गड्यांनो, आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर

महेंद्र महाजन
सोमवार, 29 मे 2017

गाव बनले व्हिलेज - पाथर्डी

1980 ते 1985 या कालावधीत येथे द्राक्षबागा उभ्या राहिल्या. सद्यःस्थितीत द्राक्षबागांचे क्षेत्र 800 एकरापर्यंत पोचले असून, दहा हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

वडाळागाव, दाढेगाव, मोरवाडी, अंबड, पिंपळगाव खांबची शीव असलेल्या पाथर्डी गावचे 1972 मध्ये के. के. नवले सरपंच होते. महापालिकेत गावाचा समावेश झाल्यावर तेच पहिले नगरसेवक झाले. याशिवाय तुकाराम जाचक, दामोदर नवले यांनी सरपंच म्हणून काम पाहिले. गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यावर पाथर्डी फाटा परिसर विकसित होताना गावठाण परिसर मात्र विकासाच्या प्रतीक्षेत राहिला. त्यामुळे स्थानिकांमध्ये आपले गाव विकासापासून कोसो मैल दूर राहिल्याची भावना तयार झाली. भौगोलीकदृष्ट्या पूर्वी तिसऱ्या क्रमांकाची वस्ती असलेल्या पाथर्डीकरांच्या अडचणींचा घेतलेला मागोवा...

डेमसे, कोंबडे, जाचक, गवळी, कोथमिरे, हुलुळे, ढगे, मुंडे, दोंदे, पठाडे, वाघमारे, कडवे, पारख, सांतरस, गोलानी ही कुटुंब पाथर्डी गावातील रहिवासी. धनगरवाड्यामध्ये जान, घोंगडे बनविले जायचे. पूर्वी अडीच हजार एकरावर शेती व्हायची. पावसाळ्यात पहिले पीक घेतले जायचे. त्यानंतर भाजीपाला व्हायचा. डिसेंबरपासून मात्र वावर मोकळे असायचे. 1960 मध्ये इथला भाजीपाला मुंबईला ट्रकमधून जायचा. 1980 ते 1985 या कालावधीत येथे द्राक्षबागा उभ्या राहिल्या. सद्यःस्थितीत द्राक्षबागांचे क्षेत्र 800 एकरापर्यंत पोचले असून, दहा हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. इथून 25 कंटनेरभर द्राक्षांची निर्यात होते. सुदाम जाचक, बळवंत धोंगडे, रामकृष्ण चुंभळे, आत्माराम गवळी, शरद डेमसे आदी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतात. याशिवाय पॉलिहाउसमध्ये गुलाब फुलविला जातो. विकास सोसायटीच्या सभासदांची संख्या 670 पर्यंत असून, पीककर्जापोटी सहा कोटींचे वाटप केले जात होते. यंदा 45 टक्‍क्‍यांपर्यंत वसुली पोचली असून, कर्जपुरवठ्याची अवस्था बिकट झाल्याचे सुदाम जाचक यांनी सांगितले. फाळके स्मारक, बुद्धस्मारक, नेहरू उद्यान, पांडवलेणी आणि महामार्गालगतची हॉटेल इंडस्ट्रीने शिवाराचा लौकिक खुलवला. धनगर गल्ली, हौसाबाई चौक, सावरकर चौक, राजवाडा, गुरव गल्ली अशा गावठाणातील भागासह कडवेनगर, ज्ञानेश्‍वरनगर, मुरलीधरनगर, प्रशांतनगर, विक्रीकर भवन, एकता योजना, पार्कसाइड, निसर्ग कॉलनी, म्हाडा योजना, समर्थनगर, मेट्रो स्कीम, वासननगर, दामोदरनगर, नरहरीनगर, अमित असा शिवाराचा विस्तार झाला. आता नांदूर वाट, दाढेगाव वाट, गौळाणे रस्ता, पिंपळगाव खांब शीव अशा भागामध्ये जवळपास बाराशे एकरावर शेती केली जाते. द्राक्षांसह कोबी, फ्लॉवर, कांदा, भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन भाजीपाल्याची विक्री सिडको, पवननगर, इंदिरानगर भागात केली जाते. दिवसाला चार ट्रकभर भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. 25 वर्षांपूर्वी टोमॅटोचे उत्पादन घेतले जात होते. आताच्या खंडेराव मंदिराच्या परिसरातील गायरान भागातील आखरमध्ये आठवडा बाजार पूर्वी भरायचा. त्याशेजारी बारव होती. त्यातून पांडवलेणीपर्यंत भुयार होते, असे ज्येष्ठ सांगतात. पण बारव बुजविण्यात आली. श्रावणातील तिसऱ्या सोमवारी पांडवलेण्याच्या पायथ्याशी धर्मराज यात्रोत्सव होण्याची परंपरा आहे. कुस्त्यांच्या दंगलीची परंपरादेखील गावाची आहे. आताच्या फाळके स्मारक, नेहरू उद्यान भागातील तळे परिसरामध्ये जंगल होते. त्यातून जनावरांचा चारा मिळायचा. फाळके स्मारकासाठी 28 एकर क्षेत्र वर्ग करण्यात आले आहे.

