नाशिकला विसर्गानंतर गोदावरीला पहिला पूर

Godavari-River
Godavari-River

मराठवाड्याकडे पाण्याची झेप
नाशिक - जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे येथील गंगापूर धरण भरल्यानंतर सोमवारी (ता. २९) दुपारपासून ‘गोदावरी’त ६,५१० क्‍युसेकने पाणी सोडायला सुरवात झाली. त्यामुळे यंदाच्या मोसमातील पहिल्या पुराने गोदावरी दुथडी वाहू लागली. 

गंगापूर धरण ८३ टक्के भरल्यानंतर विसर्ग सुरू झाला आहे. गंगापूर, दारणा आणि पालखेड अशा तिन्ही समूहांतून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने नद्यांना पूर आला आहे. दारणा समूहातून यापूर्वी विसर्ग सुरू आहे. सोमवारी १६,६८८ क्‍युसेकपर्यंत हा विसर्ग वाढविला गेला. दुपारी गंगापूर समूहातून ३,५०० व त्यानंतर ६,५१० क्‍युसेकने, तर नांदूर-मध्यमेश्‍वरमधून २९,९५९ हून ५४,८४५ क्‍युसेकपर्यंत विसर्ग वाढवत मराठवाड्याच्या दिशेने पाण्याचा प्रवास सुरू आहे. पालखेड समूहात अद्याप पाणी कमी असले, तरी तेथून ४,७०० क्‍युसेकने पाणी सोडायला सुरवात झाली आहे. गिरणा समूहात मात्र साठा कमीच आहे; मात्र तिन्ही समूहांत पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याने खालच्या भागाला पाणी सोडायला सुरवात झाली आहे. 

‘भावली’नंतर भरले ‘भाम’
पहाटे पाचला संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सर्व तालुक्‍यांत संततधार सुरू होती. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ व सुरगाण्याच्या पश्‍चिम तालुक्‍यांसह इतर भागांतही दिवसभरात सायंकाळी सहापर्यंत साधारण ३१९ मिलिमीटर पाऊस झाला. रात्रभर आणि सोमवारी दिवसभर चांगला पाऊस झाल्याने धरण ओसंडून वाहू लागले आहे. ‘भावली’पाठोपाठ ‘भाम’ धरणही धरले. हवामान विभागाने पावसाची संततधार पुढील दोन दिवस अशीच सुरू राहण्याचा अंदाज वर्तविला आहे.

‘जायकवाडी’च्या साठ्यात ४ टक्‍क्‍यांनी वाढ
पैठण - येथील जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. रविवारपासून (ता. २८) पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे चार टक्के पाणी वाढले आहे. 

धरणाची पाणीपातळी १४९०.८३ फूट असून मीटरमध्ये   ४५४.४०६ आहे. पाणी येण्याचे प्रमाण २१ हजार ९२१ क्‍युसेक आहे. तसेच उपलब्ध पाणीसाठा १५०.०३० दशलक्ष घनमीटर (उणे), तर  एकूण पाणीसाठा ५८७.५७६ दशलक्ष घनमीटर (उणे) आहे. दरम्यान, नांदूर-मधमेश्वर धरणातून पाणी येण्याचे प्रमाण सोमवारी कमी झाले असले तरी रात्रीतून त्यात वाढ होणार आहे, असे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले. 

धरणात दाखल झालेल्या पाण्याचे मंगळवारी (ता. ३०) पूजन जलसंपदा विभाग करणार आहे, अशी माहिती धरण सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी दिली. जलपूजनासाठी नेत्यांची चढाओढ पाहायला मिळत असे. परंतु यंदा या नेत्यांची मोठी अडचण औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या लागलेल्या आचारसंहितेमुळे झाली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे अभियंता व तालुका प्रशासनाचे अधिकारी हा कार्यक्रम करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com