शैक्षणिक शुल्कासाठी गहाण मंगळसूत्र सोडविले शिक्षकांनी 

अरुण मलाणी
मंगळवार, 18 जुलै 2017

नाशिक - घरात अठराविश्‍वे दारिद्य्र... शिक्षक होण्याचे लहानपणापासून स्वप्न... ते साकारण्यासाठी जिद्द... शिक्षक होण्याच्या अंतिम टप्प्यात शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने चक्क "आई'चे मंगळसूत्र गहाण ठेवले... ही वार्ता शिक्षकांच्या कानी पडताच त्यांनी स्वतः खिशातील पैसे टाकत ते मंगळसूत्र सोडविले. एवढेच नव्हे, तर त्याच्या पुढील शैक्षणिक शुल्काचीही जबाबदारी उचलली. हा प्रसंग घडला तो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ऍड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या भावी शिक्षक सुरेश खांडवी या आदिवासी तरुणासंदर्भात. 

जांभूळमाथा (ता. मोखाडा) हे दुर्गम भागात वसलेले गाव. गावात शिक्षितांचे प्रमाण अत्यल्प. शालेय जीवनात शिक्षक होण्याच्या जिद्दीतून येथील सुरेश काशीनाथ खांडवी या युवकाने गेल्या वर्षी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या ऍड. विठ्ठलराव हांडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात बी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. त्याचे आई-वडील अशिक्षित, पण मुलाला खूप शिकवायचे हा त्यांचा आधीपासून ध्यास राहिला. पहिल्या वर्षाचे शुल्क कसेबसे भरून सुरेशने शिक्षण घेतले, पण दुसऱ्या वर्षासाठीचे शुल्क भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. केवळ शुल्क नाही म्हणून अभ्यासात हुशार सुरेशला शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली होती. या संदर्भात त्याने कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून त्याद्वारे शुल्क भर, असा वडिलांनी सल्ला दिला. परिस्थितीसमोर लाचार सुरेशने वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मंगळसूत्र गहाण ठेवत महाविद्यालयात शुल्क भरले. याबाबतची माहिती प्राचार्य डॉ. बोरसे यांना समजली. त्यांनी तातडीने महाविद्यालयातील प्राध्यापकांना मदतीचे आवाहन केले. या वेळी जमलेली रक्‍कम सुरेशकडे सुपूर्द करत त्याच्या आईचे मंगळसूत्र सोडविले. 

कमवा व शिका योजनेतून सहकार्य 
पाड्यापासून पाच किलोमीटर चालत सुरेश बसस्थानकावर येतो. तेथून बसने नाशिकला शिक्षणासाठी येतो. त्याचा प्रवासाचा खर्च सुटावा यासाठी महाविद्यालयातर्फे कमवा व शिका योजनेतून त्याला तासिका देत सहकार्य केले आहे. त्यामुळे त्याला शिक्षण सुरू ठेवणे शक्‍य झाले आहे. 

सुरेशने जिंकले सर्वांचे मन 
पैशाची नितांत गरज असलेल्या सुरेशच्या छोट्याशा कृतीने सर्वांची मने जिंकली आहेत. शुल्कासाठी पैशाची जमवाजमव करत असलेल्या सुरेशला एकदा महाविद्यालय प्रांगणात सोन्याची साखळी सापडली. त्याने प्रामाणिकपणे ती प्राचार्यांकडे नेऊन दिली. महाविद्यालयातीलच एका विद्यार्थिनीला सुरेशच्या प्रामाणिकपणामुळे महागडी सोन्याची साखळी परत मिळू शकली. हलाखीच्या परिस्थितीतही सुरेशने दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले. 

शालेय जीवनापासूनच शिक्षक होण्याची इच्छा होती. आतापर्यंत कुटुंबीयांनी सहकार्य केले. सोबत महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापकांनीही कुटुंबातील सदस्याप्रमाणे मला सांभाळून घेतले. शिक्षक होऊन चांगली पिढी घडविण्याची इच्छा आहे. 
- सुरेश खांडवी, विद्यार्थी 

चांगल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी महाविद्यालय सदैव उभे असते. सुरेशची स्थिती लक्षात आल्यानंतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यास मदत उपलब्ध करून देता आली. यापुढेही त्याला सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. 
- डॉ. चंद्रकांत बोरसे, प्राचार्य 

Web Title: nashik news education teacher