शिवभक्‍तांनी गजबजला त्र्यंबकेश्‍वर- ब्रह्मगिरी परिसर

अरुण मलाणी
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पावसाने दडी दिल्याने भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले.

नाशिक : श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारनिमित्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी काल (ता.6) रात्रीपासून मोठ्या संख्येने भोलेभक्‍त त्र्यंबकेश्‍वर परीसरात दाखल झाले होते. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालत आज सकाळी भाविकांनी फेरी पूर्ण केली. "बम बम भोले', "ॐ नम: शिवाय'चा गजर करताना भाविकांनी भोलेनाथाकडे चांगल्या आरोग्यासाठी साकडे घातले. पावसाने दडी दिल्याने भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले. परंतु सकाळी आठच्या सुमारास झालेल्या रिमझिम पावसाने सहभागींचा थकवा घालवत उत्साह भरला.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरीचे व्हिडीओ पहा "सकाळ'नाशिकच्या फेसबुक पेजवर-
या लिंकवर क्‍लिक करा

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा फेरीसाठी नाशिक शहरातील मेळा बसस्थानक येथून बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. काल सायंकाळी सातनंतर बसस्थानकावर गर्दी वाढायला सुरवात झाली. गच्च भरलेल्या बसगाड्यांतून शिवभक्‍त त्र्यंबकेश्‍वरला दाखल झाले होते. त्र्यंबक राजाचे दर्शन घेत व विधीवत पद्धतीने कुंडात स्नान करत भाविकांनी रात्री उशीरा प्रदक्षिणेला सुरवात केली. रात्रभर ब्रह्मगिरी पर्वतासभोवतालच्या परीसरातून भाविकांनी चाल सुरू ठेवली. काही भाविकांनी पहाटे पाचच्या सुमारास प्रदक्षिणा पूर्ण केली होती. तर सहानंतर भाविकांचे जथ्थे फेरी पूर्ण करत त्र्यंबकेश्‍वर बसस्थानकात दाखल होत होते. तर अनेकांनी सकाळच्या वेळी फेरीला सुरवात केली. दमलेल्या, थकलेल्या भाविकांसाठी चहा, साबुदाणा खिचडी, पाण्याची व्यवस्था सामाजिक संस्थांतर्फे केली होती.

दरम्यान भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता तळेगाव येथून पुढील मार्गावर खासगी वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे त्र्यंबकेश्‍वर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनाही बसने प्रवास करावा लागला. श्रावणी सोमवार असल्याने त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.
(सर्व छायाचित्रे : केशव मते)

Web Title: nashik news trimbakeshwar brahmagiri shiva bhakt