पर्यटनासाठी दिल्लीकरांना नाशिकची भुरळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

नाशिकच्या  निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करत असून, त्यामुळे ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी आले आहे.

नाशिक - नाशिकच्या  निसर्गरम्य आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करत असून, त्यामुळे ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी आले आहे.

पर्यटनाच्या नकाशावरही नाशिक चमकू लागल्याचे गौरवोद्‌गार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी काढले. सर्वाधिक किल्ले असलेले नाशिक हे महाराष्ट्राचे भूषण आहे. किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी मदत करणार असल्याची ग्वाही खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली. रविवारी (ता. ७) रंगलेल्या दिमाखदार ‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ सोहळ्यात नाशिकमधील विविध क्षेत्रांतील दिग्गज व यशस्वी व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीने शोभा वाढली.

नाशिकच्या किल्ल्यांना सुरक्षा देणार - खा. संभाजीराजे भोसले
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर वसविले. किल्ले, राजवाडे, संस्कृती, स्वादिष्ट भोजन अशी वैशिष्ट्ये असलेले करवीरकर संपन्न आहेत. त्याचा अभिमान आहे. पण तरीही नाशिक सुंदर शहर असून, नाशिककरांबद्दल जिव्हाळा वाटतो. सर्वाधिक किल्ले नाशिकमध्ये असून, त्यांच्या सुरक्षेसाठी मदत करणार आहे, असे जाहीर करत नाशिकच्या पर्यटनासाठी हक्काचा खासदार आहे, अशी ग्वाही खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिली.

‘सकाळ एक्‍सलन्स ॲवॉर्ड’ सोहळ्यात श्री. भोसले म्हणाले, की सह्याद्री पर्वतरांगा, खानदेशचे कुलदैवत सप्तशृंगीदेवी, त्र्यंबकेश्‍वरचे ज्योतिर्लिंग अशी वैशिष्ट्ये लाभलेल्या नाशिकने आपली संस्कृती तयार केली आहे. आता राज्य सरकारच्या माध्यमातून नाशिकच्या किल्ल्यांच्या सुरक्षेची मोहीम राबविली जावी. केंद्राने ४० किल्ल्यांच्या सुरक्षेची योजना राबविण्यास सुरवात केली आहे. तसेच राज्य सरकारने किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी निधीची मागणी केली आहे. दहा किल्ल्यांसाठी निधी मिळणार आहे. त्यात रायगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, विदर्भातील दोन, सोलापूरचा एक आणि शिवनेरी अशा किल्ल्यांचा समावेश आहे. समाजाला दिशा देणारे वर्तमानपत्र म्हणून ‘सकाळ’ने ओळख निर्माण केली आहे अशा ‘सकाळ’तर्फे गौरव होत असल्याने सन्मानार्थींची जबाबदारी आणखी वाढणार आहे. समाजाप्रति देण्याची जबाबदारी संधी म्हणून पाहिली जावी, असेही श्री. भोसले यांनी सांगितले.

फार्महाउसमधील गुंतवणुकीकडे वाढता कल - जयकुमार रावल
नाशिकचा कांदा, द्राक्षे अन्‌ वाइन सर्वदूर नावलौकिकास पात्र ठरली. तसे इथला निसर्गरम्य परिसर आणि आल्हाददायक वातावरणाची भुरळ दिल्लीकरांना पडली आहे. विमानसेवेने एक-दीड तासाची नाशिक-दिल्ली ‘कनेक्‍टिव्हिटिही’ असल्याने दिल्लीकर नाशिकमधील फार्महाउसमध्ये गुंतवणूक करण्यास सरसावत आहेत. त्यांच्या ‘वीकेंड’ पसंतीमध्ये नाशिक अग्रस्थानी असल्याने पर्यटनाच्या नकाशावरही नाशिक चमकू लागले आहे, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.  

‘सकाळ एक्‍सलेन्स ॲवॉर्ड’च्या शाही सोहळ्यात रविवारी (ता. ७) श्री. रावल बोलत होते. ते म्हणाले, की दिल्लीमध्ये फार्महाउस सोडाच, ‘प्लॉट’ घेणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे दिल्लीचे उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, व्यापाऱ्यांना मुंबई-पुण्याऐवजी नाशिकची ओढ लागली आहे. सरकारी अधिकाऱ्यांची बदलीसाठी नाशिकची मागणी मोठ्या प्रमाणात असते. तशीच मागणी आता दिल्लीकर उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी करू लागले आहेत. विमानसेवेमुळे नाशिक- दिल्लीचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे वीकेंडसाठी त्यांची पहिली पसंती नाशिक असल्याचे जेव्हा खासगीत सांगतात, तेव्हा अभिमान वाटतो. समृद्धी एक्‍स्प्रेसमुळेही रस्ता वाहतुकीचे अंतर कमी होण्यास मदत होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Tourism Delhi People