नाशिकमध्ये खुल्या जागेमुळे रंगणार "मनी पॉवर गेम' 

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 20 November 2019

जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यांपैकी खासदार डॉ. भारती पवार, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीच्या, तर माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने सभागृहातील सदस्यांची संख्या 69 झाली आहे. अध्यक्षपदाच्या सत्तेसाठी 35 सदस्यांचे समर्थन आवश्‍यक असेल. सद्यःस्थितीत तेवढी संख्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे नसल्याने आघाडी, युतीच्या समीकरणांना वेग येणार आहे.

नाशिक :  जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडतीमध्ये मंगळवारी (ता. 19) सर्वसाधारण असल्याचे स्पष्ट झाल्याने आगामी निवडणुकीत "मनी पॉवर गेम' रंगणार आहे. यापूर्वीच्या सत्ताकारणात राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस-भाजप अशा निराळ्या आघाड्यांचे दर्शन जिल्हावासीयांना घडले. आता मात्र श्री. भुजबळ काय भूमिका बजावतात, याकडे लक्ष लागले आहे. 

भुजबळांच्या भूमिकेकडे लक्ष; शिवसेनेकडून क्षीरसागर, दराडे, बोरसे, गावित, सांगळेंची नावे चर्चेत 

जिल्हा परिषदेच्या 73 सदस्यांपैकी खासदार डॉ. भारती पवार, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर यांनी राष्ट्रवादीच्या, तर माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने सभागृहातील सदस्यांची संख्या 69 झाली आहे. अध्यक्षपदाच्या सत्तेसाठी 35 सदस्यांचे समर्थन आवश्‍यक असेल. सद्यःस्थितीत तेवढी संख्या कुठल्याही राजकीय पक्षाकडे नसल्याने आघाडी, युतीच्या समीकरणांना वेग येणार आहे. राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रपती राजवटीच्या काळात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या महाशिवआघाडीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समेट होण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येण्यातून इतर पक्षांसह अपक्षांना फारसे महत्त्व राहणार नाही, असे दिसते. शिवसेनेकडून अध्यक्षपदासाठी बाळासाहेब क्षीरसगार, सुरेखा दराडे, रमेश बोरसे, भास्कर गावित यांची नावे चर्चेत आली असून, विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या समर्थकांकडून अध्यक्षपदासाठी पुन्हा लॉबिंग सुरू होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अपक्ष असूनही शिवसेनेशी जवळीक असलेले शंकरराव धनवटे यांच्या समर्थकांकडून अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू होईल. 
 
धक्कातंत्र अन्‌ सामाजिक समीकरणे 
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी-पेठ मतदारसंघातून उमेदवार बदलण्याचे धक्कातंत्र अवलंबण्यात आले होते. त्यामुळे आताही जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी त्याची पुनरावृत्ती होणार काय, यास महत्त्व प्राप्त झाले आहे. सामाजिक समीकरणांचा विचार शिवसेनेकडून होणार काय, याचे उत्तर उमेदवारीतून मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मागील सभापतिपदाच्या निवडणुकीत माजी आमदार रामदास चारोस्कर यांच्यासह तीन सदस्यांनी कॉंग्रेसमधून वेगळा गट स्थापन केला. श्री. चारोस्कर आता शिवसेनेत आहेत. याशिवाय उपाध्यक्षा नयना गावित यांच्या आई माजी आमदार निर्मला गावित यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याद्वारे शिवसेनेचे बलाबल चारने वाढणार काय? सिन्नरचे आमदार ऍड. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सीमंतिनी यांनी भाजपकडून निवडणूक जिंकली असली, तरीही त्यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे बलाबल एकने वाढणार काय, याची उत्तरे प्रत्यक्ष निवडणुकीतून मिळणार आहेत. शिवसेना-राष्ट्रवादीच्या समीकरणांमध्ये उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या नऊ सदस्यांची नावे चर्चेत असतील. त्यात सभापती यतीन पगार यांच्यासह गणेश अहिरे, यशवंतराव शिरसाठ, डॉ. सयाजीराव गायकवाड, संजय बनकर, महेंद्रकुमार काले, किरण थोरे, यशवंत ढिकले, उदय जाधव आदींचा समावेश असेल. 
 
जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल 
शिवसेना : 24 
राष्ट्रवादी कॉंग्रेस : 16 
भारतीय जनता पक्ष : 15 
कॉंग्रेस : 8 
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष : 3 
अपक्ष : 3 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik Zilla Parishad Political News Marathi News