वाट चुकलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न

सतीश निकुंभ
रविवार, 2 जुलै 2017

नाशिक जिल्ह्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या, तसेच राज्यात नावाजलेली वसाहत म्हणून सातपूर औद्योगिक वसाहत ओळखली जाते. सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या सातपूर गावालगत औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर कामगार लोकवस्ती वाढली आहे. आजमितीस सातपूर, सातपूर कॉलनी या परिसराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांवर पोचली आहे. कामगारबहुल असलेल्या या गावात दहावी-बारावीनंतरचे शिक्षण संकुल नसल्याने सर्वांचीच अडचण होत आहे. वाट चुकलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सातपूरकर करत आहेत. फक्त पुढील शिक्षणासाठी या मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते.

नाशिक जिल्ह्याची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या, तसेच राज्यात नावाजलेली वसाहत म्हणून सातपूर औद्योगिक वसाहत ओळखली जाते. सुमारे पाच हजार लोकवस्तीच्या या सातपूर गावालगत औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणावर कामगार लोकवस्ती वाढली आहे. आजमितीस सातपूर, सातपूर कॉलनी या परिसराची लोकसंख्या जवळपास साडेतीन लाखांवर पोचली आहे. कामगारबहुल असलेल्या या गावात दहावी-बारावीनंतरचे शिक्षण संकुल नसल्याने सर्वांचीच अडचण होत आहे. वाट चुकलेल्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सातपूरकर करत आहेत. फक्त पुढील शिक्षणासाठी या मुलांना शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे ही सुविधा स्थानिक ठिकाणी उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सातपूरसह गावठाण भागाचा मोठा विकास झपाट्याने झाला आहे. या कामगार लोकवस्तीत अनेक राज्यांतील कामगार स्थिरावले आहेत. कामगारांच्या भावी पिढीसाठी मात्र सातपूरमधील मविप्र संस्थेचे जनता विद्यालय व महाविद्यालय सोडले, तर दुसरी अशी नावाजलेली शैक्षणिक संस्था या भागात कार्यरत नाही. सातपूर गावानजीकचा भाग हा झोपडपट्टीच्या विळख्यात आहे. येथील पालक आपल्या पाल्याला स्थानिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. त्यामुळे या भागातील सुमारे ७० टक्के मुले-मुली  शहराकडे धाव घेतात. त्यात मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याने रोजंदारी कामगारांच्या मुलांना इच्छा असून, दहावी-बारावीनंतरचे शिक्षण घेता येत नाही. या परिसरातील मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पोलिस ठाण्यातील नोंदीवरून दिसते.

सातपूर, स्वारबाबानगर, सातपूर कॉलनी, मळे परिसर, अशोकनगर, श्रमिकनगर यांसह पाच मोठ्या झोपडपट्ट्यांमधील हजारो मुलांसाठी महापालिकेचे स्वारबाबानगर, सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळा, अशोकनगर येथील मीनाताई ठाकरे विद्यालय आहे या शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम चालते. या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्याही बऱ्यापैकी आहे. मराठी, हिंदी, सेमी इंग्रजी या शाळांमधून कामगारांच्या मुलांना शिक्षण दिले जाते. पण या शाळेत आठवीपर्यंतच वर्ग असल्याने आठवीनंतर हिरे विद्यालय, प्रगती विद्यालय, छत्रपती विद्यालय, मॉडर्न एज्युकेशन, श्रमिकनगर येथील हिंदी विद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. या शाळेत प्रवेश घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यातही ज्यांना प्रवेश मिळाला नाही त्यांना नाइलाजाने नाशिकमधील शाळेत जावे लागते. त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. विद्यार्थ्यांची ही गैरसोय दूर करण्यासाठी सातपूर व गावठाण भागात मोठे शैक्षणिक संकुल उभारावे, अशी मागणी सातपूरकर करत आहेत.

विद्यार्थ्यांमधील मूळ पाया मजबूत केला पाहिजे, त्यासाठी सातपूरमधील एकमेव जनता महाविद्यालय प्रयत्न करीत आहे. संस्थेने मोठ्या प्रमाणावर महाविद्यालयांतर्गत सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गेल्या दोन-तीन वर्षांत बदलला आहे. विद्यार्थिसंख्या वाढत आहे, पण तुकड्या मर्यादित आहेत. त्यामुळे सर्वांनाच प्रवेश देणे शक्‍य नाही.
-प्राचार्य ए. ई. ठोके, जनता महाविद्यालय, सातपूर

सातपूर या कामगार वस्तीत अनेक वर्षांपासून मोठ्या शैक्षणिक संकुलाची उभारणी न झाल्याने मुलांना इच्छा असूनही पुढील शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे हजारो मुले आयटीआयकडे वळतात. त्या ठिकाणीही आता शैक्षणिक गुणवत्ता वाढल्याने पुढील शिक्षणासाठी फरफट होते.
-दिगंबर निगळ, ग्रामस्थ

सर्व सोयींनीयुक्त शैक्षणिक संकुल या भागात होणे काळाची गरज आहे. त्यासाठी शासनाने तसेच खासगी संस्थांनी पुढे यायला हवे असे वाटते. सातपूर परिसरात विविध अभ्यासक्रमांची दारे खुली व्हायला हवीत.
-अमोल निगळ, विद्यार्थी

Web Title: nashik news education satpur