तासिका कमी केल्याच्या निषेधार्थ कला-क्रीडाशिक्षकांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नाशिक - कलाशिक्षक व क्रीडाशिक्षकांच्या तासिका कपातीच्या निर्णयास विरोध करण्यासाठी कलाशिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले.

नाशिक - कलाशिक्षक व क्रीडाशिक्षकांच्या तासिका कपातीच्या निर्णयास विरोध करण्यासाठी कलाशिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले.

कलाशिक्षक समन्वय समिती, व्हिजन नाशिक, कलाशिक्षक महासंघासह विविध संघटनांचे शिक्षक पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते. शासनाने २८ एप्रिलला नवीन निर्णय घेत २०१७-१८ शैक्षणिक वर्षापासून नवीन तासिका धोरण लागू करण्याचा निर्णय घेत नववीच्या विषयांच्या तासिकांच्या नियोजनात शारीरिक शिक्षण विषयाचा ५० टक्के कार्यभार कमी केला. कार्यानुभव विषयाचे २५ टक्के तास कमी केले. मूळ अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण व कार्यानुभवासाठी आठ टक्के कार्यभारानुसार ५० तासिकांऐवजी ४५ तासिका केल्याने या विषयावर व ते शिकविणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याची तक्रार आहे. पूर्वी प्रत्येक वर्गास चार तासिका असताना त्यात कपात करीत आता केवळ दोन तासिका ठेवण्यात आल्या आहेत. शासनाचे शिक्षण क्षेत्रातील रोजचे विविध बदल करण्याचे प्रयत्न असफल ठरत असताना या नव्या प्रयोगाने विद्यार्थ्यांच्या आवडीचे व तणावमुक्त हसतखेळत शिक्षणाचे विषय संपविण्यात येत असल्याचा आरोप या वेळी शिक्षकांनी केला. तासिका कपातीचे परिपत्रक मागे घ्यावे; कला, कार्यानुभव, संगीत, क्रीडा तासिका पूर्वीप्रमाणे कराव्यात, कलाशिक्षकांची रिक्त पदे भरावीत, विद्यार्थी संख्येचे कारण पुढे करून शिक्षक अतिरिक्त ठरवू नये, सहावी ते आठवीच्या शिक्षकांना प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांत गणले जाते, तसे न गणता कर्मचारी सूची मंजुरीवेळी स्वतंत्र कलाशिक्षक म्हणून दाखवावे; कला, संगीत, कार्यानुभव या अभ्यासक्रमात बदल करताना संघटना प्रतिनिधी, तज्ज्ञ अभ्यास मंडळाच्या सदस्यांना विश्‍वासात घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्तात्रय सांगळे, भगवान तेलोरे, प्रवीण पवार, प्रल्हाद साळुंके, सचिन पगार, मंगेश घुगे, प्रशांत पांडे, योगेश कल्हे, आरती बुरकुल, द. वा. मुळे, दिनेश आहिरे, अमोल जोशी, संजय पाटील, संजय चव्हाण, किरण काळे, प्रशांत भाबड, रवींद्र मोरे आदींसह शिक्षकांनी निवेदन दिले.

Web Title: nashik news teacher