वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

रोशन खैरनार
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

आज सकाळी ११ वाजता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात एकत्रित आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'बहोत हो गई मेहंगाई की भरमार, अब तो बस करो मोदी सरकार', 'महागाई वाढविणार्याा केंद्र सरकारचा धिक्कार असो', 'पेट्रोल व डीझेलची दरवाढ मागे झालीच पाहिजे', 'शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी सुरु केल्याने परिसर दणाणून गेला होता.

सटाणा : पेट्रोल, डीझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ आज सटाणा शहर शिवसेनेतर्फे येथील बसस्थानकासमोरील विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर तब्बल तासभर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक दुतर्फा ठप्प झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या आंदोलनाद्वारे सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने मित्रपक्ष भाजपला घरचा आहेर दिला आहे. 

आज सकाळी ११ वाजता शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे व शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात एकत्रित आले. यावेळी कार्यकर्त्यांनी 'बहोत हो गई मेहंगाई की भरमार, अब तो बस करो मोदी सरकार', 'महागाई वाढविणार्याा केंद्र सरकारचा धिक्कार असो', 'पेट्रोल व डीझेलची दरवाढ मागे झालीच पाहिजे', 'शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे' अशी घोषणाबाजी सुरु केल्याने परिसर दणाणून गेला होता. यानंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर बैलगाडी उभी करून ठिय्या दिला व वाहने अडवून रास्ता रोको आंदोलन सुरु केले.

यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे म्हणाले, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. नोटबंदीचा फटका आणि जीएसटीच्या अंमलबजावणीच्या त्रुटी कायम असून, त्यात आता महागाईने भडका घेतला आहे. त्यामुळे भाजप सरकार देशात महागाई कमी करण्यास अपयशी ठरल्याने येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. येत्या आठ दिवसात शासनाने शेतकरी कर्जमुक्तीचा निर्णय घेऊन जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही श्री. सोनवणे यांनी यावेळी दिला. तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले.

आंदोलनात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख आनंदा महाले, अनिल सोनवणे, शरद शेवाळे, मुन्ना सोनवणे, हेमंत गायकवाड, युवा सेना तालुकाप्रमुख चेतन पाटील, शहरप्रमुख अमोल पवार, सचिन सोनवणे, दुर्गेश विश्वंभर, राजनसिंग चौधरी, शेखर परदेशी, रवींद्र जाधव, राजेंद्र पवार, बापू कर्डीवाल, विक्रांत पाटील, शुभम सोनवणे, राजू जगताप, मंगलसिंग जोहरी, जीवन गोसावी, संदीप कसबे, ललित सोनवणे, अशोक अहिरे, जनार्दन सूर्यवंशी, प्रवीण सोनवणे, समीर शेख, पपू शेवाळे, दीपक गांगुर्डे आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

Web Title: Nashik news Shiv Sena agitation against BJP