दारू दुकानाविरोधात आंदोलनाची धग कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

तिडके कॉलनीतील दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आठवडाभरात निर्णय

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर आतील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंद झालेली दारू दुकाने शहरातील वेगवेगळ्या भागांत सुरू होऊ लागली आहेत. त्यावरून वाद सुरू झाले आहेत. 

तिडके कॉलनीतील दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा आठवडाभरात निर्णय

नाशिक - सर्वोच्च न्यायालयाने महामार्गापासून पाचशे मीटर आतील दारू विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बंद झालेली दारू दुकाने शहरातील वेगवेगळ्या भागांत सुरू होऊ लागली आहेत. त्यावरून वाद सुरू झाले आहेत. 

दारू दुकान आपल्या भागात नको म्हणत, महिलांची आंदोलने सुरू आहेत. पेठ रोड मार्गावरील मोती सुपर मार्केट भागातील हिरा वाइन्स दुकान तेथून तिडके कॉलनीतील लंबोदर ॲव्हेन्यूमध्ये स्थलांतरित झाले. असाच प्रकार रविशंकर मार्गावरील महाराणी वाइन्स आणि दिंडोरी मार्गावरील अमित वाइन्स या तीन दारू दुकानांमुळे गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. या तिन्ही दुकानांविरोधात आंदोलनाची धग कायम असून, आज ठिकठिकाणी आंदोलने झाली. 

जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी
लंबोदर ॲव्हेन्यूमधील हिरा वाइन्स प्रकरणी जोरदार युक्तिवाद झाला. त्यात परवानगी देणाऱ्या यंत्रणेपुढेच सुनावणी होऊ शकते का, इथपासून तर संबंधित अपार्टमेंटच्या रहिवाशांचे करारपत्र, स्थलांतर प्रक्रियेच्या अटी-शर्ती, नागरिकांचे आक्षेप, विविध परवानग्या याविषयी बाजू ऐकून घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडाभरात निर्णय देण्याचे जाहीर केले. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानग्या घेऊनच दुकान सुरू झाले. त्यात काही अनियमितता आहे का, हे तपासतानाच स्थानिकांच्या विरोधाची बाजू समजून घेतली जाईल, असे सांगितले. दोन्ही बाजूंकडून त्याविषयी लेखी स्वरूपात म्हणणे मांडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

चिमुकले उतरले रस्त्यावर 
डीजीपीनगर परिसरातील रविशंकर मार्गावरील महादेव पार्क सोसायटीच्या तळमजल्यावर सुरू असलेल्या महाराणी वाइन शॉपविरोधात महिलांचे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच होते. सर्व महिला दुकानासमोर टाकलेल्या मंडपात रात्री उशिरापर्यंत बसून होत्या. विशेष म्हणजे लहान मुलेही या आंदोलनात सहभागी झाली. मानवाधिकार असोसिएशनचे अध्यक्ष महंत बिंदू महाराज यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला असून, लवकरच नागरिकांसमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. आंदोलन बघून मालकाने दुकान सुरू करण्याचा प्रयत्न केला नाही. हे दारू दुकान त्वरित बंद करावे, अशी मागणी महंत दीपानंदजी सरस्वती, शीला जाधव, शीतल अडांगळे, मटिल्डा डिसूजा, वैशाली दारूळ, मुख्तार शेख, नाजिया शेख, रब्बानी शेख, आम्रपाली घडे, सनी पगारे, सरिता चौरे यांनी केली.

‘ते’ दारू दुकान शुक्रवारपर्यंत बंद

पंचवटी - दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर परिसरातील अमित वाइन्स हे दारूचे दुकान शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहे. याबाबत आज म्हसरूळ पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीतून कोणताही तोडगा दृष्टिक्षेपात आला नाही. मात्र या दारू दुकानाविरोधातला आपला लढा यापुढेही सुरूच राहील, असे आंदोलक महिलांनी सांगितले.

आरटीओ कॉर्नर परिसरातील भवानी पॅलेस इमारतीत अमित वाइन्स हे विदेशी दारूचे दुकान आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार महामार्गालगतची मद्याची दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याने हे दुकान काही दिवसांपासून बंदच होते. मात्र मध्यंतरी हे दुकान पूर्ववत सुरू झाले. पण तीन दिवसांपासून स्थानिक महिलांनी या दुकानाविरोधात तीव्र आंदोलन छेडत दुकानास विरोध
केला आहे. या महिलांनी भरपावसात मुलाबाळांसह काल दिवसभर ठिय्या आंदोलन करत दारू दुकानाविरोधातील लढा तीव्र केला. आजही सकाळपासून दुकानाजवळ आंदोलन सुरूच होते. 

दरम्यान, म्हसरूळ पोलिस ठाण्यात याप्रश्‍नी दुपारी आंदोलक महिलांसोबत बैठक घेण्यात आली. दरम्यान, बैठकीत चर्चा होऊन पुढील पाच दिवस हे दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील पाच दिवसांत संबंधित व्यावसायिक व दुकानाच्या विरोधातील महिला आपली भूमिका स्पष्ट करतील. 

बैठकीस सहाय्यक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण, म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख, माधवी पाटील, गणेश कदम, मंगला शिंदे, लता मोरे आदी महिला उपस्थित होत्या. 

आज झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार हे दुकान पुढील पाच दिवस बंद राहील. मात्र ते पुन्हा सुरू झाले तरी आम्ही लोकशाही मार्गाने आमचा दुकानाविरोधातला लढा सुरूच ठेवू. हे दुकान दुसरीकडे स्थलांतरित होण्यासाठी आमचा लढा सुरूच राहील.
- मंगला शिंदे, उपाध्यक्षा, भाजप महिला 

Web Title: nashik news wine shop oppose agitation