बाजार समित्यांना दिवसाला  बसणार २६ कोटींची झळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

नाशिक - शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असल्याने आज (ता. १)पासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील दिवसाची २६ कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. संपाच्या काळात शेतमाल विक्रीसाठी न आणण्याच्या मुद्द्यावर शेतकरी ठाम असल्याने दीड लाख क्विंटल फळे-भाजीपाल्याची, तर ५० हजार क्विंटल भुसारची दररोजची आवक थांबणार आहे. व्यापारी-कामगार संप करतात; मग आम्ही संप करायला हवा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने बाजार समित्यांपुढे शेतीमालाची प्रतीक्षा करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही.

नाशिक - शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असल्याने आज (ता. १)पासून जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील दिवसाची २६ कोटींची उलाढाल ठप्प होणार आहे. संपाच्या काळात शेतमाल विक्रीसाठी न आणण्याच्या मुद्द्यावर शेतकरी ठाम असल्याने दीड लाख क्विंटल फळे-भाजीपाल्याची, तर ५० हजार क्विंटल भुसारची दररोजची आवक थांबणार आहे. व्यापारी-कामगार संप करतात; मग आम्ही संप करायला हवा, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतल्याने बाजार समित्यांपुढे शेतीमालाची प्रतीक्षा करण्याखेरीज पर्याय उरलेला नाही.

आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव, पिंपळगाव बसवंतसह नाशिक, चांदवड, दिंरोडी, देवळा, येवला, मनमाड, नांदगाव, मालेगाव, सटाणा, सिन्नर, सुरगाणा, नामपूर, उमराणे, घोटी, कळवण या बाजार समित्यांमधून वर्षभरात भुसारसह फळे-भाजीपाल्याची वर्षभरात पाच हजार ३०० कोटींची उलाढाल होते. ३० लाख ५८ हजार ४६८ टन फळे-भाजीपाल्याची, तर आठ लाख ३५ हजार ५७४ टन भुसारचा त्यात समावेश असतो.

आर्थिक वर्षात ४१७ कोटींची शेतमाल विक्री
लासलगाव बाजार समितीमध्ये २०१६-१७ मध्ये भुईमूग शेंग, सोयाबीन, सूर्यफूल, गहू, बाजरी, ज्वारी, कांदा, मूग, हरभरा, मठ, तूर, मेथी, उडीद, करडई, तीळ, राई, एरंडी, कुळीद, चिंच, तांदूळ, मका, राजगिरा, धने, वाटाणा, चवळी, शेपा, भगर, खुरासणी, रिठा, करंजीसह कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, कांदापात, काकडी, वाटाणा, वाल, घेवडा, भोपळा, वांगी, भेंडी, कारली, मिरची, डांगर, बीट, लसूण, दोडके, गिलके, टोमॅटो, गवार, लिंबू, मुळा, गाजर, शेवगा, कोबी, फ्लॉवर आणि द्राक्षे, डाळिंब, पेरू, कैरी, आंबा, आले, पपई, झेंडू, बोर, जांभूळ असा एकूण पाच लाख ३८ हजार ८५ टन शेतमाल शेतकऱ्यांनी विक्रीस आणला होता. या शेतमालाची किंमत ४१७ कोटी ७८ लाख २४ हजार २२२ रुपये इतकी झाली होती.

‘करार शेती’वाले शेतकरी  इच्छा असूनही संपापासून दूर
शेतकऱ्यांच्या उद्याच्या संपात काय भूमिका घ्यावी, याबाबत करार शेती करणारे शेतकरी संभ्रमात आहेत. संबंधित कंपनीशी केलेल्या करारानुसार कुठल्याही सबळ कारणाशिवाय शेतीमाल पुरवणे बंद करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील हजार हेक्‍टरवरील करार शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपातील सहभागाविषयी अनिश्‍चितता कायम आहे.जिल्ह्यातील शेतकरी प्रक्रिया उद्योग किंवा निर्यातदार कंपन्यांशी करार करून त्यांना वर्षभर ठराविक दराने शेतीमाल पुरवतात. जिल्ह्यात भेंडी, भोपळा, कारले, सिमला मिरची, टोमॅटोची साधारण एक हजार हेक्‍टरवर करार शेती केली जाते. या शेतीमध्ये उत्पादकाला बाजारभावाची चिंता नसते. केवळ दर्जेदार व अधिकाधिक उत्पादन यावरच त्याला लक्ष द्यावे लागते. या करार शेतीत संबंधित कंपनी व शेतकरी यांच्यात करार होऊन त्यामध्ये ठरलेला शेतीमाल व त्याचे प्रमाण किती प्रमाणात द्यायचे, हेही ठरलेले असते. 

