पंचवीस वर्षांनी भरली पुन्हा ‘त्यांची’ शाळा

नाशिक - सीडीओ मेरी शाळेच्या १९९२ च्या दहावीत असलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी.
नाशिक - सीडीओ मेरी शाळेच्या १९९२ च्या दहावीत असलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यात उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थी.

नाशिक - पंचवीस वर्षांपूर्वी शिकत असलेले माजी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक. तोच जोश; तोच अनुभव. परदेशातील स्थायिक झालेल्यांनी साधलेला ऑनलाइन संवाद. जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा ‘त्यांची’ शाळा भरली. निमित्त होते, सीडीओ-मेरी हायस्कूलमधून १९९२ मध्ये दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.

सीडीओ-मेरी शाळेच्या १९९२ मध्ये दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आज सीडीओ-मेरी हायस्कूलच्या प्रांगणात झाला. या मेळाव्यानिमित्त शाळेची आकर्षक सजावट केली होती. मेळाव्यात नाशिकसह बेंगळुरू, जालना, औरंगाबाद, भरूच, मुंबई, पुणे, कल्याण, कऱ्हाड, चंद्रपूर अशा वेगवेगळ्या भागांतून सुमारे १५० विद्यार्थी सहभागी झाले होते. सेल्फी काढण्यासाठीही विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. प्रत्येक माजी विद्यार्थ्यांची माहिती दाखविणारी चित्रफीत, माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. मनोगत व्यक्त करताना अनेक माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. योगेश भंडारी, नितीन कांबळे, सचिन यादव, पंकज गवांदे यांनी परदेशातून, तर विजय जगताप याने गुजरातमधून संवाद साधला.

रेखा जोशी हिने स्वागतगीत म्हटले. माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते मेळाव्यात सहभागी झालेल्या शिक्षकांचा सत्कार झाला. सकाळी नऊला भरलेली शाळा सायंकाळपर्यंत सुरू होती. शाळा सुटू नये, असे प्रत्येकाला वाटत होते. परतताना माजी विद्यार्थिनींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. राजेश राजवाडे, योगेश जाधव, संदीप मोराडे, मनोज कर्पे, उमाकांत सावदेकर, प्रशांत बर्वे, डॉ. विजय खरात, पराग कान्हेकर, मच्छिंद्र ताजणे, योगिता पंडित, देवयानी साळवे, पद्मा माने, रेखा जोशी, अंजली टिपरे, रेखा पुरी, सचिन टिळे आदी सहभागी झाले होते.

शाळेत बसविणार सीसीटीव्ही
शाळेची सुरक्षितता लक्षात घेता १९९२ च्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले जाणार आहेत. त्यामुळे पूर्ण शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणाखाली येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com