आता असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले!

आता असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले!

नाशिक - एरवी कार्यकर्त्यांशी फारसा संवाद न साधणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये आगमन होताच लॉबीत कार्यकर्त्यांसोबत मांडी घालून संवाद साधला. त्या वेळी माध्यमांना संबोधून ते म्हणाले, की जमिनीवर बसलो म्हणून असं म्हणू नका, की राज ठाकरे जमिनीवर आले. मला संवाद साधायचा आहे, असे म्हणताच टाळ्या वाजवून कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जमिनीवर बसले. 

महापालिका निवडणुकीनंतर तब्बल आठ महिन्यांनंतर पदाधिकारी मेळाव्यानिमित्त राज ठाकरे यांचे आज रात्री शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले. त्या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आपली सत्ता गेली अन्‌ विकासकामांचे वाटोळे झाले. महापालिकेच्या आपल्या काळात आपण केलेली विकासकामे सत्ताधारी भाजपवाल्यांनी स्मार्टसिटीमध्ये  घुसवून स्वतःची पाठ थोपटून घेतली. शहरात गुन्हेगारी वाढलीय, साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे, आपल्या काळातील प्रकल्पांची वाट लावली, गरज नसताना जुन्या रस्त्यांवर डांबर ओतण्यासाठी अडीचशे कोटींचा खर्च केला जात आहे, इथपासून ते मराठी क्रमांकाच्या नंबरप्लेट काढून टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर केला जातोय इथपर्यंतच्या मनातील भावना कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यासमोर मोकळ्या केल्या. 

शहरातील रुग्णालयांमध्ये सुविधा नसल्याने बालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, गुन्हेगारीने तोंड वर काढले, वाहतूक बेटांची तोडफोड केली जात आहे, धार्मिक स्थळांचे चुकीचे सर्वेक्षण, मनसेच्या सत्ताकाळातील तयार रस्त्यांवर डांबर ओतून ते नवीन दाखविण्याचा होत असलेला प्रयत्न याबाबत कार्यकर्त्यांनी मन मोकळे केले. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, अमित ठाकरे, डॉ. प्रदीप पवार, ॲड. राहुल ढिकले, रतन लथ, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख आदी उपस्थित होते.
 

लोकांना विकास कळत नाही
कार्यकर्त्यांकडून तक्रारींचा ओघ सुरू असताना लोकांना या गोष्टी माहीत आहे का, असा सवाल करताच ‘होय’ असे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले. लोक विकासाच्या ऐरवी गप्पा मारतात; परंतु मतदानाच्या वेळी विकास विसरतात असे सांगत राज यांनी महापालिका निवडणुकीच्या पराभवाची खदखद व्यक्त केली. मनसेच्या सत्ताकाळातील कामे व आत्ताच्या सत्ताकाळातील कामे लोकांना कळू द्या, मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘आता आरे ला कारे’ म्हणण्याचे शिकले पाहिजे. मी पक्ष स्थापन केला, त्या वेळी माहीत नव्हते, माझ्यामागे कोण येईल? त्यामुळे तुम्हीसुद्धा आपल्या मागे कोण आहे? याची वाट पाहू नका अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा सल्ला त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com