दूध पुरवठा कोलमडणार  
नाशिकला स्थानिक गोठेधारकांशिवाय नाशिक, सिन्नर, निफाड, दिंडोरी व इगतपुरी या तालुक्‍यांमधूनही दूधपुरवठा होतो. याबरोबरच संगमनेर, कोपरगाव व चाळीसगाव या तालुक्‍यांमधून बंद पिशवीतील दूधही मोठ्या प्रमाणावर येते. नाशिकची दुधाची रोजची गरज साधारण चार लाख लिटर असून शहरातील गोठ्यांमधून ८० हजार लिटर दुधाची गरज भागवली जाते. उर्वरित दुधासाठी जिल्ह्यातून व जिल्ह्याबाहेरील डेअरींवर अवलंबून राहावे लागते.

हॉटेलमधील मेनू बदलणार
शेतकरी संपाचा शहरातील हॉटेल व्यवसायिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. शेतकरी संपामुळे हॉटेल व्यवसायिकांना आता मेनूमध्ये बदल करावा लागणार असून, संपाची तयारी म्हणून हॉटेल व्यवसायिकांनी किमान तीन ते चार दिवस पुरेल इतका भाजीपाला साठविण्यास सुरवात केली आहे. शेतकरी उद्या (ता. १)पासून संपावर जाणार असून, त्याला संपूर्ण राज्यातून मोठा पाठिंबाही मिळत आहे. नाशिक शहरात भाजीपाला, दूध यांचा तुटवडा जाणवणार असून, या संपाचा मोठा फटका शहरातील हॉटेल व्यवसायिकाना बसणार आहे. संपकाळात हॉटेल सुरू ठेवण्यासाठी हॉटेल व्यवस्थापनाकडून आजपासूनच किमान तीन ते चार दिवस पुरेल इतका भाजीपाला कोल्ड स्टोअरेज रूममध्ये साठविला जात असून, मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी केला जात आहे. 

आम्ही किमान दोन ते तीन दिवस पुरेल इतका भाजीपाला साठवून ठेवण्यास सुरवात केली आहे. जर संप सुरूच राहिला तर हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आमच्यावर येऊ शकते.
- रितेश ठाकूर (हॉटेल बॉब विवांत) 

आगाऊ भाजीपाल्यांची मागणी करून साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना रोजच्या थाळीत आम्ही ताज्या भाज्या पुरवू शकणार नसल्याने आम्हाला मेनूतही बदल करावा लागेल. 
- सुमेध दांडेकर (संचालक, हॉटेल हेरंब)

महाराष्ट्राने आजपर्यंत गोदी, माथाडी, कापडगिरणी, शासकीय कर्मचारी, डॉक्‍टर, प्राध्यापक, परिचारिका, वाहतूकदार, कंपनी कामगारांचे विविध संप अनुभवले. कापडगिरणी कामगारांचा संप मुंबापुरीत प्रदीर्घ काळ चालला. आता राज्यातील फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासून संपाचे हत्यार पहिल्यांदाच उपसत यंदाच्या हंगामात शेती करायचीच नाही आणि शेतमालही विकायला आणायचाच नाही, असा ठाम निश्‍चय केला. गोदी आणि कापडगिरणी कामगारांप्रमाणेच हा संप ऐतिहासिक ठरण्याची चिन्हे आहेत.

इगतपुरी
इगतपुरीच्या तांदूळ बाजारपेठेला झळ
इगतपुरी तालुक्‍यातील घोटी हे १२० गावांचे मध्यवर्ती ठिकाण व मुख्य बाजारपेठ असून, शेतीमालाबरोबर परराज्यांत घोटीहून इंद्रायणी, सोनम, बासमती, गरी, कोळपी, कर्जतथाळी व गुजरातथाळी तांदळाचे वाण, गावरान फळे सुरत, अहमदाबाद, मुंबई, कल्याण, ठाणे व इतर शहरात पाठविले जातात. संपामुळे तांदळाचा पुरवठा होणार नसल्याने सुमारे ३५ लाखांचा व्यवहार ठप्प होईल. शहराला नांदगाव, तळेगाव, फांगुळगाव, पारदेवी, त्रिंगलवाडी, बलायदुरी, बोरटेंभा आदी ठिकाणांहून दहा हजार लिटर दूधपुरवठा होतो. संपामुळे चार लाखांचे नुकसान होणार आहे. भाजीपाल्याची दोन लाखांची उलाढाल थांबेल.  सिन्नर तालुक्‍यातील १३५ गावांमधून येणारा भाजीपाला व दूध महागेल.

