'समृद्धी'विरोधी संघर्ष समितीकडून जमिनीच्या दरपत्रकाची होळी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

सोनारी व सोनांबे येथे आज सकाळी "समृद्धी'बाधित शेतकऱ्यांनी जमिनीच्या दरपत्रकाची होळी करून शासनाचा निषेध केला. नाशिकला झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत शासनाने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत निषेध करण्यात आला.

नाशिक : प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील जमिनींचे दर जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानंतर आज सोनारी, सोनांबे, शिवडेसह इगतपुरी व सिन्नर तालुक्‍यातील गावांमधून प्रतिक्रिया उमटल्या. सोनारी व सोनांबे येथे शेतकऱ्यांनी जमिनीच्या दरपत्रकांची होळी करून निषेध केला. दरम्यान, दुपारी नाशिक येथे किसान सभेच्या कार्यालयात समृद्धी महामार्गविरोधी संघर्ष समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दरपत्रकाची होळी करून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.

सोनारी व सोनांबे येथे आज सकाळी "समृद्धी'बाधित शेतकऱ्यांनी जमिनीच्या दरपत्रकाची होळी करून शासनाचा निषेध केला. नाशिकला झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत शासनाने जाहीर केलेले दर हे शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा सरकार प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत निषेध करण्यात आला. जाहीर केलेले दरपत्रक बाजारभावाप्रमाणे नाही. 40 ते 60 लाख हेक्‍टरी देत असताना ही रक्कम एकत्र कुटुंबपद्धतीत काहीही उपयोगाची नाही. शेतकऱ्यांचा रोजगार, त्यांची उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे.

त्यांची नाळ जमिनीशी जोडलेली आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा शासनाचा डाव उधळून लावण्याचा या वेळी निर्धार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातून 31 याचिका उच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत; तसेच शासनाने पर्यायी मार्गाचा विचार करावा अन्यथा शेतकरी सामुदायिक आत्महत्या करतील, असा इशारा बैठकीत शेतकऱ्यांनी दिला. 

Web Title: Nashik news farmer against Samruddhi highway