पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेत पर्यटन केंद्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

औरंगाबाद दौऱ्यानंतर महापौरांची घोषणा; स्वतंत्र भवनाची निर्मिती

नाशिक - येथील धार्मिक व नैसर्गिक पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरात पर्यटन केंद्र स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिका स्वतः पर्यटनस्थळांचे मार्केटिंग करणार आहे. या माध्यमातून पर्यटकांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच शहराचा नावलौकिक वाढण्यास मदत होईल. हेच लक्षात घेऊन औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर केंद्र उभारणार आहे, असे महापौर रंजना भानसी यांनी आज जाहीर केले. 

यांत्रिकी झाडूच्या माध्यमातून औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या स्वच्छतेच्या पाहणीसाठी आज नाशिक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा अभ्यासदौरा काढण्यात आला होता. दौऱ्यानंतर महापौरांनी पर्यटन केंद्राची घोषणा केली. दौऱ्यात उपमहापौर प्रथमेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेते दिनकर पाटील, मनसेचे गटनेते सलीम शेख, भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, पश्‍चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील, नगरसेवक उद्धव निमसे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हिरे आदी सहभागी झाले होते.

औरंगाबादच्या उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समिती सभापती गजानन बारवाल, शिवसेनेचे गटनेते मकरंद कुलकर्णी, काँग्रेस गटनेते भाऊसाहेब जगताप यांनी प्रकल्पाची माहिती दिली. यांत्रिकी झाडूची पाहणी करतानाच औरंगाबाद महापालिकेतील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. औरंगाबाद व परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महापालिकेने पर्यटन केंद्र स्थापन केले आहे. नाशिकचे केंद्रही तसेच असेल. त्या जोडीला पर्यटन भवनही उभारले जाईल, असेही महापौर भानसी यांनी सांगितले.

असे असेल पर्यटन केंद्र
पर्यटन केंद्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करून जनसंपर्क विभागातर्फे कामकाज केले जाईल. महापालिका मुख्यालयासह ज्या भागाकडून पर्यटकांचे नाशिकमध्ये आगमन होते, त्या सीबीएस, नाशिक रोड रेल्वेस्थानक, मुंबई नाका या भागात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात येईल. रामकुंड, श्री काळाराम मंदिर, कपालेश्‍वर, सीतागुंफा, तपोवन, चामरलेणी, पांडवलेणी, बोटॅनिकल गार्डन, इतिहास संग्रहालय, दादासाहेब फाळके स्मारक, त्र्यंबकेश्‍वर, सप्तशृंगगड, टाकळी येथील समर्थ रामदास स्वामी मठ आदी धार्मिक व मनोरंजन स्थळांची माहिती दिली जाईल. पोलिसांचे क्रमांक, ब्लड बॅंक, खासगी वाहनांसाठी संपर्क आदी माहिती त्यात राहील.

शासनाकडून जागेसाठी प्रयत्न
औरंगाबाद महापालिकेतर्फे सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय चालविले जाते. नाशिकमध्येही मनोरंजन पार्क उभारण्यासाठी प्रयत्न असेल. त्यासाठी ‘मेरी’कडील दीडशे एकर जागेपैकी शंभर एकर जागेची मागणी केली जाईल. पार्कमध्ये फायबरचे प्राणी, मत्स्यालय, मनोरंजन पार्क करण्याचे प्रयत्न राहणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

Web Title: nashik news Tourist center in municipal