निर्देशांकाचे उल्लंघन झाल्यास बांधकाम पाडणार - आयुक्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

नाशिक - चार वर्षांपासून बांधकामातील कपाटांवरून पूर्णत्वाच्या दाखल्यांअभावी पडून असलेल्या सहा हजारांहून अधिक इमारतींच्या परवानगीचा मार्ग मोकळा करताना निर्धारित कालावधीत बांधकाम व्यावसायिकांनी परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. नऊ मीटर रस्ता रुंदीचा फायदा मिळूनही चटई निर्देशांकाचे उल्लंघन होत असल्यास त्या इमारतींचे अनावश्‍यक बांधकाम पाडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 

नाशिक - चार वर्षांपासून बांधकामातील कपाटांवरून पूर्णत्वाच्या दाखल्यांअभावी पडून असलेल्या सहा हजारांहून अधिक इमारतींच्या परवानगीचा मार्ग मोकळा करताना निर्धारित कालावधीत बांधकाम व्यावसायिकांनी परवानगीसाठी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. नऊ मीटर रस्ता रुंदीचा फायदा मिळूनही चटई निर्देशांकाचे उल्लंघन होत असल्यास त्या इमारतींचे अनावश्‍यक बांधकाम पाडण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. 

चार वर्षांपासून बांधकामातील कपाटांचा वाद सुरू आहे. राज्य शासनाने नवीन शहर विकास नियंत्रण नियमावलीला मंजुरी देताना सहा व साडेसात मीटर रस्त्यांवरील इमारतींना मंजुरी देणे बंद केल्याने अतिरिक्त एफएसआय मिळूनही बांधकामे नियमित करता येत नव्हती. या संदर्भात शासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनाने सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यांना नऊ मीटर रस्त्याचा फायदा देण्याचे धोरण जाहीर केले. त्यानुसार सहा मीटर रुंदीच्या रस्त्यावरील दोन्ही बाजूकडील दीड मीटर, तर साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यात समोरील दोन्ही बाजूस 0.75 मीटर जागा ताब्यात घेऊन नऊ मीटर रुंदीचे फायदे देण्याचे धोरण जाहीर केले. या संदर्भात अंदाजपत्रक सादर करताना आयुक्त मुंढे यांनी दोन दिवसांत आयुक्तांच्या अधिकारात जाहीर सूचना करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी निर्धारित वेळ दिला असून, यादरम्यान नऊ मीटर रुंदीसाठी जागा देणाऱ्या जागामालकांना टीडीआर एफएसआय स्वरूपात मोबदला दिला जाईल. नऊ मीटर रुंदीनुसार टीडीआर मिळाल्यानंतरही त्याव्यतिरिक्त निर्देशांकांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास ते अतिरिक्त बांधकाम तोडले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. 

कंपाउंडिंग चार्जेस वाढविणार 
शासनाने कम्पाउंडिंग पॉलिसी जाहीर केली आहे. त्यात ठराविक शुल्क भरून अधिक एफएसआयनुसार बांधकाम नियमित करता येते. शासनाने या संदर्भात दर निश्‍चित केलेले असले तरी बांधकाम व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेने उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूने कम्पाउंडिंग चार्जेसमध्ये वाढ करण्याचा विचार केला असून, दरवाढीसंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. 

ना हरकत दाखला मिळणार 
मोठ्या बांधकाम प्रकल्पांच्या परवानगीचे प्रस्ताव नगररचना विभागात दाखल करण्यापूर्वी महापालिकेच्या विभागांकडून ना हरकत दाखला मिळवावा लागतो. त्यात अधिक वेळ वाया जातो, शिवाय मानवी हस्तक्षेप वाढत असल्याने याची दखल घेत नगररचना विभागामार्फत विविध प्रकारचे ना हरकत दाखले मिळवून द्यावे लागणार आहेत. आजपासून तत्काळ कामही सुरू झाले आहे. या उपक्रमामुळे पारदर्शकता व वेळेची बचत हे दोन्ही हेतू साध्य होणार असल्याचे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले. 

संघर्षानंतर कौतुकाचा वर्षाव 
स्थायी समितीवर अंदाजपत्रक आणण्यावरून आयुक्त तुकाराम मुंढे यांना घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने गुरुवारी अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर कौतुकाचा वर्षाव केला. आयुक्तांनी तीन नव्हे, तर पाच वर्षे काम करण्याच्या मागणीनंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. भाजपचे सदस्य उद्धव निमसे यांनी आतापर्यंतच सर्वांत चांगले अंदाजपत्रक असेल, असे गौरवोद्‌गार काढले. मुशीर सय्यद यांनी पूर्वीच्या कामांचा समावेश करण्याची तसेच महापालिकेच्या विविध बॅंकांमध्ये अडकलेल्या ठेवी सोडण्याची मागणी केली. कोमल मेहेरोलिया यांनी चोवीस तास पाणीपुरवठ्याचे स्वागत केले. शिवसेनेच्या संगीता जाधव यांनी प्रभाग 31 मधील पाणीपुरवठा प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली. 

Web Title: nashik news Municipal Commissioner Tukaram Mundhe