'उत्पादन शुल्क'चे परवाने आता मिळणार ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 डिसेंबर 2017

नाशिक - सरकारी कार्यालये डिजिटल होत असताना, आता यात राज्य उत्पादन शुल्क विभागही मागे राहिलेला नाही. मद्यविक्री, मद्यपरवाने यासह मद्य व्यावसायिकांना लागणाऱ्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या परवान्यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज राहिलेली नाही. "आपलं सरकार' यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन एका क्‍लिकसह आपल्याला हव्या असलेल्या परवान्यासाठी अर्ज करता येणार आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागात सर्वसामान्यांशी निगडित कामे नसली तरी मद्याशी संबंधित परवाने याच विभागाकडून दिले जातात. बिअर अथवा वाइन शॉपी सुरू करण्यापासून ते परमिट रूमपर्यंतचे परवानेही दिले जातात. तसेच, मद्यपानासाठीचे एकदिवसीय, वर्षासाठी व आजीवन स्वरूपाचे परवाने दिले जातात. यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून दिले जाणार परवाने आता ऑनलाइन मिळू शकणार आहेत. याकरिता राज्य सरकारच्या "आपलं सरकार' या पोर्टलवर किंवा stateexcise.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन is of doing bussiness येथे क्‍लिक करून ऑनलाइन अर्ज करता येईल.

उत्पादन शुल्क विभागाकडून दिले जाणारे परवाने आता ऑनलाइन मिळू शकणार आहेत. त्यासाठीच्या संकेतस्थळाचा वापर केल्यास कार्यालयात येण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. परवानाधारकांनी नूतनीकरणासाठीही संकेतस्थळाचा वापर करावा.
- प्रसाद सुर्वे, उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

Web Title: nashik news production tax permission online