पाथर्डी गावठाण, अंबड शीव, मुंबई-आग्रा महामार्ग, देवळाली जुना रस्ता, वडाळा शिवार या पट्ट्यामध्ये नागरी वस्त्यांचा विकास झाला. 1984 पासून आतापर्यंत जवळपास बाराशे एकरावर प्लॉट आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार पाचशे एकरावर विकास झाला असला, तरीही 700 एकरावरील प्लॉट पडून आहेत. खत प्रकल्पाच्या एका दिशेने तीन ते पाच हजार रुपये वार भावाने जागेसह एक कोटी रुपये एकराने जमीन घ्यायला ग्राहक मिळत नाही, ही व्यथा रहिवाशांची आहे. मात्र, प्रकल्पाच्या दुसऱ्या बाजूला 18 ते 20 हजार रुपये वार आणि दहा कोटींपर्यंत एकर या भावाने मागणी होते. पाथर्डी शिवारातून साडेतीन कोटींचा कर भरला जात असला, तरीही प्रत्यक्षात त्या तुलनेत विकासाचा वेग नसल्याने स्थानिक नाराज आहेत. हे कमी की काय म्हणून मधल्या काळात शंभर खाटांच्या रुग्णालयाचे भूमिपूजन झाले होते. पुढे त्याचे काय झाले, हे समजायला तयार नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

पाथर्डीकरांना हवय...

  • महापालिकेच्या शाळा क्रमांक 97, 101, 83, 19 अशा शाळा आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या बरीच मोठी असल्याने ई-लर्निंग स्कूल व्हावे. काही वर्षांपूर्वी ई-लर्निंगचा 75 लाखांचा प्रस्ताव सादर झाला होता. पुढे हा प्रस्ताव पाच कोटींपर्यंत गेला.
  • 1984 मध्ये चिरे रोऊन मार्किंग करण्यात आले होते. कंपाउंडही टाकले होते. हे क्षेत्र ओसाड पडले असून, त्याचा विकास व्हायला हवा.
  • गावातील शौचालयाची दुरवस्था संपुष्टात आणावी. पाण्याची व्यवस्था करावी.
  • पाथर्डी फाट्याच्या अलीकडील भागात रस्त्यावर भरणाऱ्या भाजीबाजाराचा प्रश्‍न निकाली काढावा. वाहतुकीची कोंडी संपुष्टात यावी. या भागात दहशत तयार होणार नाही, याची खबरदारी घेतली जावी.
  • पाथर्डी फाट्यावर सिग्नल कार्यान्वित करून वाहतुकीचे नियमन व्हायला हवे.
  • वाडीचा रान, वीटभट्टी रस्ता या भागात पाच हजार लोकसंख्या असून, पूर्वी शेतीतील विहिरीचे पाणी प्यायला वापरले जायचे. खत प्रकल्पातील पाण्यामुळे विहिरींचे पाणी प्रदूषित झाल्याने विहिरीचे पाणी पिण्यास योग्य राहिले नसल्याने पाण्याची व्यवस्था व्हावी. जुन्या वाहिन्यांच्या जागी नवीन जलवाहिन्या टाकाव्यात. बंद पथदीप सुरू राहतील याची व्यवस्था करावी. खत प्रकल्पामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास थांबवावा.
  • नांदूर रस्ता, दाढेगाव रस्ता या रस्त्यांची कामे व्हावीत. बस थांबे व्हावेत. स्पर्धा परीक्षेची आवड तयार करण्यासाठी अभ्यासिका असावी.
  • आरोग्याचे प्रश्‍न वाढत असल्याने अद्ययावत रुग्णालय उभारावे. त्यासाठी आरक्षित अथवा खुल्या जागेचा वापर करावा.

