‘नानां’साठी फुकट वकिली करणाऱ्याची होणार चौकशी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नाशिक - गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी नगरसेवक गजानन शेलार न्यायालयीन लढाई लढत असताना एका वकिलाने सोशल मीडियावर शेलार यांच्या कृतीचे समर्थन करीत न्यायालयात बाजू मांडण्यासाठी फुकट वकिली करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे पोलिस त्या वकिलाची चौकशी करणार आहेत.

विसर्जन मिरवणुकीत दंडे हनुमान मित्रमंडळाने डीजे लावून ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल आहे. नगरसेवक गजानन शेलार यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. शेलार यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. नाशिक जिल्हा न्यायालयातील वकील राजेश आव्हाड यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली असून, त्यात त्यांनी शेलार यांच्या कृतीचे समर्थन करीत अभिनंदन केले आहे.

तसेच, शेलार यांच्यासह ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्यांची न्यायालयात फुकट बाजू मांडण्याची तयारी दाखविली आहे. संपर्कासाठी मोबाइल क्रमांकही दिला आहे. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी फेसबुकवरील ती पोस्ट शोधून काढली आणि त्या वकिलास चौकशीसाठी भद्रकाली पोलिसांत बोलविले जाण्याची व चिथावणी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, ही बाब नाशिक बार असोसिएशनच्या निदर्शनास आणून देण्यात येणार आहे. त्यामुळे बारकडूनही त्या वकिलावर कारवाई होण्याशी शक्‍यता आहे.

जबाबदार वकील असताना अशारीतीने सोशल मीडियावर चिथावणी देणे गुन्हा असून, त्यानुसार पोलिसांकडून कारवाई केली जाईल. त्यासाठी नोटीस बजावली आहे. 
- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

Web Title: nashik news lawyer police inquiry