परतीच्या पावसाने सलग चौथ्या दिवशी झोडपले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नाशिक - चार दिवसांपासून नाशिकला विजेच्या कडकडाटांसह जोरदार परतीच्या पावसाने कहर केला. गंगापूर धरणातून सरासरी दोन हजार २०० क्‍यूसेक पाणी सोडल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. वाघाडीसह आजूबाजूच्या नैसर्गिक नाल्यामधून धो-धो पाणी वाहत असून, पंचवटीतील गोदाकाठ परिसरातील व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. 

नाशिक - चार दिवसांपासून नाशिकला विजेच्या कडकडाटांसह जोरदार परतीच्या पावसाने कहर केला. गंगापूर धरणातून सरासरी दोन हजार २०० क्‍यूसेक पाणी सोडल्याने गोदावरीच्या पातळीत वाढ झाली आहे. वाघाडीसह आजूबाजूच्या नैसर्गिक नाल्यामधून धो-धो पाणी वाहत असून, पंचवटीतील गोदाकाठ परिसरातील व्यावसायिकांची एकच धावपळ उडाली. 

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह इतर भागालाही परतीच्या पावसाने झोडपले. गंगापूर धरण अगोदरच भरलेले असल्याने त्यात आणखी वाढ झाली. त्यामुळे दोन हजार २०० क्‍यूसेक पाणी सोडण्यात आले. हे सोडलेले पाणी तसेच इतर नैसर्गिक नाल्यांतून गोदावरीत मिसळणारे पाणी यामुळे गोदावरीच्या पातळीत वाढ झाली. रामकुंड परिसरात दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. रामकुंड परिसरातील पार्किंग संपूर्ण पाण्याखाली गेल्याने वाहनांना बंदी करण्यात आली. दिवाळीनिमित्त शिराया, पणत्या, उटणे तसेच इतर दिवाळीचे साहित्य विक्रेत्यांनीही दुकाने थाटली आहेत. त्यांच्यावरही परिणाम झाला. 
 
व्यावसायिकांचे दुहेरी नुकसान
मध्य प्रदेशातून आलेले शिराई विक्रेत्यांना अगोदरच त्यांच्या भागात पावसाने झालेले नुकसान सहन करावे लागले. आता नाशिकला आल्यानंतरही त्यांना गोदेच्या पाण्याचा सामना करावा लागला. शिराईच्या गोण्या झाकण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. साई मंदिराच्या मागे पार्किंग परिसरात असलेल्या टपऱ्या व्यावसायिकांनी सुरक्षेच्या कारणामुळे तेथून हलवल्या. कपालेश्‍वर पोलिस चौकीसमोर या टपऱ्या तात्पुरत्या ठेवल्या. टपऱ्यांमधील सामानाची आवराआवर सुरू होती. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापेक्षाही वर पाणी असल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला.

गंगाघाटावर सर्वत्र पाणी आल्याने धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांनाही त्रास सहन करावा लागला. म्हसरूळ भागात वाघाडीच्या पातळीत वाढ होऊन पूर आला. वाल्मीकनगरमधील काही घरांमध्येही पावसाचे पाणी शिरले. सायंकाळी महापालिका गस्त वाहनांतून वाल्मीकनगरसह वाघाडी नदीक्षेत्रात येणाऱ्या विविध भागांतील रहिवाशांना सावधनतेचा इशारा देण्यात आला.  

पावसामुळे वाहतूक कोंडी
शहर-परिसरात दुपारनंतर होणाऱ्या परतीच्या पावसाने आज पुन्हा हजेरी लावली आणि शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. त्यामुळे अनेक मार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली. त्यात अनेक ठिकाणची सिग्नल व्यवस्था कोलमडून पडल्याने वाहनांची कोंडी होऊन चालकांची चांगलीच धांदल उडाली. शहर-परिसरात आज दुपारी साडेचारच्या सुमारास परतीच्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे काही क्षणात रस्ते जलमय झाले. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. विशेषत: सीबीएस सिग्नल, मेहेर सिग्नल, शालिमार चौक, गंजमाळ सिग्नल, त्र्यंबक नाका, रविवार कारंजा या ठिकाणी कोंडी झाली. ठक्कर बाजार रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली. सिटी सेंटर मॉलमध्ये सिग्नल बंद पडल्याने पोलिसांची वाहतूक सुरळीत करताना चांगलीच दमछाक झाली.

Web Title: nashik news rain