महापालिका रुग्णालयात औषधांचा तुटवडा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

जेल रोड - दसक- पंचक, नांदूर- मानूरसह परिसरातील दहा ते बारा गावातील नागरिकांच्या आरोग्यसेवेचा भार असणारे पंचकचे रुग्णालयच औषधांअभावी आजारी पडले आहे. पंचक येथील महापालिकेच्या रुग्णालयात आठ दिवसांपासून सर्दी व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

जेल रोड - दसक- पंचक, नांदूर- मानूरसह परिसरातील दहा ते बारा गावातील नागरिकांच्या आरोग्यसेवेचा भार असणारे पंचकचे रुग्णालयच औषधांअभावी आजारी पडले आहे. पंचक येथील महापालिकेच्या रुग्णालयात आठ दिवसांपासून सर्दी व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात सकाळच्या सत्रात तपासणी करून औषधोपचार केले जातात. जेल रोडसह दसक-पंचक परिसरात सर्दी, खोकला व डेंगीसदृश तापाने अनेकजण फणफणले आहेत. रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्दी व खोकल्याचे औषधच शिल्लक नसल्याने सर्वसामान्यांना तिष्ठत राहावे लागत आहे. खोकल्याचे रुग्ण आल्यास त्यांना औषध नसल्यामुळे गोळ्या द्याव्या लागतात. खोकल्याचे औषध शिल्लक नसल्याने औषध घेण्यासाठी नंतर या, असे सांगितले जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. यासंर्दभात पंचकच्या वैद्यकीय अधीक्षकांशी संपर्क साधला असता आम्ही वरिष्ठांकडे औषधांची मागणी केली असून, सर्दी व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असल्यामुळे ही औषधे अजून उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना खोकल्याची औषधे घेण्यासाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात चकरा माराव्या लागत असल्याचे वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. 

पंचकच्या रुग्णालयावर पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्यसेवेचा भार आहे. बाह्यरुग्ण विभागात मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या असते. बाह्यरुग्ण विभागाची वेळ निश्‍चित असावी. औषधे सुटी न देता पॅकबंद दिली जावीत. रुग्णांची संख्या लक्षात घेता दिवसभर बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित असावा. 
- नंदकिशोर बोराडे, पंचक 

पंचक रुग्णालयात सर्दी व खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठपुरावा करून दोन दिवसांत औषधे उपलब्ध केली जातील. नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल व्यक्तिश: लक्ष घालून समस्या सोडविणार आहे. 
- शरद मोरे, नगरसेवक, पंचक 

Web Title: nashik news municipal hospital medicine