हौसला बुलंद हो, तो क्या कॅन्सर, क्या दसवीं!

दीपिका वाघ
मंगळवार, 30 मे 2017

अाद्यनला मुंबईत दवाखान्यात बघून आल्यावर सर्व वैद्यकीय पुरावे जमा केले व दिल्ली कौन्सिलला मेल पाठविला. कौन्सिलने खूप मदत केली आणि अाद्यनची परीक्षा हॉस्पिटलमध्ये घेण्याची परवानगी दिली. या सर्व केलेल्या कामाचे चीज आज अाद्यनच्या निकालात दिसून आले. 
-कुमुदिनी बंगेरा, मुख्याध्यापिका,  होरायझन ॲकॅडमी

नाशिक - मार्च महिन्यात आयसीएसई बोर्डाची परीक्षा सुरू झाली. परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांपैकी एक होता, नाशिकच्या होरायझन ॲकॅडमीचा आद्यन सोनावणे (वय १५)... जो परीक्षा देतानाच लाखो परीक्षार्थींमधला लाखांतला एक ठरला. दहावीच्या परीक्षेबरोबरच त्याची चौथ्या स्टेजच्या कॅन्सरची परीक्षा सुरू झाली. कॅन्सरशी दोन हात करून त्याने ९२.४ टक्के मिळविलेच, आता कॅन्सर घेत असलेल्या परीक्षेत कॅन्सरला पछाडण्याची जिद्द घेऊन तो या क्षणालाही लढत आहे. 

परीक्षेच्या कालावधीत आद्यनला अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाला. नॉर्मल दुखणे असेल म्हणून डॉक्‍टरांनी सलाइन, ॲन्टिबायोटिक सुरू केले, तरी दुखणे काही बरे होईना. घरी सांगितल्यावर आई-बाबा परीक्षेस मनाई करतील म्हणून त्याने होणारा त्रास घरी सांगितला नाही. परीक्षेपुरता शाळा, नंतर हॉस्पिटलमध्ये सलाइन आणि वेदनाशामक औषधे घेऊन परीक्षा असा त्याचा पहिल्या पेपरपासूनचा प्रवास एकट्याने सुरू केला. मात्र दुखणे थांबेचना म्हणून घरच्यांशी संवाद साधला. सोनोग्राफी, सिटीस्कॅन केल्यावर ‘बर्किट लिम्फोमा’ नावाच्या चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचे निदान झाले. हा कॅन्सर चौदा तासांत दुपटीने वाढत जातो... 

यंदा निवडणुकीमुळे आयसीएसई दहावीची परीक्षा एक महिना उशिरा घेण्यात आली होती; परंतु शेवटचा पेपर हा गणिताचा होता. ज्या परीक्षेसाठी आद्यनने पराकोटीच्या शारीरिक वेदना सहन केल्या होत्या, त्यात शेवटचा पेपर क्षीण झालेल्या देहामुळे देता येणार नाही याच्या मानसिक वेदना मात्र त्याला सहन होईनात. शरीर जर्जर होत चालल्याने त्याला बसता येत नव्हते. तसेच झोपता आणि खाता-पिताही येत नव्हते. शरीराने बंड केले पण त्याचमुळे अद्यानने स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर बनविले. 

आद्यनची शाळा आणि पालकांचे शेवटचा पेपर पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण ते कुठेतरी आद्यनचे बाबा राजेश सोनावणे यांना पटत नव्हते. आक्रमक होत चालेल्या कॅन्सरशी दोन हात करताना शेवटचा पेपर सोडून देणे म्हणजे हरण्यासारखेच होते. सोनावणे कुटुंब मूळचे मुंबईचे असल्याने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात अद्यानवर उपचार सुरू झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका कुमुदिनी बंगेरा मुंबईला जाऊन त्याच्या तब्येतीची चौकशी करायच्या. पेपर पुढे ढकलण्यापेक्षा मुख्याध्यापिका बंगेरा यांनी दिल्ली येथे हॉस्पिटलमध्ये पेपर घेता येईल काय यासाठी दिल्ली कौन्सिलशी पत्रव्यवहार केला. यात डॉक्‍टरांची संमती आवश्‍यक होती. वास्तविक किमोथेरपीनंतर रुग्ण बसूही शकत नाही, त्यात पेपर देणे तर अवघडच. मुख्याध्यापिकांनी पराकोटीचे प्रयत्न करून आद्यनचा शेवटचा गणिताचा पेपर थेट लीलावती रुग्णालयातच होईल, अशी परवानगी दिल्ली कौन्सिलकडून मिळविली. आद्यनला पेपरसाठी लेखनिक बनणारी वृषाली जाधव ही नववीतील विद्यार्थिनी. आद्यनचा दहावीचा गणिताचा पेपर द्यायला म्हणून तिने दहावीच्या गणिताचा पेपर लिहायचा सराव केला आणि आद्यनसाठी ती लेखनिक बनली. आद्यन केवळ १०० पैकी ९४ गुणांचा पेपर देऊ शकला. त्यात त्याला १०० पैकी ९४ गुण मिळाले. कला विषयात ९४ गुण मिळाले. अशा प्रकारे सर्व विषयांत मिळून त्याला ९२.४ टक्के मिळाले आहेत. 

यामध्ये शाळेच्या समुपदेशक श्रद्धा क्षीरसागर, आई वृषाली सोनावणे, गणिताचे शिक्षक साबीर सय्यद, लेखनिक वृषाली जाधव यांनी आद्यनचे मनोबल वाढावे म्हणून सतत प्रयत्न केले होते. झुंजार आद्यन आता कॅन्सरच्या परीक्षेत यशस्वी होईल यात अजिबात शंका नाही...

Web Title: nashik news ICSE board exam cancer