अपग्रेड शाळांवर शिक्षकांची उसनवारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

नाशिक - इयत्ता आठवी व नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विषयाचे ज्ञान असणारे पूर्णवेळ शिक्षक द्यावेत किंवा विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करावे, अशी मागणी पालकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली. 

नाशिक - इयत्ता आठवी व नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पूर्णवेळ शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विषयाचे ज्ञान असणारे पूर्णवेळ शिक्षक द्यावेत किंवा विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करावे, अशी मागणी पालकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे केली. 

मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथे आयएसओ मानांकनप्राप्त इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शासकीय निवासी इंग्रजी आश्रमशाळा असून, या ठिकाणी शेकडो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात गेल्या वर्षी शाळांच्या श्रेणीत वाढ करत इयत्ता आठवी व नववीचे नवीन वर्ग सुरू करण्यात आले. हे करत असताना इंग्रजी माध्यमासाठी आवश्‍यक असलेल्या शिक्षकांची भरती न करता या शाळांकडून उसनवारीसारखे काही शिक्षक काही दिवसांसाठी देण्यात आले. 

कळवण व सुरगाणा तालुक्‍यातील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे शाळेत पूर्णवेळ शिक्षक नसल्याचे सांगताच पाल्यांचे होणारे नुकसान पाहता, पालकांनी थेट प्रकल्प अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. शाळेवर पूर्णवेळ शिक्षक द्यावेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, अशी मागणी केली. प्रकल्प कार्यालयाने काही दिवस तक्रार आलेल्या शाळांवर इतर शाळांमधील शिक्षकांची काही दिवसांसाठी नियुक्ती केली; परंतु कालांतराने पुन्हा "जैसे थे' परिस्थिती झाली. त्यामुळे वारंवार निवेदन देऊनही या ठिकाणी शिक्षकांची भरती करण्यात न आल्याने आणि विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान पाहून संतप्त पालकांनी शुक्रवारी (ता. 1 जून) पुन्हा प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेत शाळेवर पूर्णवेळ शिक्षकांची नेमणूक करावी; अन्यथा विद्यार्थ्यांचे समायोजन करावे, अशी मागणी केली. जर शाळेवर शिक्षक दिले नाही किंवा इतर शाळेत समायोजन केले नाही, तर मुलांसह बेमुदत उपोषणाचा इशाराही पालकांकडून देण्यात आला. 

संबंधित शाळांवर 30 जूनपर्यंत विविध विषयांचे शिक्षक नियुक्त केले जातील. 
- अमन मित्तल,  प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग 

Web Title: nashik news teacher school