विलंबामुळे उमेदवार परीक्षेला मुकले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

नाशिक - परीक्षा केंद्रावर पोचण्यास काही मिनिटांचा विलंब झाल्याने उमेदवारांना परीक्षेला आयोजकांनी बसू दिले नाही. त्यामुळे त्यांना परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागले. उमेदवारांनी अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी मागणी करताच टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

नाशिक - परीक्षा केंद्रावर पोचण्यास काही मिनिटांचा विलंब झाल्याने उमेदवारांना परीक्षेला आयोजकांनी बसू दिले नाही. त्यामुळे त्यांना परिवहन महामंडळाच्या ऑनलाइन परीक्षेला मुकावे लागले. उमेदवारांनी अधिकाऱ्यांकडे न्यायासाठी मागणी करताच टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे आज (ता. ८) लिपिक पदांसाठी नाशिक येथे ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. अडीच हजार जागांसाठी राज्यातून सुमारे १ लाख ७५ हजार विद्यार्थी यासाठी पात्र ठरले होते. ऑनलाइन परीक्षेसाठी शहरातील काही केंद्रावर आसन व्यवस्था केली होती. राज्यातील जालना, जळगाव, नागपूर अशा विविध जिल्ह्यांमधून उमेदवार नाशिक येथे परीक्षेसाठी दाखल झाले होते. सकाळी नऊला परीक्षेची वेळ होती. सर्व उमेदवारांना सुमारे दीड तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. केरळ येथील खासगी संस्थेमार्फत या परीक्षेची व्यवस्था केली होती.

राजीवनगर येथील डे केअर सेंटर येथे सुमारे दीडशे उमेदवारांची आसनव्यवस्था केली होती. मात्र, सकाळीच दूरवरून आलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर पोचण्यासाठी काही मिनिटांचा विलंब झाला असता प्रवेशद्वारावरच अडवून ठेवत त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. उमेदवारांनी परीक्षेला बसू देण्याची विनंती केली असता त्यांच्यावर अरेरावी करण्यात आली. पोलिसांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला मात्र त्याचा काही परिणाम न झाल्याने अखेर या उमेदवारांना परीक्षेला मुकावे लागले. दीडशेपैकी सुमारे ४० ते ५० उमेदवारांना हताश होऊन माघारी परतावे लागले. 

या उमेदवारांनी थेट विभागीय कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला; परंतु सर्व वरिष्ठ हे बैठकीसाठी मुंबई येथे गेल्याने त्यांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. काही अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला.

Web Title: nashik news exam