शहरात सरासरी  ३६ टक्के पाणीगळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नाशिक - शहराला केल्या जाणाऱ्या पाण्याचे परीक्षण करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या सर्वेक्षण कंपनीकडून बारापैकी दोन झोनचे प्राथमिक अहवाल पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले असून, त्यातून शहरात सरासरी ३६ टक्के पाणीगळती होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. एकूण गळतीपैकी थेट पाणीगळतीच्या प्रमाणत अठरा, तर उर्वरित पाणीगळतीत अनधिकृत नळधारक, पाण्याचे बिल कमी असणे व मीटर रीडिंगमध्ये फरकाचा समावेश आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाणी उचलल्यानंतर नळांपर्यंत पोचेपर्यंत थेट पाणीगळती होत असल्याच्या आरोपांना यानिमित्त पूर्णविराम मिळाला आहे.

शहरातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने ऑक्‍टोबर २०१६ मध्ये एनजेएस इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड कंपनीला काम दिले. पाण्याचे सर्वेक्षण करताना कंपनीकडून सहा विभागांत प्रत्येकी दोन याप्रमाणे जलकुंभनिहाय बारा झोन तयार केले. महात्मानगर व सिडकोतील बडदेनगर जलकुंभ या दोन झोनचा प्राथमिक अहवाल मिळाला आहे. या दोन झोनमध्ये साधारण पाच टक्के अनधिकृत नळजोडणी असल्याचे समोर आले. सर्वेक्षणात मीटरची कार्यक्षमता तपासण्यात आली. त्यात दहा टक्के कार्यक्षमता कमी असल्याने बिलिंग कमी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. मिटर रीडिंग घेताना तफावत आढळून आली. त्याचे प्रमाण तीन टक्के आहे. असे एकूण सरासरी अठरा टक्‍क्‍यांची गळती स्पष्ट झाली आहे. उर्वरित म्हणजेच तेवढीच अठरा टक्के थेट गळती असे दोन्ही मिळून ३६ टक्के गळती असल्याचा निष्कर्ष काढला आहे. उर्वरित दहा झोनचा अहवाल ऑक्‍टोबरअखेर मिळणार आहे. त्यानंतर पूर्ण शहरात किती गळती होते, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

या झोनचे सर्वेक्षण सुरू
नहुष, जुने आरटीओ, गांधीनगर, शिवाजीनगर, चढ्ढा पार्क, लुंगे मंगल कार्यालय, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र, भीमनगर, मुक्तिधाम, पवननगर.

२१०० किलोमीटर पाइपलाइन
पाइपचे नेटवर्क तपासणे, गंगापूर व चेहडी पंपिंग स्टेशनपासून ते घरांपर्यंत पाइपलाइनचे सर्वेक्षण करणे, पाणी वितरण व्यवस्था ग्लोबल इन्फोर्मेशन पोझिशनवर घेण्याचे उद्दिष्ट कंपनीला देण्यात आले होते. हे काम शंभर टक्के झाले असून, त्यातून शहरात २१०० किलोमीटरची पाइपलाइन असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी पाणीपुरवठा विभागाकडून फक्त अकराशे किलोमीटर पाण्याची लाइन असल्याचे सांगितले जात होते.

Web Title: nashik news Water leakage