महापालिका रुग्णालयांमध्ये खासगीकरणातून चाचण्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

नाशिक - महापालिकेच्या पाच रुग्णालयांमध्ये रक्ताचे नमुने घेऊन चाचण्या करण्याची व्यवस्था असली तरी आता खासगीकरणातून चाचण्या होणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्याच रुग्णालयांमध्ये जागाही उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याबदल्यात महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे.

नाशिक - महापालिकेच्या पाच रुग्णालयांमध्ये रक्ताचे नमुने घेऊन चाचण्या करण्याची व्यवस्था असली तरी आता खासगीकरणातून चाचण्या होणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्याच रुग्णालयांमध्ये जागाही उपलब्ध करून दिली जाणार असून, त्याबदल्यात महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्तांमधील विविध घटक तपासण्यासाठी पॅथॉलॉजी लॅब आहेत. पण पॅथॉलॉजिस्ट नसल्याने त्या निरर्थक ठरत आहेत. गरीब रुग्णांना खासगी लॅबमधूनच विविध प्रकारच्या चाचण्या करून घ्याव्या लागतात. खासगी चाचण्यांचे दर अधिक असल्याने महापालिकेच्या उपचाराला जेवढा खर्च येत नाही, त्यापेक्षा कितीतरी पटीने चाचणी करण्याचा खर्च येत असल्याने गरीब रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागते. पॅथॉलॉजिस्ट नसल्याने महापालिकेने सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर पॅथॉलॉजिस्ट नियुक्त करण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला होता. महासभेने मंजुरी देताना पाच वर्षे कराराने जागा देण्याचे निश्‍चित केले होते.

परंतु त्यास प्रतिसाद न मिळाल्याने दहा वर्षांसाठी पॅथॉलॉजिस्ट तयार झाले. त्यानंतरही चारदा निविदाप्रक्रिया राबविण्यात आली, त्या वेळीही प्रतिसाद मिळाला नाही. अटी- शर्ती शिथिल केल्यानंतर २०१७ मध्ये सहा निविदाधारकांचा समावेश झाला. त्यानुसार आजच्या स्थायी समितीवर प्रस्ताव ठेवल्यानंतर त्यास मंजुरी देण्याचे स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी घोषित केले.

महापालिकेला २० लाखांचे उत्पन्न
महापालिकेच्या नाशिक रोड येथील जेडीसी बिटको रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय तसेच जुने नाशिकमधील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय येथे खासगी लॅबसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रक्ताच्या चाचण्या वगळून इतर सर्व चाचण्या होतील. केंद्र सरकारच्या हेल्थ सर्व्हिसेसप्रमाणे दर राहतील. चार रुग्णालयांमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. जागेच्या बदल्यात महापालिकेला वार्षिक सुमारे वीस लाख रुपये उत्पन्न मिळेल.

Web Title: nashik news test from privatization in municipal hospitals