सरकारकडून शेतकऱ्यांची घोर फसवणूक झाली आहे. संपामुळे कोट्यवधीचे आर्थिक नुकसान होईल. यामुळे सरकारने योग्य निर्णय घ्यावा.
- पांडुरंगमामा शिंदे, शेतकरी नेते 

सिन्नर
दररोज लाखोंचा फटका

सिन्नरच्या आजूबाजूच्या खेड्यापाड्यांतून भेंडी, पालक, शेपू, सिमला, गवार या भाज्यांची सिन्नरच्या चौदा चौकातील मंडईत विक्री होते. बागायती शेतकरी आपल्या पिक-अपने भाजीपाला व अन्य शेतमाल नाशिकच्या बाजारात विक्रीला नेतात. त्याची उलाढाल लाखोंच्या घरात आहे. सध्या आंब्याचा हंगाम असल्याने बरेच शेतकरी लोणच्याची कैरी बाजारात विक्रीला आणतात. संपामुळे सिन्नरकरांना आंबा मिळणार नाही.  सर्वांत मोठे हाल मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचे होणार आहेत. पांगरी, पाथरे, सरदवाडी, सोनांबे, डुबेरे या गावांतून दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. हे दूध डेअरीला विकले जाते. तरी बऱ्याचअंशी शहरात घरगुती पुरवठा होतो. एकट्या पाथरे गावातूनच दररोज पाच हजार लिटर दुधाची आवक होते. नगर जिल्ह्यातील गोदावरी दूध संघ, आर्या दूध, सिन्नर दूध या डेअऱ्यांना दुधाचा पुरवठा केला जातो. 

गावातील दूध मागासवर्गाला मोफत देऊ. उर्वरित दुधाचा खवा तयार करून ठेवणार, पण गावातील एकाही हॉटेलला दूध विकणार नाही. संपात सहभागी होऊन भाजीपाला विक्रीला नेणाऱ्यांना माघारी पाठवणार. 
- नीलेश गुंजाळ, दूध उत्पादक, पाथरे (ता. सिन्नर)

नाशिक
रोजची अडीच कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक बाजार समितीत जिल्ह्यातून, तसेच अकोले, संगमनेर आदी भागातून रोज फळे, भाजीपाला, कांदा, बटाटा यांची जवळपास सहा हजार पाचशे टन आवक होते. यात चार हजार पाचशे टन भाजीपाल्याचा समावेश आहे. दररोजची अडीच कोटींची उलाढाल शेतकरी संपाने ठप्प झाली. नाशिकमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागासह कोपरगाव, संगमनेर, चाळीसगाव येथून दूध मोठ्या प्रमाणावर येते. नाशिक बाजार समितीमधील भाजीपाला नाशिकसह मुंबई व गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर जातो. शेतकरी संपाचा परिणाम महाराष्ट्राबाहेरील मोठ्या शहरांनाही जाणवणार आहे. या महिन्यात बाजार समितीत रोजची उलाढाल साधारण अडीच कोटींची आहे. 

नांदगाव
मुंबईकरांना भाजीपाला, दुधाचा पुरवठा नाही

 शेतकरी संपाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे गुरुवारी आठवड्याचा बाजार असल्‍याने ग्राहकांना झळ बसेल. तालुक्‍यातून टोमॅटो, मेथी, वांगी यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. बाजार समितीच्या आवारात रोज २५ ते ३० लाखांच्या कांद्याची उलाढाल होते. अन्नधान्याचा व्यवहार दहा-बारा लाखांच्या आसपास असतो. पूर्व भागातील सावरगाव, न्यायडोंगरी, बिरोळे, चांदोरा, पिंपरखेड आदी गावांतून हजारो लिटर दुधाची आवक होते. मनमाडहून मुंबईला रोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला जातो. संपामुळे भाजीपाला मुंबईला जाणार नाही. 

बागलाण
दररोजची २५ लाखांची उलाढाल कोलमडणार

सटाणा बागलाण तालुक्‍यातील गहू, बाजरी, कडधान्य व इतर भुसार माल, डाळिंब, कांदा व फळे सटाणा व नामपूर बाजार समितीच्या आवारात लिलावासाठी येतात. संपामुळे रोज २५ लाखांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल ठप्प होणार आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, कोबी आदी पिके तयार झाल्यानंतर गुजरातमध्ये व मुंबई, पुण्याला मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी जातात. तालुक्‍यातील मोसम परिसरातील भाजीपाला सुरत व बडोदा येथील बाजारपेठेत; तर आरम, हत्ती व गिरणा नदी खोऱ्यातील भाजीपाला नाशिक, मुंबई, जळगाव येथे विक्रीसाठी जातो. भाजीपाला व भुसार माल विक्री बंद झाल्यास कोट्यवधींचे नुकसान होईल. ग्रामीण भागातून रोज दोन हजार ५०० ते तीन हजार ५०० लिटर दूध विक्रीला येते. दूध विक्रीसाठी आले नाही तर रोज दीड लाखापेक्षा अधिक नुकसान होईल.  

