पहिल्याच मुसळधारेने महापालिकेचे पितळ उघड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नाशिक - शहरात दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. मृग नक्षत्राच्या दुसऱ्या पावसातच पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला. उपनगरांमध्ये महापालिकेने करोडो रुपये खर्चून केलेल्या पावसाळापूर्व कामांचीही पोलखोल झाली. यामुळे कामांवर संशय व्यक्त होत आहे. सुमारे दीड तासाच्या मुसळधारेमुळे शहरातील वाहतूक तब्बल दोन ते तीन तास ठप्प झाली; तर अनेक भागांमध्ये अर्धी वाहने डुबतील इतके पाणी साचल्याने शहराला तळ्याचे स्वरूप आले. यामुळे वाहतुकीचे मार्गही बदलावे लागले. गोदावरी, नासर्डी नद्या तासाभरातच खळाळून वाहू लागल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली.

नाशिक - शहरात दीड तास झालेल्या मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. मृग नक्षत्राच्या दुसऱ्या पावसातच पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला. उपनगरांमध्ये महापालिकेने करोडो रुपये खर्चून केलेल्या पावसाळापूर्व कामांचीही पोलखोल झाली. यामुळे कामांवर संशय व्यक्त होत आहे. सुमारे दीड तासाच्या मुसळधारेमुळे शहरातील वाहतूक तब्बल दोन ते तीन तास ठप्प झाली; तर अनेक भागांमध्ये अर्धी वाहने डुबतील इतके पाणी साचल्याने शहराला तळ्याचे स्वरूप आले. यामुळे वाहतुकीचे मार्गही बदलावे लागले. गोदावरी, नासर्डी नद्या तासाभरातच खळाळून वाहू लागल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली.

दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना सायंकाळी मुसळधार पावसाने दिलासा मिळाला. पण, पावसामुळे झालेल्या हानीचीच चर्चा अधिक झाली. महापालिकेने केलेल्या कामांचा आणि भुयारी व पावसाळी गटारींचा उपयोग नसल्याचे स्पष्ट झाले. सीबीएस येथील भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने तत्काळ मार्ग बंद करण्यात आला. हॉटेल एमराल्ड पार्कजवळ गुडघाभर पाणी साचल्याने वाहनांना ये-जा करणे मुश्‍कील झाले. त्र्यंबक रोडवरील धामणकर चौकात पावसात एसटी बस बंद पडल्याने आयटीआय सिग्नलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जलतरण तलावाजवळ वाहतूक ठप्प झाल्याने स्थानिकांच्या मदतीने तासाभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. मायको सर्कलवर वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूक ठप्प झाली. 

उपनगरांमध्ये पाणीच पाणी अन्‌ मार्गही बदलले
महात्मानगर भागातील कॉलन्यांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने वाहनांना प्रतिबंध करण्यात आला. आयटीआय सिग्नलजवळ रस्त्यावर झाड कोसळल्याने एकेरी वाहतूक करणे भाग पडले. सिटी सेंटर मॉल चौकात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शरणपूर रोड चौकातही पाणी साचल्याने वाहनांना गंगापूर रोडमार्गे वळविण्याची वेळ आली.

पावसाळापूर्व कामांचा बोजवारा
महापालिकेतर्फे उन्हाळ्यात पावसाळापूर्व कामे करण्यात आली होती. त्यात गोदावरी व नासर्डी नदीपात्रातील अडथळे दूर करण्याचे महत्त्वाचे काम होते; पण नद्यांना मिळणारे नाले तुंबल्याने पाणी बाहेर येऊन घरांमध्ये शिरले. त्यामुळे नदीपात्रात केलेली कामे फोटोसेशनपुरती मर्यादित राहिली. पावसाळी व भुयारी गटारींचा व्यास मुंबईतील नाल्यांपेक्षा अधिक असल्याचा दावा त्या वेळी करण्यात आला होता. त्या नाल्यांमधील पाणी बाहेर येऊन वसहतींमध्ये शिरल्याने महापालिकेचा हा दावाही फोल ठरला. अनेक भागांमध्ये गटारींचे ढापे हटविले गेले नाहीत; तर ढाब्यांवर प्लास्टिक चिकटल्याने पाणी तुंबले होते.

बंगले, रो-हाउसमध्ये शिरले पाणी
इंदिरानगर ः इंदिरानगरसह पाथर्डी फाटा भागातील सखल भागात पाण्याची तळी साचली. साईनाथनगर भागात काही बंगल्यांमध्ये व रो-हाउसमध्ये पावसाचे पाणी शिरले. गत वर्षाचा अनुभव लक्षात घेता नगरसेविका रूपाली निकुळे आणि माजी नगरसेवक यशवंत निकुळे यांनी शिवाजीवाडी आणि भारतनगर भागात पाहाणी केली. वासननगर येथील पाणीनी सोसायटीच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पाथर्डी गाव परिसरात असलेले छोटे नाले दुथडी भरून वाहत होते. वडाळा-पाथर्डी रस्त्याला पांडवनगरीचा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला होता. वनवैभव, सदिच्छानगर, किशोरनगर, चेतनानगर, प्रशांतनगरमधील काही रो- हाउसमध्ये पाणी शिरले होते.

आठवडे बाजारात व्यावसायिकांची धावपळ
गंगाघाटावरील बुधवारच्या आठवडे बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांची चांगलीच धावपळ उडाली. काही विक्रेत्यांचा पावसात भाजीपालाही वाहून गेला.

धान्याचे मोठे नुकसान
आठवडे बाजारातील गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी विक्रेत्यांना धान्य झाकण्यास वा सुरक्षित ठिकाणी नेण्यासही वेळ मिळाला नाही. त्यामुळे अनेक विक्रेत्यांचे धान्य भिजून मोठे नुकसान झाले.

काझीची गढीवरील नागरिकांची धावपळ
काझीची गढीवरील रहिवाशांची चांगलीच धावपळ झाली. दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम झाला. जनजीवन विस्कळित झाले. पावसाचा जोर जास्त असल्याने ठिकठिकाणी पाण्याचे तळे साचले होते. या भागातील पावसाळापूर्व कामांचाही बोजवारा उडाला. या कामांकडे दुर्लक्ष केल्याने बऱ्याच भागातील घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.

पावसामुळे झालेले नुकसान
काळाराम मंदिराच्या पश्‍चिम दरवाजाजवळ झाड पडले
आयटीआय सिग्नल येथे झाडाच्या फांद्या रस्त्यावर पडल्या
महात्मानगरमधील गणपती मंदिरासमोर झाड पडले
सिडकोतील माऊली लॉन्सजवळ झाड पडले
महात्मानगरमधील अपार्टमेंटच्या प्रांगणात झाड पडले

या भागात साचले पाणी...
सीबीएस येथील भुयारी मार्ग
नागसेननगरमधील झोपडपट्ट्यांमध्ये शिरले पाणी
वडाळा गावातील गरीब नवाज कॉलनी, घरांमध्ये पाणी
कुटे मार्गावरील मीरा बंगल्यासमोर पाण्याचे डबके
आनंदवली गावात नाल्याचे पाणी शिरले घरांमध्ये
गंगापूर रोडवरील खतीब डेअरीमागे अपार्टमेंटमध्ये पाणी
सराफ बाजारातील अलंकार मार्केटमधील दुकानांमध्ये पाणी

Web Title: nashik news rain nashik municipal corporation