संघटना नाशिक जिल्हा यांच्यातर्फे माजी महापौर अशोक दिवे, मदन शिंदे, दीपचंद दोंदे, अरुण काळे, राहुल तुपलोंढे, प्रकाश पगारे, किशोर घाटे, विशाल साळवे, दीपक नन्नावरे, सुनील गागुर्डे, मुकुंद गागुर्डे, संजय साबळे, रमेश म्हस्के, दीपक डोके, संदीप काकळीज आदींनी निवेदन दिले. कोरेगाव भीमाची घटना अतिशय अमानुष आहे.

समाजकंटकांना अटक करून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा. या घटनेकडे पाहता तो पूर्वनियोजित धर्मांध शक्‍तींचा कट दिसत आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. संजय खैरनार, भरत जाधव, विवेक गायकवाड, डॉ. संजय जाधव, राजू देसले, विजय पाटील, बॉबी काळे आदी उपस्थित होते.

पंचवटी, फुलेनगर, रामवाडी, जेल रोड,मल्हारखान,सातपूर, सिडको भागांत शुकशुकाट 
चौकाचौकांत कार्यकर्त्यांचा जमाव 
जमाव पांगविण्यासाठी पोलिसांची प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा 
मुख्य रस्त्यावर रोजच्यापेक्षा कमी वर्दळ 
कार्यकर्त्यांची दुकाने बंद करण्यासाठी घोषणाबाजी 
गुन्हेगारांना शासन झालेच पाहिजे, कार्यकर्त्यांची मागणी 
दूध वाहतुकीवर परिणाम न झाल्याने दुधाचा पुरवठा सुरळीत 
बुधवारच्या आठवडे बाजाराला मोठ्या प्रमाणावर झळ बसली 
इंदिरानगर भागातील वडाळा गावातील राजवाड्यात निषेध
 

सातपूरला ‘रास्ता रोको’, लुटमार अन्‌ मारहाणही
सातपूर - या बंदमध्ये सातपूरकरांनी सहभाग नोंदवत व्यवसाय बंद ठेवले. राजवाडा परिसरातील महिला व कार्यकर्त्यांनी त्र्यंबक मार्गावर ‘रस्ता रोको’ करत घोषणाबाजी केली. या वेळी पोलिसांनी संयमी भूमिका घेऊन आंदोलन हाताळले. पण काही समाजकंटकांनी रात्री कामावरून घरी जाणाऱ्या कामगारांना मारहाण करत लुटमार केली.  

नागसेननगर, राजवाड्यात पुन्हा ‘रास्ता रोको’
जुने नाशिक - द्वारका चौकातील चार तासांच्या आंदोलनानंतर आंदोलनकर्ते माघारी फिरल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला खरा. पण काही मिनिटांत मोठा राजवाडा व नागसेननगर येथील रहिवाशांनी वडाळा नाका येथील रस्त्यावर ठिय्या मांडून ‘रास्ता रोको’ केला. पोलिसांची पुन्हा धावपळ उडाली. कासावीस झालेल्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दम भरताच माजी नगरसेवक संजय साबळे यांनी आंदोलनकर्त्यांना माघारी केले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: nashik news dwaraka chowk rasta roko by bhima koregaon riot