संदर्भसेवा रुग्णालय निधीअभावी ‘आजारी’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

नाशिक - राज्यातील दोन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलपैकी एक असलेल्या नाशिकच्या संदर्भसेवा रुग्णालयासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र निधीची तरतूद नाही. त्यामुळे हॉस्पिटलसाठी यकृत प्रत्यारोपणाच्या स्वतंत्र युनिटची मंजुरी मिळूनही केवळ वाढीव मजल्याचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे. लिफ्ट व वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध होत नसल्याने यंत्रणा धूळखात पडल्या आहेत. रुग्णालयाची परिस्थिती पाहून आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 

नाशिक - राज्यातील दोन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलपैकी एक असलेल्या नाशिकच्या संदर्भसेवा रुग्णालयासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र निधीची तरतूद नाही. त्यामुळे हॉस्पिटलसाठी यकृत प्रत्यारोपणाच्या स्वतंत्र युनिटची मंजुरी मिळूनही केवळ वाढीव मजल्याचे बांधकाम निधीअभावी रखडले आहे. लिफ्ट व वातानुकूलित यंत्रणेच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध होत नसल्याने यंत्रणा धूळखात पडल्या आहेत. रुग्णालयाची परिस्थिती पाहून आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. 

शालिमार चौकातील सुपरस्पेशालिटी संदर्भ सेवा रुग्णालयात आज आमदार प्रा. फरांदे यांनी आढावा बैठक घेऊन रुग्णालयाची पाहणी केली. बैठकीला आरोग्य विभागाच्या उपसंचालिका डॉ. लोचन पाटील, डॉ. पी. एन. घुटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, रुग्णालयीन अधिकाऱ्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील, शेलार आदी उपस्थित होते. 

आमदार फरांदे यांनी बंद लिफ्ट व वातानुकूलित यंत्रणेची विचारणा केली असता, ‘सार्वजनिक बांधकाम’च्या दुरुस्ती विभागाच्या अधिकाऱ्यांनी निधीच्या तक्रारींचा पाढा वाचला. आरोग्य विभागाकडे दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध नसल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले. लिफ्ट आणि वातानुकूलित यंत्रणा जुन्या झाल्या असून, त्यांचे स्पेअरपार्टस्‌ही मिळत नाहीत. त्यामुळे अत्याधुनिक लिफ्ट व वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठीचा एक कोटींच्या निधीचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. 

त्याचप्रमाणे, सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी यकृत प्रत्यारोपण (किडनी ट्रान्सप्लान्ट) युनिट उभारण्याला मंजुरी दिली. या युनिटसाठी आमदार फरांदे यांनीच पाठपुरावा केला असल्याची आठवण करून देत अद्यापही त्यासंदर्भात हालचाल होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. संदर्भसेवा रुग्णालयात त्यासाठी वाढीव दोन मजले बांधण्याचा प्रस्ताव आहे. १८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असून, त्यासंदर्भात अद्यापही आरोग्य विभागाने मंजुरी दिलेली नाही. त्यासाठी आमदार फरांदे यांनी, तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे प्रस्ताव देऊन पाठपुरावा करणार असल्याचे स्पष्ट केले. 

निधीसाठी प्रस्ताव
संदर्भसेवा रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या निधीसाठी जिल्हा नियोजन विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना आमदार फरांदे यांनी दिल्या असून, याशिवाय रुग्णालयात डायलेसिस मशिन्ससाठी सीएसआर निधीसाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठविला जाणार आहे. निधीअभावी हॉस्पिटलचे फायर ऑडिटही रखडले असून, तूर्तास ते हॉस्पिटलच्या निधीतून तत्काळ करण्याच्या सूचना केल्या. 

रुग्णालयाच्या पाहणीदरम्यान सीटी स्कॅन विभागात पाण्याची गळती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि बांधकाम विभागास हे काम तत्काळ करण्याचे आदेश दिले.

आरोग्य मंत्रालयच उदासीन
यकृत प्रत्यारोपण युनिटसह संदर्भसेवा रुग्णालयातील कामकाजासाठी स्वतंत्र निधी देण्याकडे आरोग्य मंत्रालयच उदासीन आहे. शासकीय रुग्णालयांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जात असताना सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी असा स्वतंत्र निधी नाही. त्यामुळे विकास खुंटला असून, दीनदुबळ्यांना सुपरसेवा मिळण्यास अडचणी येत आहेत. कार्डियालॉजिकतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, रेडिओथेरेपिस्ट आदी तज्ज्ञ अधिकाऱ्यांना नाममात्र मानधन दिल्याने ते पूर्णवेळ सेवा देत नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांचीही नेमणूक कंत्राटी पद्धतीने आहे. त्यामुळे रुग्णांसाठी मोठी समस्या उद्‌भवते.

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी स्वतंत्र निधीचे नियोजन आरोग्य मंत्रालयाने केलेले नाही. महागड्या यंत्रणा व तज्ज्ञ डॉक्‍टर आहेत; परंतु त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा व निधी नसल्याने त्याचा त्रास रुग्णांना होतो. यासंदर्भात अर्थमंत्र्यांकडे ऑक्‍टोबर अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी करणार असून, त्यासाठी सर्वतोपरी पाठपुरावा केला जाईल. 
- प्रा. देवयानी फरांदे, आमदार

Web Title: nashik news health hospital