पक्षांतर्गत एकोप्यासाठी शिवसेनेचा ‘मिसळ फॉर्म्युला’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नाशिक - वर्षानुवर्षे ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या मदतीने राजकारणात बस्तान बसविले, त्याच भाजपचा नाशिक रोड बालेकिल्ल्यातील वरचष्मा संपविण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.

नाशिक - वर्षानुवर्षे ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या मदतीने राजकारणात बस्तान बसविले, त्याच भाजपचा नाशिक रोड बालेकिल्ल्यातील वरचष्मा संपविण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.

पक्षांतर्गत वैरी विसरून गटातटात विभागलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एकोप्यासाठी नाशिक रोडमध्ये एकत्र जमत मिसळ पार्टीच्या निमित्ताने कानामागून येऊन सत्ताकारणात तिखट झालेल्या भाजपला जागा दाखवून देण्याचा नववर्षाचा संकल्प सोडला. महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपासून शिवसेनेतील पक्षांतर्गत मतभेद टोकाला गेले. पक्षाचेच उमेदवार पाडण्यापर्यंत शिवसेनेतील गटबाजी विकोपाला गेली. विकोपाला गेलेल्या वादावर मिसळ पार्टीच्या निमित्ताने पडदा टाकून पुन्हा एकदिलाने कामाचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नववर्षाचा संकल्प सोडला. मिसळ पार्टी हे एकत्र येण्याचे निमित्त ठरले. नाशिक रोडचे माजी प्रभाग सभापती केशव पोरजे, प्रकाश म्हस्के यांच्या पुढाकारातून झालेल्या मिसळ पार्टीला माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, महापालिका गटनेते विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, राजेंद्र लवटे आदीसह आजी- माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

तरुणांचा सहभाग
या मिसळ पार्टीत तालुक्‍यातील विविध गावांतील नव्या युवा कार्यकर्त्यांना संयोजनात विशेष महत्त्व दिले होते. आमदार योगेश घोलप यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपविण्याची मागणी केली.

खासदार गोडसे यांनी सगळ्यांच्या एकत्रित मंथनसाठी दर तीन महिन्यांनी मिसळ पार्टीच्या धर्तीवर बैठका घेण्याची सूचना मांडली. जिल्हाप्रमुख करंजकर यांनी, मिसळ म्हणजे एकत्रीकरण होय. हाच मिसळ पार्टीचा हेतू कामकाजात पाळून कुणाला बाहेर काढून न टाकण्याची भूमिका ठेवावी, असे सांगितले. महानगरप्रमुख बोरस्ते यांनी शिवसेनेच्या प्रत्येक विजयी टप्प्यात देवळालीपासून झालेली सुरवात हा शुभसंकेत राहिला आहे. नववर्षातील शिवसेनेच्या मिसळ पार्टीच्या निमित्ताने तोच कित्ता वर्षभर पुढे नेला जावा, असे आवाहन केले. गटनेते विलास शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांचे हे मनोमिलन शिवसेनेला पूर्वीचे वैभव मिळवून देईल, असा विश्‍वास व्यक्त केला. माजी सभापती अनिल ढिकले, मुद्रणालयाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आदींसह गावोगावचे सरपंच उपस्थित होते.

तिखट भाजपवर उपाय
मिसळ हे जरी निमित्त असले तरी खरा हेतू ‘भाजपचे वाढते प्रस्थ रोखणे’ हाच होता. भाजपचे नाव न घेता, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या बोलण्यातून ‘जे आपले (शिवसेनेचे) बोट धरून सत्तेत आले, तेच आता तिखट होत चालले. त्यामुळे कानामागून येऊन राजकारणात तिखट होत चाललेल्या भाजपला धडा शिकविण्याचा संकल्प सोडला. त्यावर दर तीन महिन्यांनी अशाच पद्धतीने एकत्र येऊन हितगूज करण्याचा फॉर्म्युला मांडला गेला.

Web Title: nashik news shivsena misal formula