प्रबोधिनी ट्रस्टच्या रजनीताई लिमये यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

नाशिक - मानसिकदृष्ट्या अपंग मुलांच्या प्रगतीसाठी आयुष्य वेचणाऱ्या अन्‌ प्रबोधिनी ट्रस्टच्या संस्थापक-अध्यक्षा रजनीताई नागेश लिमये (वय 82) यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार कुटुंबीयांनी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान केले. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक विजया वाड यांच्या त्या मोठ्या भगिनी होत.

गेल्या दोन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. स्वतःचा मुलगा गौतम हा मानसिकदृष्ट्या अपंग असल्याचे निदान झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात अशा विशेष मुलांसाठी कुठेही शिक्षणाची सोय नाही, असे त्यांच्या लक्षात आले. त्यातून त्यांनी 1 जानेवारी 1977 रोजी कुमुदताई ओक, डॉ. शिरीष सुळे यांच्या मदतीने प्रबोधिनी शाळेची सुरवात केली.

Web Title: nashik news rajnitai limaye death