मका बियाण्यांच्या पिशवीमागे शंभर ते दोनशे रुपयांची वाढ

संतोष विंचू
शुक्रवार, 9 जून 2017

मागील हंगामात पडलेले शेतमालाचे भाव अन कर्जमाफीची वाट पाहणारयां शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरच अजून एक आर्थिक झटका बसला आहे.

येवला - मागील हंगामात पडलेले शेतमालाचे भाव अन कर्जमाफीची वाट पाहणारयां शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरच अजून एक आर्थिक झटका बसला आहे. जिल्ह्यात यंदा सर्वाधिक क्षेत्र मका पिकासाठी गुंतवले जाणार आहे. पण याच मका बियाण्यांच्या कंपन्यानी या वर्षी चार किलोच्या पिशवीमागे शंभर ते दोनशे रुपयांनी वाढ केली आहे. या दर वाढीमुळे संकटातील शेतकऱ्यावर टाकलेला बोजा मानला जात आहे. इतर बियाण्याच्या किमतीत वाढ झाली नाही हि मात्र समाधानाचे म्हणावे लागेल.

जिल्ह्यात तालुकानिहाय पिक पद्धतीत बदल होत असला तरी मका व कांदे मात्र सर्वांचे लाडके पिक आहेत. कांदा, सोयाबीन व कपाशी बेभरवशाची पिके वाटू लागल्यानेच पाऊस लांबला तरी दमदारपणे उत्पन्न देणाऱ्या मकाला अधिक पसंती मिळत आहे. त्यातच मका पिकाने गेल्या तीन-चार वर्षात प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना साथ दिली आहे, पावसाने दगा देऊनही मका पिक तग धरून राहिले. त्यातच प्रक्रिया उद्योगात सतत मागणी वाढती राहिल्याने मकाला देशावर अन परदेशातही चांगला भाव मिळाला. कमी उत्पादन खर्च अन अधिक उत्पन्न असे ही पिक ठरत असून याच कारणाने शेतकरी इतर पिक कमी करून आपला मोर्चा मकाकडे वळवीत आहे. कांदा, तूर व इतर पिकांनी धोका दिल्याने यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत २५ टक्के जास्त क्षेत्र मकासाठी शेतकरी गुंतवणार आहे.  

मका बियाण्याला सतत मागणी वाढत असल्याने इतर सर्व कंपन्यानी कुठल्याच बियाण्यात दर वाढ केलेली नसली तरी यंदा मका कंपन्यानी मात्र वाढ करतांना विचार केलेला दिसत नाही. २०१४ मध्ये याच कंपन्यानी पिशवी एक किलोने कमी करून चार किलो करत दरात ३०० रुपयांपर्यत वाढ केली होती. यंदा या चार किलोच्या पिशवीत पुन्हा वाढ केल्याने शेतकऱ्यांना धक्का बसत असून खरेदीपुर्वीच नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मागील ७५०, ९५० व १२५० रुपयांना असलेल्या बियाण्याच्या पिशव्या यंदा ९००, १०५०, १४०० रुपयांना मिळत आहेत. जिल्यात पायोनियर, अडवन्टा,  सिझेन्नता, जेके, राशी, मोनॅसन्नटो, अजित, धान्या, डव आदि कंपन्यांच्या असलेल्या प्रत्येकी सात ते आठ वानाना शेतकरी पसंती देतात. त्यामुळे पसंतीचे बियाणे घेताना १४०० रुपयापर्यत वाणनिहाय शेतकरयाना मोजावे लागत आहे. शासनाने बीटी-२ कपाशी बियाण्याचा सर्व कंपन्याचा दर ८३० रुपये असा निश्चित केला असतांना मकाच्या बियाणाच्या दरात कंपनीनिहाय बदल का असा सवाल शेतकरी करत आहे.

कपाशी, सोयाबीन, बाजरी, तूर दरवाढ नाही
यंदा कपाशीसह बाजरी, मुग, सोयाबीन आदि बियाणाच्या दरात कुठलीच वाढ झालेली नसून पुरेश्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे कपाशी बियाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे. इतर बियाणे दरवाढ केलेले नसल्याने हा आधार बळीराजाला मिळाला आहे.

“मागील दोन वर्ष मका बियाण्याची दरवाढ झालेली नव्हती. यंदा मात्र १५० ते २०० रुपयापर्यत दर वाढल्याने याची झळ शेतकरी सहन करत आहेत. यावेळी मकाला सर्वाधिक मागणी असून त्याखालोखाल कपाशीचे बियाणे मागणी होत आहे. इतर बियाण्यांची यंदा दर वाढ झालेली नाही. ”
-नितीन काबरा, बियाणे विक्रेते, येवला 

Web Title: nashik news yeola news farmer issue farmer strike