उद्योजकतेच्या दिशेने तरुणाईचे एक पाऊल पुढे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

नाशिक - व्यवसाय, उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण, घ्यावयाची काळजी यासह टाळायच्या चुका... अशा विविध विषयांवर युवक-युवतींना आज मार्गदर्शन लाभले. अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हबच्या प्रांगणात स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व सपकाळ नॉलेज हब आयोजित ‘यिन समर यूथ समीट- २०१७’ पॉवर्ड बाय नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. 

नाशिक - व्यवसाय, उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण, घ्यावयाची काळजी यासह टाळायच्या चुका... अशा विविध विषयांवर युवक-युवतींना आज मार्गदर्शन लाभले. अंजनेरी येथील सपकाळ नॉलेज हबच्या प्रांगणात स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क व सपकाळ नॉलेज हब आयोजित ‘यिन समर यूथ समीट- २०१७’ पॉवर्ड बाय नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या उपक्रमात विविध मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. 

या माध्यमातून सहभागींनी यशस्वी उद्योजकतेचा मूलमंत्र जाणून घेतला. उद्योजकतेच्या दिशेने यानिमित्त तरुणाईने एक पाऊल पुढे टाकले. काल (ता. २८)च्या दिवसानंतर आज सकाळी तरुणाईने तितक्‍यात उत्साहात कार्यक्रमाला उपस्थिती नोंदविली. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सीड इन्फोटेक, सीडीएसएल, सह्याद्री फार्म यांचे उपक्रमास सहकार्य लाभले.

सततच्या प्रयत्नांनी मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये यश -  पवार
अनेक विद्यार्थी केवळ एकदा स्पर्धा परीक्षांचा प्रयत्न करतात. त्यात अपयश आले तर पुन्हा प्रयत्नही करीत नाहीत. स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट करण्याची तयारी, अभ्यासात सातत्य, जिद्द यांसह सततचा प्रयत्न केल्यास स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकेल, असे प्रतिपादन स्पेक्‍ट्रम ॲकॅडमीच्या संचालिका मनीषा पवार यांनी केले. त्या म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांतून असे अनेक करिअरचे पर्याय खुले होतात, ज्यातून प्रतिष्ठीत व आनंदी जीवन जगता येऊ शकते. विशेषत: मुलींना बॅंकिंग व अन्य प्रशासकीय सेवेतील उच्च पदांवर कार्य करताना सामाजिक सेवेची संधीही उपलब्ध असते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना संदर्भ साहित्यही महत्त्वाचे ठरते. 

ब्रिंग महाराष्ट्र ऑनलाइन  उपक्रमात व्हा सहभागी - अल्बर्टो आयोरे
जगाच्या विकासासाठी आपण एखाद्या संकल्पनेचा, तंत्रज्ञानाचा वापर कशा पद्धतीने करू शकू, याचा विचार करताना सुचलेली संकल्पना करिअर घडविणारी ठरू शकते. प्रत्येक जण हा इनोव्हेशन करीत असतो. काही छोट्या स्वरूपात करतात; तर काही मोठ्या स्वरूपात. एखादी कल्पक संकल्पना ही यशस्वी व्यवसायाचा गाभा असू शकते. डिलिव्हरींग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यस्तरावर हाती घेतलेला ब्रिंग महाराष्ट्र ऑनलाइन हा उपक्रम तरुणांना व्यवसाय, उद्योजकतेसाठी प्रेरित करण्याचे काम करणार आहे. या उपक्रमात युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन इटली येथील अल्बर्टो आयोरे यांनी आज येथे केले. ते म्हणाले, की भारतातील शासन हे ऑनलाइन प्रणालीला प्रचंड पाठबळ देत असून, लहान व्यवसाय ऑनलाइन आणण्याची यानिमित्त संधी आहे. यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर स्टार्टअप संकल्पनेत अडकून न पडता व्यवसाय सुरू करा. नफ्याला केंद्रस्थानी ठेवा. अपयश आले तरी ते पचवून पुढे वाटचाल सुरू ठेवावी. 

इन्फॉर्मेशन सिक्‍युरिटीमध्ये  चांगले करिअर - दीपक शिकारपूर
रॅन्समवेअर आला आणि जगभरात विविध देशांनी तब्बल सहा बिलियन डॉलरपर्यंत रक्‍कम खर्चून सायबर सिक्‍युरिटीत वाढ केली. ॲन्टी व्हायरससह अन्य बचावात्मक तंत्रातून अनेकांना रोजगार मिळू शकला. ऑटोमेशनकडे वाटचाल करीत असताना करिअरच्या पर्यायाची योग्य निवड करायला हवी. अतिरेकी कारवायांप्रमाणे भविष्यात सायबरचे धोकेही आहेत. त्यामुळे इन्फॉर्मेशन सिक्‍युरिटी या क्षेत्रात भविष्यात करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन उद्योजक दीपक शिकारपूर यांनी केले. ते म्हणाले, की डिजिटल इंडिया, स्कील इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे डिजिटल क्षेत्रातही करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रात ऑटोमेशन होत असून, अनेक कामे आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून होतात. त्यामुळे आपण निवडलेल्या करिअरच्या पर्यायाचे भविष्य काय, याचा वेधही घेता आला पाहिजे. 

