स्वाइन फ्लू, डेंगीचा उद्रेक आणि विळखा

विक्रांत मते
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

‘सर्वे भवन्तु सुखिनः’ असे सर्वांना सुखी करण्याचे, सुखी ठेवण्याचे आकर्षक घोषवाक्‍य आपल्या बोधचिन्हावर झळकविणारी महापालिका आरोग्याच्या बाबतीत उदासीन दिसते. स्वतंत्र आरोग्य विभाग, पुरेशी यंत्रणा आणि अंदाजपत्रकात कोट्यवधीची तरतूद असतानाही नाशिककरांचे उत्तम, निरोगी आरोग्य राखण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यामुळेच वाढत्या अस्वच्छतेबरोबरच स्वाइन फ्लू, डेंगीसारख्या आजारांनी नाशिककरांना घट्ट विळखा घातला आहे. शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यासाठी एकीकडे यंत्रणा सज्ज होत आहे, तर दुसरीकडे हीच यंत्रणा दिवसागणिक वाढणाऱ्या स्वाइन फ्लू, डेंगी रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यात कुचकामी ठरू लागली आहे.

‘सर्वे भवन्तु सुखिनः’ असे सर्वांना सुखी करण्याचे, सुखी ठेवण्याचे आकर्षक घोषवाक्‍य आपल्या बोधचिन्हावर झळकविणारी महापालिका आरोग्याच्या बाबतीत उदासीन दिसते. स्वतंत्र आरोग्य विभाग, पुरेशी यंत्रणा आणि अंदाजपत्रकात कोट्यवधीची तरतूद असतानाही नाशिककरांचे उत्तम, निरोगी आरोग्य राखण्यात सपशेल अपयश आले आहे. त्यामुळेच वाढत्या अस्वच्छतेबरोबरच स्वाइन फ्लू, डेंगीसारख्या आजारांनी नाशिककरांना घट्ट विळखा घातला आहे. शहरात महास्वच्छता अभियान राबविण्यासाठी एकीकडे यंत्रणा सज्ज होत आहे, तर दुसरीकडे हीच यंत्रणा दिवसागणिक वाढणाऱ्या स्वाइन फ्लू, डेंगी रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यात कुचकामी ठरू लागली आहे. या आजारांचा घेतलेला हा आढावा...

नाशिक महापालिकेच्या ‘आरोग्याची ऐशीतैशी’ असे क्षणभर खोचक वाटत असलेले वाक्‍य कुणी उच्चारले तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही नाही. आजची परिस्थिती तशीच आहे. नाशिककरांच्या आरोग्याची खरोखरच दैना झाली आहे. शहरात स्वाइन फ्लू व डेंगीने थैमान घातले आहे. या आजाराचे रुग्ण शहरात सातत्याने वाढत असून, सध्या शहरातील विविध रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या ३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यातच ६१ रुग्ण दगावले आहेत. अर्थात ही आकडेवारी सरकारी दरबारातील आहे. प्रत्यक्षात शहरात आजमितीला हजारो रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. नागरिकांचा रोष नको म्हणून आकडेवारी लपविली जात आहे. 

आधुनिक जगात असाध्य आजारांवर उपचार निघाले असताना स्वाइन फ्लू व डेंगीच्या आजारांमुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. स्वाइन फ्लूचा विचार करता २००९ पासून नाशिकमध्ये प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते. गेल्या आठ वर्षांत शहरात स्वाइन फ्लूने १९३ रुग्ण दगावले आहेत. आठ वर्षांत तब्बल ५६ हजार ३७८ लोकांची स्वाइन फ्लू रुग्ण म्हणून तपासणी करण्यात आल्याने यातून आजाराची वर्षागणिक व्याप्ती वाढत आहे.

पंधरा दिवसांत डेंगीचे १६५ संशयित रुग्ण
स्वाइन फ्लूपाठोपाठ शहरात डेंगीने थैमान घातले आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये म्हणजेच गेल्या पंधरा दिवसांत शहरात १६५ डेंगी संशयित रुग्ण आढळले. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार ६२ रुग्णांना डेंगीची लागण झाली आहे. यंदा डेंगीमुळे जुने नाशिक भागातील कथडा येथील शेख आयेशा या बालिकेचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्यात डेंगीचे ९४  संशयित रुग्ण आढळले होते. त्यातील चौदा रुग्णांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले. ऑगस्ट महिन्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या १७४ झाली. चाचणीतून ९७ रुग्णांना डेंगी झाल्याचे स्पष्ट झाले.

यांना आहे धोका
‘स्वाइन फ्लू’ हा H१N१ या स्वतःमध्ये बदल झालेल्या विशेषतः डुकरांमध्ये आढळणाऱ्या; पण आता माणसांमध्ये वेगाने पसरणाऱ्या विषाणूंमुळे होणारा आजार आहे. मेक्‍सिकोत याची सुरवात होऊन जगभरातील जवळपास शंभर देशांत तो पसरला आहे. ६५ वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्ती, पाच वर्षांपेक्षा कमी वयाची  बालके, दमा किंवा दीर्घकालीन श्‍वसनरोग असलेल्या व्यक्ती, मधुमेही व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, कुपोषित मुले किंवा प्रौढ, मद्यपान किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, विविध आजारांमळे किंवा अन्य कारणांमुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्तींना अधिक धोका असतो.

Web Title: nashik news swine flu, dengue sickness