मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी साकारल्या नयनरम्य गणेशमूर्ती

जयेश सूर्यवंशी
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

सागरने आपल्या इतर सहा बंदिवानाच्या मदतीने तीन ते चार फूट उंचीच्या 175 गणेश मूर्ती साकारत सागर पवारने त्या आकर्षक रंग व नयनरम्य सजावट करून  कारागृहाच्या प्रगती केंद्रात विक्रीसाठी ठेवल्या. अवघ्या दोन दिवसात या सर्व गणेश मूर्ती हातोहात विकल्या गेल्या

जेलरोड (नाशिक) - "मातीच्या ढिगाऱ्याला कधी कोणी नमस्कार करतांना पाहिले आहे का?किंवा रस्त्यामध्ये पडलेली माती पायदळी तुडवली गेली म्हणून कोणाला वाईट तरी वाटले आहे का? पण  एकाने ती माती तुडवली.....तिच्यावर संस्कार केले.....मग त्या मातीपासून एक सुंदर आकर्षक गणेश मूर्ती बनवली ...पूर्वी जे लोक ज्या मातीला दूर लोटत होते ते आत्ता त्या मातीला नमस्कार करू लागले. तेच हात जोडले जाऊ लागले. मातीवर जे संस्कार झाले त्यामुळे हे घडले.....संस्कारांनी मातीचा देव होतो.....मग माणसाचा का होणार नाही?......संगत हि संस्काराची जननी ....माणसाच्या सवयी संस्कारावर अवलंबून असतात. परिसराचा परिणाम माणसाच्या प्रवृत्तीवर होतो व जसे वातावरण लाभले, तसा माणूस घडत असतो''

अगदी असेच घडले आहे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात   ....

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात  कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील पहिला पथदर्शी उपक्रम राबविण्यात आला आहे. शिक्षा भोगत असतांना सागर पवार या बंदीवानाने आपल्यातील कलाकार व सर्जनशीलता जागृत ठेवत  स्वतः हुन कारागृह अधीक्षकांना सांगितले की साहेब मी शाडू मातीपासून सुबक गणपती मूर्ती साकारू शकतो. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांनी सागरच्या सर्जनशीलतेवर विश्वास ठेवत .त्याला गणेश मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक शाडू माती, नैसर्गिक रंग व इतर साहित्य उपलब्ध करून दिले. सागरने आपल्या इतर सहा बंदिवानाच्या मदतीने तीन ते चार फूट उंचीच्या 175 गणेश मूर्ती साकारत सागर पवारने त्या आकर्षक रंग व नयनरम्य सजावट करून  कारागृहाच्या प्रगती केंद्रात विक्रीसाठी ठेवल्या. अवघ्या दोन दिवसात या सर्व गणेश मूर्ती हातोहात विकल्या गेल्या. नाशिकला बंदीवानांचे पुनर्वसन करण्यासाठी कारखाना कार्यरत आहे. त्यामध्ये बंदीवानांतील सुप्त गुण ओळखून त्यांना विविध वस्तूंचे प्रशिक्षण दिले जाते.

पूढील वर्षी लवकर नियोजन करून साधारण पणे 2000 गणेश मूर्ती बनविन्याचे उद्दिष्ट असल्याचे कारागृह अधीक्षक साळी यांनी सकाळशी बोलताना सांगितले.सागरला कारागृह अधीक्षक राजकुमार साळी, कारखाना व्यवस्थापक पल्लवी कदम,वरिष्ठ तुरुंग अधिकारी अशोक कारकर  यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: nashik news: prisoners ganesh festival