पर्जन्यराजाने फिरवली आगमनाची द्वाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नाशिक/ नाशिक रोड - उन्हाची तगमग टिपेला पोचली असतानाच सात दिवस आधीच पर्जन्यराजाने आपल्या आगमनाची द्वाही संपूर्ण शहरभर फिरवली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

काल दुपारी हवामानात अचानक बदल होऊन गारवा निर्माण झाला. ढग दाटून आले व पावसाला सुरवात झाली. शहरातील काही भागांत विजाही कडाडल्या. शहरातील पंचवटी, गंगापूर, तसेच सिडको, सातपूर, पाथर्डी या भागात सायंकाळच्या दरम्यान जोरदार सरी कोसळल्या. नाशिक रोड परिसरातील जेल रोड, शिंदे, पळसे, विहितगाव, देवळालीगाव, एकलहरे, सामनगाव, सिन्नर फाटा, चेहेडी आदी भागांत पावसाने चांगली हजेरी लावली. 

विजेच्या लपंडडावामुळे नागरिक हैराण झाले होते. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. हातगाडी व रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची एकच धावपळ उडाली, तसेच काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याचेही समजते. त्यात पेठ रोडवर मुक्तानंद स्वीट्‌सजवळ सुरू असलेल्या दुभाजकाच्या कामादरम्यान डंपर उलटल्याची घटना घडली. विजेच्या लपंडावाचा फटका व्यापारी व दुकानदारांना बसला. 

शासकीय कार्यालय व बॅंकांमध्येही विजेचा लपंडाव सुरू असल्याने कामकाजावर परिणाम झाला. पावसामुळे नाशिक रोडच्या सखल भागात पाणी साचले. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत होता. एक ते दीड तास हजेरी लावल्यानंतर पाऊस थांबला. मात्र, त्यानंतर पुन्हा उष्म्याने नागरिकांना हैराण केले. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिमझिम व विजेचा लपंडाव सुरू होता. त्याचप्रमाणे रात्री अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तसेच, घरोघरी बत्ती गुल झाल्याने महिला त्रस्त झाल्या होत्या.

Web Title: nashik news rain