जिल्ह्यातील दीड लाख एकर द्राक्षाबागा डावणी, भुरीच्या विळख्यात 

दीपक आहिरे
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2017

पिंपळगाव बसवंत - पंधरा दिवसांपूर्वी सलग नऊ दिवस पावसाने झोडपून काढल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर रोगांचे आक्रमण झाले आहे. दीड लाख एकर द्राक्षबागांवर डावणी, भुरी, फळकुजचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे द्राक्ष हंगामाचा गोडवा हरवला आहे. फवारणीचा खर्च वाढलाच. उत्पादन व दर्जा ढासणार असल्याने द्राक्ष उत्पादक हादरले आहेत. परतीच्या पावसाने 25 टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

पिंपळगाव बसवंत - पंधरा दिवसांपूर्वी सलग नऊ दिवस पावसाने झोडपून काढल्याने नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांवर रोगांचे आक्रमण झाले आहे. दीड लाख एकर द्राक्षबागांवर डावणी, भुरी, फळकुजचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे द्राक्ष हंगामाचा गोडवा हरवला आहे. फवारणीचा खर्च वाढलाच. उत्पादन व दर्जा ढासणार असल्याने द्राक्ष उत्पादक हादरले आहेत. परतीच्या पावसाने 25 टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 

द्राक्षबागा फुलोरा व पोंगा अवस्थेत असताना परतीच्या पावसाने कहर केला. उघडीपीनंतर द्राक्षबागांच्या झालेल्या नुकसानीचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. निफाड, दिंडोरी, नाशिक तालुक्‍यांतील द्राक्षबागांची बुरशीजन्य रोगांनी वाताहत झाली आहे. फुलोऱ्यातील बागात घडावर पाणी साचून कुज व फळकुज मोठ्या प्रमाणात झाली आहे. आता जमीन कडक झाल्याने मुळ्यांची वाढ थांबली आहे. त्यामुळे घड जिरण्याचे प्रमाण वाढले आहे. कुज, फळकुज यामुळे झाडांवर सरासरी 45 ऐवजी 20 घड शिल्लक राहिले आहेत. रोगांचा प्रतिकार करण्यासाठी अतिरिक्त औषधाची फवारणी केल्याने एकरी दहा ते पंधरा हजार खर्चाचे ओझे पडले आहे. कृषी विभागाने सेंद्रिय उत्पादनावर प्रतिबंध लावल्याने रामबाण उपाय असलेली औषधे शेतकऱ्यांना मिळाली नाही. त्यामुळे द्राक्षबागांवर रोगांनी थैमान मांडले आहे. डावणी, भुरी रोगाने कवेत घेतलेले घड व पाने काढून टाकण्याशिवाय आता पर्याय नाही. पावसाच्या विश्रांतीनंतर आता थंडी व दव यामुळे भुरीचा धोका संभवतो आहे. 

ट्रॅक्‍टर, ब्लोअर्स नादुरुरूस्त... 
द्राक्षबागांच्या बचावासाठी भरपावसात शेतकऱ्यांनी छोटे ट्रॅक्‍टर व ब्लोअर्सने औषध फवारणी केली. ते कष्ट वाया जात रोगांनी धुमाकूळ तर घातला शिवाय ट्रॅक्‍टर, ब्लोअर्स ही फवारणीची साधने चिखलात रुतली आहेत. ट्रॅक्‍टरच्या मशिनमध्ये पावसाचे पाणी व चिखल गेल्याने ते नादुरुस्त झाले आहेत. 

अनपेक्षितपणे मुक्काम ठोकणाऱ्या पावसाने द्राक्षबागावर संकटाची मालिका ओढावली आहे. या आस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी खात्रीच्या सेंद्रिय उत्पादन विक्रीला कृषी विभागाच्या जाचक अटीमुळे बंधने आली आहेत. मंदीच्या सावटात असलेल्या बाजारपेठेसाठी द्राक्षांचे नुकसान हे "दुष्काळात तेराव महिना' ठरेल. 
- प्रा. प्रकाश मोरे, द्राक्षशेती सल्लागार 

डावणी, भुरी रोगांमुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षपीक हिरावले आहे. बागेतून वाहणाऱ्या पाण्यामुळे छाटणीपासून आजपर्यंत टाकलेली खते वाहून गेली आहेत. द्राक्ष उत्पादकांचे तोंडचे पाणी पळाले आहे. या संकटाचे शासनाकडून त्वरित पंचमाने व्हावेत व मदत मिळावी, तर शेतकरी वाचू शकेल. 
- अनिल बोरस्ते, द्राक्ष उत्पादक व माजी पंचायत समिती सदस्य

Web Title: nashik news grapes