चांदवड
गृहिणी धास्तावल्या; हॉटेल मालकांच्या पोटात गोळा 

सकाळच्या गरमागरम चहापासून सुरवात होऊन नाश्‍ता, दुपारचे जेवण, सायंकाळचे जेवण अशा सर्वच दैनंदिन गोष्टींवर शेतकऱ्यांच्या संपामुळे गदा येणार आहे. शेतकरी संपामुळे गृृहिणी धास्तावल्या आहेत, तर व्यापारी, हॉटेलमालक यांच्या मनात धडकी भरली आहे. संपामुळे हजारो लिटर दूध शहरात येणार नसल्याने चांदवड तालुका दूध उत्पादक शेतकरी व डेअरी असोसिएशनचे दुधाची खरेदी अथवा विक्रीचे व्यवहार बंद राहतील. दैनंदिन बाजारात भाजीपाला, अन्नधान्य, शेतीमालच येणार नसल्याने वाहतूक करणारी खासगी वाहने, व्यापार, हॉटेल व्यवसाय पूर्णपणे ठप्प होईल. शेतकरी संपामुळे लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प होणार असल्याने चांदवड शहरासह तालुक्‍यात अघोषित बंदचे चित्र राहील. 

चूल पेटणार का? 
रोज सकाळपासून ते सायंकाळपर्यंत शेतीत मजुरी करणारे, हमाल मिळेल ते काम करून दिवसभर काबाडकष्ट करून पोटाची खळगी भरण्यासाठी धडपड करतात. मात्र, शेतकरी संपामुळे रोजंदारी करणाऱ्या कुटुंबीयांची चूल पेटणार का? असा प्रश्‍न आहे.

मालेगाव
रोजची एक कोटीची उलाढाल होणार ठप्प

शेतकरी संपामुळे शहरातील जनजीवन विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. संप यशस्वी झाल्यास बाजार समितीतील भुसार माल, शेंगा, कांदा, भाजीपाला व दूध यातील दररोजची सुमारे एक कोटीची उलाढाल ठप्प होईल. शहरात पवित्र रमजान पर्व काळात दूध, फळे व भाजीपाल्याची अतिरिक्त मागणी असते. येथील बाजार समितीत भुसार माल विक्रीतून सुमारे २५ लाख रुपयांची, शेंगा विक्रीतून तीन लाखांची, कांदा लिलावातून २५ लाखांची, तर भाजीपाला व फळ विक्रीतून रोज सुमारे ६८ ते ७० लाख रुपयांची उलाढाल होते. मालेगावला रोज किमान पाच लाख लिटर दुधाची आवश्‍यकता भासते. यातील एक लाख लिटर दूध राहुरी, नगर व संगमनेर परिसरातून येते. उर्वरित चार लाख लिटर दूध तालुक्‍यातून येते. आघार बुद्रुक येथील साई गिरणा दूध प्रकल्पात दररोज सुमारे एक लाख ६० हजार लिटर दुधाचे संकलन होते. ते सर्व दूध मुंबईला जाते.

येवला
पाऊण कोटीच्या व्यवहाराला ब्रेक 

आता ठरलंय, काहीही होवो मागे हटणार नाही. वणवा पेटलाय फक्त आवाज बुलंद करायचाय, अशी ठाम भूमिका घेऊन तालुक्‍यातील ९० टक्के शेतकरी संपासाठी तयार झाले आहेत. संपामुळे भाजीपाला, दूध, कांदा आदी शेतमाल विक्रीची किमान ७५ ते ८० लाखांची उलढाल ठप्प होईल. संपाच्या तयारीसाठी पाटोदा, सायगाव, अंदरसूल, नगरसूल आदी गावांत बैठका झाल्या असून, यापूर्वीच ५० ते ६० गावांनी ग्रामसभा घेऊन ठरावदेखील दिले आहेत. येथील बाजारात रोज मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीला येतो. शिवाय भाजीपाला मुंबई, लासलगाव, मनमाड व थेट मुंबईला विक्रीला जातो. ही सगळी विक्री थांबली, तसेच १२३ गावांतदेखील आठवडेबाजार व इतर मार्गाने शेतमाल विकला नाही, तर सुमारे पंधरा ते वीस लाखांवर व्यवहार थांबतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news farmer strike