खत प्रकल्पाच्या प्रश्‍नांनी ग्रस्त
खत प्रकल्पासाठी जवळपास 250 एकर जमीन संपादित करण्यात आली. खत प्रकल्पामध्ये कचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्याने हा कचरा डेपो आहे, अशी भावना आमच्यामध्ये कायम आहे, असे सांगून सुनील कोथमिरे म्हणाले, की पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आमच्यासह सैन्य दलाला त्याचा त्रास होणार आणि अल्पभूधारक शेतकरी या प्रश्‍नामुळे खत प्रकल्पाविरोधात आंदोलनाची ठिणगी पडली होती. मात्र, तरीही कचऱ्याचे व्यवस्थापन झाले नसल्याने कचरा डेपोमधील पाण्यामुळे विहिरींचे पाणी प्रदूषित झाले. दुर्गंधीला आम्हाला सामोरे जावे लागते. हा प्रश्‍न नेमका कधी सोडविला जाणार, याचे उत्तर मिळत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम गावठाणातील विकासावर झाला आहे.

खत प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्याची गरज आहे. माझ्या माहितीनुसार 16 टाक्‍या मंजूर झाल्या असल्या, तरीही तीन टाक्‍यांची कामे सुरू झाली. त्यापैकी विक्रीकर भवन भागातील टाकीचे काम पूर्ण झाले. वासननगर, भवानीमाता भागासह इतर टाक्‍यांचा प्रश्‍न भिजत पडला आहे. गौळाणे रोड, वाडीचा रान या भागातील जलवाहिनेचे काम मंजूर झाले. मात्र हे काम प्रलंबित आहे. फाळके स्मारकामध्ये पाण्याच्या पडद्यावर लेसर शोच्या माध्यमातून रामायणचा पट उलगडून दाखविण्याचा प्रस्ताव होता. त्यातून उत्पन्न वाढीला हातभार लागला असता; पण या कामाकडे लक्ष दिलेले नसतानाच हा परिसर पुरेसे लक्ष न दिल्याने डबघाईस आला आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी फाळके आणि बुद्धस्मारक परिसराच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.
संजय नवले, माजी नगरसेवक

आमचे गाव विकासापासून वंचित राहिल्याचे पदोपदी जाणवते. यापूर्वी विकासाची झालेली कामे चांगली आहेत. पण आणखी विकास व्हायला हवा. मळे परिसरात बैलगाड्यांच्या जागी आता ट्रॅक्‍टर आले असल्याने पावसाळ्यात चिखलात फसणाऱ्या वाहनांची समस्या दूर व्हायला हवी. दलित वस्तीमध्ये सुधारणा व्हायला हवी. दाढेगाव रस्ता-पाथर्डी, तुकाराम जाधव, गंगाधर धोंगडे, लोणे यांच्या भागातील रस्त्यांची कामे व्हायला हवीत. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. गुंठे पद्धतीने विकसित झालेल्या भागात गटारी, पाणी, रस्ते, वीज ही कामे व्हावीत. कचरा डेपोच्या अनुषंगाने लढा देणाऱ्या अल्पभूधारकांचा प्रश्‍न सुटायला हवा. या साऱ्या प्रश्‍नांवर आता काम करण्यात येत आहे.
भगवान दोंदे, नगरसेवक

महापालिका शाळेच्या पाठीमागील वस्तीमध्ये पाण्याची सोय नाही. गटारी नाहीत. उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे डास घोंघावतात. डासांचे निर्मूलन करत असताना या भागात पायाभूत सुविधा मिळायला हव्यात.
पांडुरंग सगर, स्थानिक रहिवासी

गौळाणे रस्ता, नांदूर रस्ता, दाढेगाव रस्ता यावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यांचे डांबरीकरण व्हायला हवे. निकम मळ्यात पाण्याची व्यवस्था व्हायला हवी. तसेच मोंढेवाडी, नांदूरवाट, गौळाणे रस्ता, दाढेगाव रस्ता या भागातील मळे भागामध्ये पिण्याचे पाणी मिळावे.
भिकाजी निकम, स्थानिक रहिवासी

पाथर्डी गाव, माउलीनगर, कडवेनगर, वासननगर भागामध्ये कमी दाबाने पाणी येते. हा प्रश्‍न संपुष्टात आणावा. रस्त्यांची डागडुजी व्हावी. मळे शिवारात बंद असलेले पथदीप सुरू करावेत. मळे परिसरातील वहिवाटीच्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे. स्मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था करावी.
गंगाधर धोंगडे, स्थानिक रहिवासी

गावातील चढाच्या भागात कमी दाबाने पाणी मिळते. बऱ्याचदा पाण्यासाठी वणवण करावी लागते. ही समस्या दूर करण्यासाठी गावातील नळांवरील मोटारी बंद व्हायला हव्यात. तसेच सार्वजनिक शौचालयात पाणी उपलब्ध करून देताना त्याची दुरवस्था संपवावी.
लतिफ शेख, स्थानिक रहिवासी

(उद्याच्या अंकात : अंबड-कामटवाडे-मोरवाडी-उंटवाडी)

Web Title: nashik news gaon becomes village pathardi