पुणे नाशिक रस्त्यावर आंदोलनानंतरही टोल आकारणी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

नाशिक - रस्त्याचे काम पूर्ण नसताना टोल आकारणी थांबवावी, 20 किलोमीटर परिघातील नागरिकांकडून टोल आकारणी करू नये, टोल नाक्‍यावर स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा आदी मागण्यांसाठी आज शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शिंदे येथील टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलन काळापुरती बंद केलेली टोल आकारणी नंतर पुन्हा पूर्ववत सुरूच राहिली. 

नाशिक - रस्त्याचे काम पूर्ण नसताना टोल आकारणी थांबवावी, 20 किलोमीटर परिघातील नागरिकांकडून टोल आकारणी करू नये, टोल नाक्‍यावर स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा आदी मागण्यांसाठी आज शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शिंदे येथील टोल नाक्‍यावर आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलन काळापुरती बंद केलेली टोल आकारणी नंतर पुन्हा पूर्ववत सुरूच राहिली. 

नाशिक - पुणे महामार्गावर सिन्नर फाटा ते शिंदे गाव या रस्त्यावर दारणा नदीवरील पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीही शिंदे गावात आजपासून टोल आकारणी सुरू झाली. सकाळी शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप यांनी नेतृत्व केले. आंदोलकांनी टोल नाक्‍यावर आंदोलन व घोषणाबाजी करीत कंपनीच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे गोंधळ 
दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पगार, युवती कॉंग्रेसच्या प्रेरणा बलकवडे, अर्जुन टिळे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पुरुषोत्तम कडलग आदींच्या नेतृत्वाखाली नाशिक तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी टोल नाक्‍यावर आंदोलन केले. आंदोलनापुरता बंद असलेला टोल नाका पुन्हा सुरू झाल्याने त्याला आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी प्रकल्प संचालक सुनील भोसले यांना धारेवर धरले. पदाधिकाऱ्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक उद्धव रूपचंदानी यांना भेटून मागण्या मांडल्या. त्यानंतर आंदोलकांनी टोल आकारणीच्या ठिकाणी धाव घेत, काही वाहने टोल विना सोडून देण्यास भाग पाडले. 

शिंदे ग्रामस्थांचेही आंदोलन 
शिंदे ग्रामस्थांनी सरपंच माधुरी तुंगार व जि. प. चे माजी सदस्य संजय तुंगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्यात, शिंदे ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय टोल नाका सुरू करू नये, शिंदे ग्रामस्थांकडून टोल आकारणी न करता त्यांना शंभर टक्के मोफत पास द्यावेत, अपूर्ण रस्त्याचे काम, शिंदेतील रहिवाशांसाठी भुयारी मार्ग, मारुती मंदिराचे दोन्ही स्लॅब, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि महादेव मंदिराजवळ बंधाऱ्यांचे आश्‍वासन पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.

Web Title: nashik news NCP Shiv sena