‘तनिष्कां’चा पर्यावरण रक्षणाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नाशिक - ‘तनिष्का’ व्यासपीठातर्फे शहर आणि जिल्ह्यातील ‘तनिष्कां’नी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वडाच्या झाडाजवळ साचलेले निर्माल्य आणि कचरा एकत्रित करून झाडाला मोकळा श्‍वास घेण्यास जागा करून दिली.

नाशिक - ‘तनिष्का’ व्यासपीठातर्फे शहर आणि जिल्ह्यातील ‘तनिष्कां’नी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वडाच्या झाडाजवळ साचलेले निर्माल्य आणि कचरा एकत्रित करून झाडाला मोकळा श्‍वास घेण्यास जागा करून दिली.

वटपौर्णिमेनिमित्त राजीवनगर, स्वामी विवेकानंदनगर, देवळाली, गोविंदनगर येथील गटांसोबतच जिल्ह्यातील येवला, झोडगे येथील ‘तनिष्कां’नी परिसर स्वच्छतेची मोहीम राबविली. हजारोंच्या संख्येने महिलांनी आज वडाची पूजा केली. मात्र, ही पूजा करत असतानाच निर्माल्य तसेच झाडाला वाहिले जाणारे पूजेचे साहित्य यामुळे कचऱ्याचा ढीग साचल्याने दुसऱ्या दिवशी दुर्गंधी सुटते. या वर्षी ‘तनिष्कां’नी पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी करण्याचा संकल्प करत आपापल्या भागात स्वच्छतेचा संदेश दिला. मालेगाव तालुक्‍यातील झोडगे येथील तनिष्का गटाच्या प्रमुख वैशाली देसाई यांच्यासह ‘तनिष्कां’नी या उपक्रमात सहभागी झाल्या. राजीवनगर तनिष्का गटातर्फे पूजेच्या ठिकाणी निर्माल्य गोळा करण्याची मोहीम राबविली. नाशिक पश्‍चिमच्या प्रतिनिधी अनिता सोनवणे, मंजूषा पत्की, रेणुका मराठे, निर्मला सावंत, सुनीता शुक्‍ल, नीता बिडवई, स्वामी विवेकानंदनगर गटाच्या गटप्रमुख अनिता जाधव, तनिष्का सदस्या तथा नगरसेविका संगीता जाधव, छाया गायकवाड, वैशाली भामरे आदी महिला सहभागी झाल्या. या गटातर्फे वडाच्या रोपांची लागवड करण्यात आली. देवळाली येथील तनिष्का प्रतिनिधी जयश्री गाडेकर यांच्या गटातर्फे उपक्रम राबविण्यात आला. चांदवड तालुक्‍यातील पिंपळणारे येथील तनिष्का गटातर्फे वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. चांदवडच्या तनिष्का प्रतिनिधी डॉ. मनीषा पाटील यांच्यासह पिंपळणारे येथील तनिष्का सदस्या उपस्थित होत्या. 

जेल रोडला खत तयार करण्याचे धडे
जेल रोड येथील तनिष्का प्रतिनिधी वैशाली राठोड यांच्या गणेश आराधना तनिष्का गटातर्फे पूजेसाठी आलेल्या महिलांकडून निर्माल्य संकलित करून त्यांना निर्माल्यापासून खत तयार करण्याचे धडे देण्यात आले. तसेच कडुनिंब, चिंच, आवळा, वड अशा औषधी रोपांची लागवड करण्यात आली. सर्व फळे तिथे आलेल्या गरीब मुलांना वाटून दिली. चंद्रकला साबळे, नगरसेविका रंजना बोराडे, माधुरी मनियार, ज्योती बने, रोटे ताई, प्रज्ञा वाकचौरे, शारदा जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: nashik news Sakal Tanishka women