विशेष मुलांची माय ‘रजनीताई’!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

विशेष मुलांची माय रजनीताई लिमये यांनी अखेरचा श्‍वास घेतला अन्‌ मोठी पोकळी तयार झाली. रजनीताई थकल्या, तरी त्यांचा उत्साह कायम होता. ‘हसू निरागस ओठी, नेत्री सदा स्नेह ज्योती, जीवन हे त्यांच्यासाठी फक्त हेच खरे’ या रजनीताईंनी लिहिलेल्या ओळी खूप काही सांगून जातात...

‘यत्न तो देव जाणावा’ हे बोधवाक्‍य घेऊन प्रबोधिनीचे काम सुरू करताना नामदेवांनी विठुरायाजवळ जसा हट्ट धरला, तसा वसा रजनीताईंनी घेतला होता. पुष्पावती रंग्ठा कन्या विद्यालयात चाळीस वर्षांपूर्वी शिक्षिका असलेल्या रजनीताईंनी विशेष (गतिमंद) मुलांसाठी नाशिकमध्ये पहिली शाळा काढण्याचा संकल्प केला. १ जानेवारी १९७७ ला ‘आनंदी भुवन’ वास्तुत शाळा सुरू केली. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी विशेष (गतिमंद) मुलांना मायेच्या ममतेने सांभाळणे ही एक थोर तपस्या आहे. विशेष मुलांचे (गतिमंदाचे) जीवन अर्थपूर्ण करणे हे एक महान कार्य आहे. उद्या विज्ञान गतिमंदावर मात करील, हे त्या वेळी मतिमदांची सेवा करण्याचे स्मरण सर्वांना होईल आणि निःसंशय या पायातल्या चिऱ्यावर ते यशोमंदिर उभे राहील, अशी शुभेच्छा शाळेसाठी देऊन रजनीताईंच्या कामाला एक भरारी देण्याचे काम केले होते. हेच वाक्‍य त्यांना प्रेरणादायी ठरले.

चाळीस वर्षांपूर्वीची इतिहासाची पाने चाळत गेल्यावर त्या काळी विशेष मुलांना योग्य शिक्षण दिल्यावर ती त्यांच्या पायावरही उभे राहू शकतात, हे रजनीताईंनी पटवून दिल्याचे प्राकर्षाने डोळ्यांपुढे उभे राहते. 

थोर शिक्षकतज्ज्ञ प्र. ग. अकोलकर यांचे मार्गदर्शन, डॉ. शिरीष सुळे यांचे वैद्यकीय सहाय्य, कमलताई सारडा यांची आर्थिक मदत आणि रावसाहेब ओक यांनी शाळेसाठी दिलेली जागा यामुळे ही संस्था रजनीताई उभ्या करू शकल्या. प्रबोधिनीचे काम वाढत असल्याने ताईंना पैशांची मोठी कसरत करावी लागत होती. संस्थेला सरकारी मान्यता मिळविताना सरकारच्या समाजकल्याण विभागाने तीन अटी घातल्या होत्या. त्या म्हणजे, शाळेला मोठी जागा, मुलांची सरासरी हजेरी पंधरा, शिक्षक प्रशिक्षित असावा याचा त्यात समावेश होता. 

पहिल्या दोन अटींची पूर्तता करता येणे शक्‍य होते. मात्र प्रशिक्षित शिक्षक कुठून आणायचे, हा प्रश्‍न होता. पुण्याला जाऊन शिक्षण घ्यायला कुणीही तयार होत नव्हते. त्या वेळी ताईंनी स्वतः पुण्याला जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वेळी पती नागेश लिमये यांची मोलाची साथ लाभली. ताईंचा मुलगा गौतम शाळेचा प्रेरणास्रोत ठरला. गौतम शाळेचा पहिला विद्यार्थी होता. 

देणगीदारांचे दातृत्व मोठेच
प्रबोधिनीचा विस्तार होत गेला. पाच मुलांना घेऊन एका खोलीत चालू केलेली शाळा मोठ्या इमारतीत भरू लागली. आता शाळेत चारशेहून अधिक विद्यार्थी आहेत. सुसज्ज फिजिओथेरपी सेंटर, मोठी कार्यशाळा, बालवाडी, सुंदर बगीचा, स्वतःच्या बसगाड्या आदी बाबी देणगीदारांच्या मदतीने होत गेल्या. प्रबोधिनी विद्यामंदिर, संरक्षित कार्यशाळा, सुनंदा केले विद्यामंदिर, वसतिगृह विशेष मुलांचा वटवृक्ष बनलेत. विशेष मुलांच्या वर्तनाच्या समस्या कमी करून त्यांना त्यांच्या कुटुंबात व समाजात सुरक्षित स्थान मिळवून देणे, हे मुख्य ध्येय डोळ्यांपुढे ठेवून ताईंनी विशेष मुलांच्या ‘ममत्व’ या विषयावर अभ्यास, संशोधन केले. 

वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या इमारती ट्रस्टने उभ्या केल्या. संगीत, कला, व्यायामाच्या मदतीने व्यक्तीविकास करण्याचा प्रयत्न ताईंनी केला. 
 ‘भोगेल जे दुःख त्याला 
सुख म्हणावे लागेल
 एवढे मी भोगीले की 
मज हसावे लागेल
 ठेविले आजन्म डोळे 
आपुले मी कोरडे 
 पण दुजांच्या आस्वांनी 
मज भिजावे लागेल’ 

 असा कृतिशील वास्तुपाठ ताईंनी घालून दिला आहे. हे सामाजिक कार्य पुढे नेण्यातून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरणार आहे. ताईंना विनम्र श्रद्धांजली !

पूनम यादव, खजिनदार, प्रबोधिनी ट्रस्ट

Web Title: nashik news Rajnitai Limaye