निम्म्या मुंबईला नाशिकहून पुरविला जातो भाजीपाला

विक्रांत मते
मंगळवार, 12 जुलै 2016

शासनाला अहवाल सादर करण्यासाठी घोटी टोलनाक्‍यावर 48 तास सर्वेक्षण केले. त्यात 2193.50 टन भाजीपाला व फळे मुंबईकडे रवाना झाल्याचे स्पष्ट झाले.
- निळकंठ कऱ्हे, जिल्हा उपनिबंधक

नाशिक - मुंबईला रोज साधारण साडेतीन हजार टन भाजीपाल्याची गरज भासते. त्यातील दोन हजार शंभर टन भाजीपाला एकट्या नाशिकमार्गे मुंबईत पोचवला जात असल्याचे सहकार विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. रोज तब्बल साडेतीनशे छोट्या-मोठ्या वाहनांतून भाजीपाला, फळे पुरविली जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. नाशिकच्या भाजीपाल्याला कल्याणपासून पुढे मध्य व दक्षिण मुंबईत प्रचंड मागणी असल्याचा हा परिणाम आहे.

शेतमाल बाजार समिती नियमनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाने सहकार विभागामार्फत नाशिकमधून किती शेतमाल मुंबईत विक्रीसाठी येतो, याबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 26 व 27 जूनला सलग 48 तास सहकार विभागाचे कर्मचारी घोटी टोलनाक्‍यावर तैनात होते. पहाटे चार ते सायंकाळी सातपर्यंत 61 छोट्या-मोठ्या गाड्या टोलनाक्‍यावरून रवाना झाल्या, तर सायंकाळी सात ते पहाटे चारपर्यंत भाजीपाल्याची तीनशे वाहने मुंबईकडे गेल्याची नोंद करण्यात आली. अठ्ठेचाळीस तासांच्या सरासरीत 2193.50 टन भाजीपाला रवाना झाल्याचे नमूद केले आहे. यात कंटेनरमधून रवाना झालेल्या भाजीपाल्याची नोंद घेतलेली नाही. मुंबईची भाजीपाला व फळांची एकूण गरज साडेतीन हजार टन आहे. नाशिकमार्गे जाणाऱ्या 2193.50 टन भाजीपाल्यापैकी 678.50 टन भाजीपाला मध्य प्रदेश व गुजरातमधून येतो. नाशिक व नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्‍यातून एकूण एक हजार 415 टन भाजीपाला मुंबईला जात असल्याचे दिसले.

मुंबईत जाणारा भाजीपाला (टनात)
कांदा- 849
वांगे- 13.50
सिमला मिरची- 22.50
पालेभाज्या- 469.50
फ्लॉवर- 59.50
(मध्य प्रदेश व राजस्थानमधून येणाऱ्या एकूण मालापैकी 360 टन बटाटा पोचवला जात असल्याची त्या दिवसाची नोंद आहे.)

दुष्काळामुळे मागणीत घट
गेल्या वर्षी दुष्काळ असल्याने मुंबईकडे पाठविल्या जाणाऱ्या भाजीपाल्यात मोठी घट झाली. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार रोज साडेनऊशे ट्रक, टेम्पो व छोटी वाहने शेतमाल घेऊन मुंबईकडे रवाना होतात. यंदा हे प्रमाण साडेतीनशेपर्यंत घसरले होते. मुख्यत्वे बटाटा, कांद्याची रवानगी अधिक झाली. 60 टक्के माल कमी प्रमाणात पोचल्याचे मालपुरवठादार शेतकऱ्यांनी सांगितले.

 

Web Title: Nashik provided Vegetables half Mumbai