नाशिक - कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे कुपोषित माता-बालकांचे होतेय पोषण 

food
food

नाशिक - शासकीय पातळीवर पुरविल्या जाणाऱ्या आहाराविषयी नेहमीच बोंबाबोंब केली जात असताना, नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील सकस आणि संतुलित आहारामुळे रुग्णांचेच भरण-पोषण होत नाही, तर प्रसुती विभागातील माता अन्‌ कुपोषित बालकांचे खऱ्यार्थाने 'पोषण' होते आहे. आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली प्रसुतीनंतर मातांना देण्यात येणाऱ्या आहारामुळे त्यांच्यातील रक्ताचे प्रमाण वाढते तर, कुपोषित बालकांचेही ठराविक मुदतीमध्ये किमान 15 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. 

जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल (ऍडमीट) रुग्णांसाठी सकाळ-सायंकाळ चहा, सकाळी नाश्‍ता, दोन वेळा जेवण असा मोफत सकस अन्‌ संतुलित आहार दिला जातो. रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञांकडून आहाराचा दर्जा सातत्याने तपासला जातो. शिवाय प्रसुती विभागातील माता अन्‌ नवजात बालकांसह कुपोषित बालकांसाठी विशेषत्वाने आहाराचे नियोजन करून त्याप्रमाणेच तो आहार पुरविला जातो. त्यामुळे प्रसुतीमुळे माताच्या शरीरात असलेली रक्ताची मात्रा वाढविण्यावर भर असतो. तर, कमी वजनांच्या बाळांसाठीही मातांना विशेष आहार दिला जातो. त्याचप्रमाणे, 6 महिन्यांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या कुपोषित बालकांची आरोग्य आणि भूकेची (सॅममॅम) तपासणी केली जाते. त्यानंतर आहारतज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांना विशेष आहारही पुरविला जातो. जर, कुपोषित बालकांची भूक मंदावली असेल तर, मुरमुऱ्याची पावडर, खोबरेल तेल, साखर, पाणी आणि गाईचे दूध यांचे सुयोग्य प्रमाण (एफ17) दिल्याने या मुलांची भूक वाढते. भूक वाढल्याने ठराविक दिवसात वजन वाढल्याचे चिन्हे दिसताच आहाराचे प्रमाण वाढवून कुपोषित बालकांमध्ये सदृढता आणण्याचे प्रमाण 15 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

रुग्णालयाच्या आहारकक्षातील (स्वयंपाककक्ष) 8 महिला अन्‌ 3 पुरुषांची यामागे मोठी मेहनत असून, कक्षाच्या स्वच्छतेसाठी प्राधान्य दिले जाते. दर तीन महिन्यांनी पेस्टकंट्रोल केले जात असतानाच, कक्षातील कर्मचाऱ्यांची दरमहा आरोग्य तपासणी होते. तसेच, बनविण्यात येणाऱ्या आहाराची जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेमध्ये सातत्याने तपासणी केली जाते. तर, पाणी आणि मीठ (आयोडिनयुक्त) यांचीही तपासणी होते. 

विशेषत्वाने आहार 
उपचारासाठी दाखल रुग्णांना मधुमेह तर कोणाला बिना मीठाचे अन्न असते. अशा रुग्णांनाही त्याप्रमाणे आहार बनवून दिला जातो. त्याचप्रमाणे, नेत्रकक्षाकडून होणाऱ्या शिबिरातील रुग्णांनाही आहारकक्षातूनच मोफत आहार पुरविला जातो. बाळंतणीच्या शरीरातील कॅलशियम, लोह व रक्ताचे प्रमाण टिकून राहावे वा त्यात वाढ व्हावी यासाठी दिवसाआड अंडी व गुळ-शेंगदाण्याचा लाडू दिला जातो. 

पालकमंत्र्यांकडून कौतूक 
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात रुग्णालयाची पाहणी करीत असताना पालकमंत्री गिरीश महाजन हे आहार कक्षासमोरून जात असता, तिकडे वळाले. तेथील स्वच्छता पाहून कौतूक तर केलेच. परंतु गरमागरम जेवण पाहून त्यांनी चव चाखण्यासाठी एक जेवणासाठी ताट मागविले. भरपेट जेवण केल्यानंतर त्यांनी स्वयंपाक कक्षातील साऱ्याच कर्मचाऱ्यांचे तोंडभरून कौतूक करताना, सिव्हिलला आल्यानंतर मला जेवायला देत जा असेही ते म्हणाले होते. मुख्य स्वयंपाकी श्रीमती कांबळे या आजही ही बाब अभिमानाने सांगतात. 

असे असते एका दिवसाचे नियोजन 
एका दिवसांचे रुग्ण : सरासरी 300 
आटा (गहू) : 65/70 किलो 
(एकावेळी 600 पोळ्या) 
तांदूळ (पांढरा भात) : 35 किलो 
तूरडाळ (वरणासाठी) : 16 किलो 
सुकी भाजी : 60 किलो 
(डांगर, बटाटा, कोबी, फ्लॉवर, दूधीभोपळा, टमाटा आदी) 
उसळ (नाश्‍तासाठी) : 9 किलो 
रवा (प्रसुती महिलांसाठी) : 10 किलो 
साखर : 16 किलो 
अंडी (प्रसुती महिला/अपघात कक्षातील रुग्ण) : दिवसाआठ 300 
शेंगदाणा-गुळ लाडू (प्रसुती कक्ष/अपघात कक्ष) : दिवसाआड 300 

रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहाराच्या दर्जात कोणतीही तडजोड नाही. बनविलेल्या आहाराची कधीही नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले जातात. प्रसुतीमाता अन्‌ कुपोषित बालकांच्या आहाराकडे विशेषत्वाने लक्ष दिले जाते. परिणामी, महिलांमध्ये हिमोग्लोबीनची वाढ अन्‌ बालकांच्या वजनात वाढ ही बाब सुखावणारी असते. 
- डॉ. सुप्रिया गोसावी, आहारातज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com