सामाजिक कार्यातील योगदानामुळे सुदृढ समाजनिर्मिती - प्रतापराव पवार 

सामाजिक कार्यातील योगदानामुळे सुदृढ समाजनिर्मिती - प्रतापराव पवार 

नाशिक - संस्था कुठलीही असो, ती चालविणारी माणसे कशी आहेत, यावर त्या संस्थेची प्रगती अवलंबून असते. समाजाचे कामसुद्धा संस्थेप्रमाणे चालते. समाज घडविण्यासाठी चांगल्या माणसांची आवश्‍यकता आहे, तसेच चांगला समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने सामाजिक योगदान देणे महत्त्वाचे ठरते. सुदृढ समाजनिर्मितीसाठी प्रत्येकाने सामाजिक कार्यात योगदान द्यायला हवे, असे प्रतिपादन "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी आज येथे केले. 

नाशिक फर्स्ट संस्थेच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त "चिल्ड्रन ट्रॅफिक एज्युकेशन पार्क'मध्ये झालेल्या कार्यक्रमात "सामाजिक कार्यात माध्यमांची भूमिका' या विषयावर उपस्थितांशी श्री. पवार यांनी संवाद साधला. सामाजिक योगदानाचे सल्ले अनेकदा ऐकायला मिळतात, पण क्रियाशील होणे गरजेचे आहे, असे सांगत मान्यवरांनी भाषणात नाशिकच्या तुलनेत पुण्याची प्रगती झाली, या केलेल्या उल्लेखाचा धागा पकडत श्री. पवार म्हणाले, की पुणेकर सामाजिक कार्यासाठी वेळ देतात. प्रत्येक नाशिककराने सामाजिक कार्यात योगदान दिल्यास नाशिकला चांगले भवितव्य आहे. जगात जसे वाईट घडते तसे चांगलेही घडते. चांगल्याला माध्यमांमधून प्रसिद्धी मिळाली पाहिजे. 

नाशिक फर्स्टबद्दल गौरवोद्‌गार 
उपस्थितांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना श्री. पवार म्हणाले, की एकविचाराचे कार्यकर्ते एकत्र आणण्यासाठी फारसे प्रयत्न करण्याची आवश्‍यकता नाही. ध्येय साध्य करण्यासाठी पुढे चालत राहा. एकविचाराचे कार्यकर्ते आपोआप मागे येतील. "नाशिक फर्स्ट' संस्थेने आठ वर्षांपूर्वी सामाजिक योगदानासाठी ठोस भूमिका घेतली. त्या वेळी आपल्याला समाजाचा पाठिंबा मिळेल का?, असा विचार केला नाही. त्यामुळे आज संस्था यशस्वीरीत्या सामाजिक योगदान देत आहे. 

प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर म्हणाले, की पायाभूत सुविधा निर्माण होण्यातून नाशिक स्मार्ट शहर होणार नाही. नाशिक स्मार्ट होण्यासाठी समाजाविषयी जागरूकता महत्त्वाची आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देऊन नागरिकांना 32 सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या. 
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी, स्मार्ट नाशिकमध्ये व्यक्तीही स्मार्ट व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. "नाशिक फर्स्ट'चे अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. शहर विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या वाटचालीचा दृक-श्राव्य माध्यमातून जितेंद्र शिर्के यांनी सादरीकरण केले. संस्थेला सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार केला. महिंद्र ऍन्ड महिंद्रचे उपमहाव्यवस्थापक कर्नल चंद्रा बॅनर्जी, महापालिकेचे शहर अभियंता यू. बी. पवार, एबीबी इंडियाचे उपाध्यक्ष गणेश कोठावदे, श्रीकांत कारोडे व अभय बाग यांचा सत्कार करण्यात आला. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, भारत दूरसंचार निगमचे महाप्रबंधक नितीन महाजन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील आदी उपस्थित होते. संचालक मिलिंद जांबोटकर यांनी आभार मानले. 

कृषी निर्यात अन्‌ वायनरी सामर्थ्य 
देशातील सर्वोत्कृष्ट वायनरी नाशिकमध्ये आहे. जगाच्या कानाकोपऱ्यांत नाशिकची वाइन पोचली आहे. नाशिकच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतमाल निर्यातीला सुरवात केली आहे. काळाची गरज ओळखून नाशिककरांनी बदल घडवून आणला. यात शेतीचे अर्थकारण विकसित करण्याची क्षमता आहे. निराश न होता सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्यास निश्‍चित ध्येय गाठता येते, हे नाशिककरांनी दाखवून दिल्याचे गौरवोद्‌गार श्री. पवार यांनी काढले. 

सामाजिक कार्यात "सकाळ'चे योगदान 
सामाजिक कार्यात "सकाळ'ने प्रारंभापासून योगदान दिले आहे. गेल्या अडीच वर्षांत राज्यातील पाचशे गावे दुष्काळमुक्त केली. जलयुक्त शिवार योजनेतून भूजलपातळी वाढवली. गणेशोत्सवात पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण लक्षात घेऊन "तंदुरुस्त पोलिस बंदोबस्त' संकल्पना राबविली. "तनिष्का' अभियानाच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा उल्लेख श्री. पवार यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com