उद्याच्या बैठकीकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

'समृद्धी'च्या भूसंपादनासाठी प्रशासनाला पाच कोटींचा निधी प्राप्त

'समृद्धी'च्या भूसंपादनासाठी प्रशासनाला पाच कोटींचा निधी प्राप्त
नाशिक - नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठी दर जाहीर झाल्यानंतर प्रशासनाकडे पाच कोटींचा तातडीचा निधी प्राप्त झाला आहे. गावपातळीवर तलाठी स्तरावर त्या दृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे. भूसंपादनाची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. त्याच वेळी शुक्रवारी (ता. 14) होणाऱ्या आंदोलक व मुख्यमंत्र्यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो यांच्या मध्यस्थीने ही बैठक होत आहे.

समृद्धी महामार्गासाठी सिन्नर व इगतपुरी तालुक्‍यातील जमिनीचे दर शासनाने जाहीर केले असून, प्रचलित दरापेक्षा सुमारे 25 टक्‍क्‍यांवर अधिक दर दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. दुसरीकडे सिन्नर तालुक्‍यातील काही गावांत जमिनी न देण्याच्या भूमिकेवर ठाम असलेल्या शेतकऱ्यांनी सामूहिक सरण रचून आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. भूसंपादन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी जादा दराबरोबरच 48 तासांत संबधितांच्या नावावर पैसे जमा करण्याचे प्रशासनाने दिलेल्या आश्‍वासनानुसार रस्ते विकास महामंडळाकडून स्थानिक प्रशासनाला तातडीची गरज म्हणून पाच कोटी रुपये उपलब्ध करून दिले. त्यामुळे उद्या (ता. 13) पासून व्यवहार सुरू झाल्यास लगेचच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतील, अशी सोय प्रशासनाने केली आहे.
जमिनीचे दर जाहीर होऊन तीन-चार दिवस झाले असले, तरी जमिनी विक्रीसाठी अद्याप कुणी पुढे आलेले नाही. जमिनी दिल्यास किती पैसे येतील, याचा अंदाज ठिकठिकाणी घेण्यात येत असल्याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्हणणे आहे.

Web Title: nashik news meeting for samruddhi highway with chief minister