ध्येयाशिवाय अन्य कुठल्याच गोष्टीकडे लक्ष द्यायला नको - नीलय मेहता
जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण मोठ्या घरात जन्माला यावे, आपल्याला वर नेणारी कुणीतरी मोठी व्यक्‍ती भेटावी असा विचार अनेक युवक करतात. परंतु, कष्टाची तयारी आणि स्वत:मधील सामर्थ्याच्या जोरावर यश मिळविणे कठीण नाही. ध्येयाकडे वाटचाल करताना अन्य कुठल्याही गोष्टीकडे लक्ष भटकू द्यायला नको, असे प्रतिपादन नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे नीलय मेहता यांनी आज येथे केले. ते म्हणाले, की भूतकाळावर आपले भविष्य कधीही ठरत नसते. आपण वर्तमानात काय करतो, यावर आपले भविष्य अवलंबून आहे. अन्य कुठल्याही प्राण्याला विचार करण्याची शक्‍ती नाही. फक्‍त माणसालाच स्वत:च्या विचारांनी स्वत:चा विकास करण्याची संधी असते. यशस्वी व्हायचे असेल तर मनावर नियंत्रण मिळविता आले पाहिजे. 

येणारे जग अॅग्रीगेट मार्केटिंगचे - आशिष दालिया
आज प्रत्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागला आहे. ही गोष्ट हेरून राजकीय मंडळी, आरोग्य क्षेत्र यांसह प्रत्येक क्षेत्र सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करीत आहे. येणारे जग ॲग्रीगेट मार्केटिंगचे असल्याने यात करिअर करण्याचा सकारात्मक विचार युवकांनी करायला हवा, असे मत आय-स्पेस नॉलेज फॅक्‍टरी प्रा. लि.चे ‘सीईओ’ आशिष दालिया यांनी व्यक्‍त केले. ते म्हणाले, की सोशल मीडिया म्हणजे केवळ ‘फेसबुक’पुरते मर्यादित राहून चालणार नाही. सोशल मीडियाचा विचार करताना फेसबुकसह ट्‌विटर, स्नॅपचॅट, इस्टाग्राम व अन्य विविध पर्यायांचाही विचार करावा. सध्या तरूणाईमध्ये बोलबाला असलेल्‍या सोशल मीडीयावर ब्लॉग रायटर म्हणूनही करिअर करता येऊ शकते. 

शेती शाश्‍वत व्यवसाय झाल्यास मिटेल रोजगाराचा प्रश्‍न - विलास शिंदे
सध्याच्या परिस्थितीत शहर व ग्रामीण या दोन्हींमध्ये दरी वाढत चालली आहे. ही दरी कमी करण्यासह रोजगाराचा प्रश्‍न मिटवायचा असेल तर शेतीला शाश्‍वत व्यवसाय बनविला पाहिजे, असे मत सह्याद्री ॲग्रो फार्मचे प्रमुख विलास शिंदे यांनी व्यक्‍त केले. ते म्हणाले, की कृषी व कृषी प्रक्रिया उद्योगात अद्यापही मोठा वाव आहे. नाशिकचा विचार केल्यास कृषी क्षेत्रात देशातील अन्य कुठल्याच देशात नाशिकइतक्‍या संधी उपलब्ध नाहीत, असे सांगताना येणारी १५ वर्षे देशाचे भवितव्य घडविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. जर यात अपेक्षित बदल घडला नाही, तर पुढील काळात बदल घडणे अशक्‍य आहे.

विद्यार्थीही करू शकतात शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणूक - ठाकूर
अज्ञानामुळे बहुतांश नागरिकांचा शेअर बाजार हा नावडीचा विषय असतो. पण, शेअर बाजाराविषयी योग्य ती माहिती जाणून घेतल्यास सुरक्षितपणे उत्पन्न मिळविण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थीही अगदी अल्प रकमेतून शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतात, असे प्रतिपादन ‘सीडीएसएल’च्या इन्व्हेस्टर एज्युकेशन विभागाचे प्रमुख चंद्रशेखर ठाकूर यांनी आज येथे केले. ‘सीडीएसएल’ प्रस्तुत ‘ऑनलाइन व्यवहार आणि गुंतवणूक’ या विषयावर ते बोलत होते. गेल्या काही वर्षांत विविध कायदे झाले असून, ‘सेबी’ने व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्याला गुंतवणुकीची जोखीम कमी हवी असेल, अशांसाठी म्युच्युअल फंड हा उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यातही बाजाराल चढ-उतार लक्षात घेऊन एकरकमी गुंतवणूकीऐवजी मासिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. 

Web Title: nashik news YIN SUMMER YOUTH SUMMIT 17