नाशिकला बसस्थानकांवर प्रवाशांची झुंबड

nashik
nashik

नाशिक : राज्य परीवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था पुर्वपदावर येत आहे. आज सकाळपासून महामंडळाच्या बसगाड्या प्रवाश्‍यांची वाहतुक करत होत्या. काही मार्गांवर प्रवाश्‍यांना चक्‍क उभे राहून प्रवास करावा लागला. दरम्यान बसगाड्या सुरू झाल्याने संप काळातील तिकीट रद्द करणे तसेच आरक्षणासाठी बसस्थानकावर लांब रांगा लागल्या होत्या. तर दुसरीकडे ऑनलाईन आरक्षणासाठी महामंडळाचे संकेतस्थळ हॅंग झाल्याने काहींना मनस्तापाला सामोरे जावे लागले. 

जिल्हाभरातील बसस्थानकांवर आज गर्दी बघायला मिळाली. शहरातील ठक्‍कर बाझार बसस्थानक परीसरात सकाळपासून प्रवाश्‍यांची लगबग सुरू झाली होती. धुळे, औरंगाबादसह पुणे मार्गावरील गाड्यांना भरघोस प्रतिसाद लाभत होता. बहुतांश गाड्या प्रवाश्‍यांनी गच्च भरलेल्या होत्या. तर जुने सीबीएस बसस्थानकावरुन जिल्हांतर्गत सटाणा, कळवण, देवळा यांसह साक्री, नंदुरबार आदी ठिकाणांसाठी गाड्या सोडण्यात आल्या. या गाड्यांनाही प्रवाश्‍यांना प्रतिसाद लाभला. 

दरम्यान यापूर्वी तिकीट आरक्षित केलेले असतांना, संपामुळे प्रवास होऊ न शकल्याने अनेक प्रवाश्‍यांनी तिकीटाचे पैसे परत मिळविण्यासाठी बसस्थानक गाठले होते. तिकीटाचा परतावा मिळविणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. तर आजपासून पुढील तिकीटे बुक करण्यासाठीदेखील मोठी गर्दी झाली होती. आरक्षणासाठी मोठ्या रांगा लागल्याने व ज्येष्ठ नागरीकांसाठी कुठलीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने तासंतास रांगेत उभे राहिलेल्या ज्येष्ठ नागरीकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. 

शहर बस वाहतुक झाली सुरळीत 
दरम्यान संप काळात शहर वाहतुकदेखील ठप्प झाली होती. संप मिटल्यानंतर सिटी बसदेखील धावू लागल्या आहेत. त्यामुळे शहर वाहतुक सेवादेखील पूर्वपदावर येत आहे. पंचवटी, नाशिकरोड, अंबड, सातपुरसह अन्य मार्गांवरील सिटीबसलाही मोठी गर्दी पहायला मिळाली. दिवाळीच्या सुट्या असल्याने त्र्यंबकेश्‍वरला जाणाऱ्या गाड्यांनाही गर्दी होती. 

खासगी वाहतुकदारांनी केली दरात कपात 
ऐरवी संप काळात अव्वाच्या सव्वा भाडे आकारणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समार्फत संप मिटल्यानंतर दरात कपात करण्यात आली आहे. संपाच्या वेळी नाशिक-पुणे मार्गावर पाचशे ते दोन हजार रूपयांपर्यंत भाडे आकारले जात असतांना सद्य स्थितीत तीनशे रूपये साधी गाडी तर आठशे रूपये एसी गाडीसाठी भाडे आकारले जात आहेत. त्याप्रमाणे अन्य शहरांसाठीच्या भाड्यातही खासगी वाहतुकदारांनी कपात केली असून बसस्थानकावरुन प्रवासी पळविण्याचा प्रयत्न दिवसभर सुरू राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com