फेसबुक हॅक करून गंडा घालण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

नाशिक - दोन आठवड्यांपूर्वी व्हॉट्‌सऍप हॅक करून एकच धुमाकूळ घालणाऱ्या हॅकरला गजाआड केल्यानंतर आता एकाने तरुणाचे फेसबुक हॅक करून भावनिक कारण देत त्याच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली. मात्र, सजग मित्रांनी तत्काळ संबंधित मित्राला फोन करून; काय अडचण आहे, अशी विचारणा केली असता खरा काय तो उलगडा झाला. त्यानंतर त्या सर्व मित्रांनी सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिल्यानंतर फेसबुक हॅक करून गंडा घालण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

व्हॉटस्‌ऍप हॅक करून महिला-युवतींची झोप उडविणाऱ्या घटनेला दोन आठवडे उलटत नाही, तोच मंगेश बाळू काठे यांचे फेसबुक हॅक करण्यात आल्याचा हा प्रकार घडला आहे. मंगेश यांचे फेसबुकवर 656 मित्र आहेत. गेल्या मंगळवारी (ता. 11) मंगेश यांच्या फेसबुक मेसेंजरवरून त्यांच्या मित्रांना अडचणीत असल्याचा मेसेज गेला आणि दिलेल्या मोबाईल क्रमांकावर रिचार्ज करण्यास सांगितले. मेसेज वाचून मंगेशच्या काही मित्रांना शंका आली. त्यांनी लगेचच मंगेशला फोन करून विचारणा केली. त्या वेळी आपण असा मेसेज केला नसल्याचे त्याने सांगितले. तेव्हा त्यांना आपले फेसबुक अकाउंट हॅक झाले असल्याचा उलगडा झाला. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार हे तपास करीत आहेत.

Web Title: nashik news Trying to add to Facebook hacking