esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

11-year-old boy who went to wash a truck in a river basin was carried away

नाशिक : बापाच्या डोळ्यादेखत लेक गेला नदीपात्रात वाहून

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : बाप व चुलत्यासमवेत ट्रक धुण्यासाठी नदीपात्रात गेलेला ११ वर्षीय चिमुकला बाप व चुलत्याच्या डोळ्यादेखत नदीपात्रात वाहून गेला. गिरणा नदीला पूर पाण्याचा जोर मोठा असल्याने दोन्ही मुलाला वाचविण्यात अपयशी ठरले.

गुरुवारी (ता. ३०) सायंकाळी शहराजवळील टेहरे शिवारातील गिरणा नदीपात्रातील भगवान वीर एकलव्य दंडनायक पुलाजवळ ही दुर्घटना घडली. सौरभ अविनाश बच्छाव (वय ११) असे मृत मुलाचे नाव आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तब्बल १३ तास शोध मोहीम राबवूनही या मुलाचा मृतदेह मिळून आला नाही. मोहीम अपयशी ठरल्याने कुटुंबीयांसह अग्निशमन दलाचे जवानही खिन्न झाले.

गिरणा नदीला पूर आल्याने एकलव्य पुलाखाली असलेल्या फरशी पुलावर टेहरे-साेयगाव शिवारातील अनेक जण नदीकाठावर वाहने, धुणे व गोधड्या धुण्यासाठी मोठी गर्दी करतात. अविनाश बच्छाव (रा. टेहरे) मुलगा सौरभ व भावासह नदीकाठावर ट्रक धुण्यासाठी गेले. ट्रक धूत असतानाच दोघांच्या डोळ्यादेखत सौरभ पाय घसरून पडल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊ लागला. चुलत्याला पोहता येत नसताना त्यांनी नदीत उडी मारली. पाठोपाठ बापानेही उडी मारली. बच्छाव यांनी भावाला पोहण्यास प्रतिबंध करत काठावर नेले. मात्र, पूर पाण्याचा जाेर असल्याने मुलाला वाचविण्यात ते अपयशी ठरले. सौरभच्या घरी शोकाकुल वातावरण आहे.

हेही वाचा: भुजबळांच्या नावाने सुनील झंवरच्या मुलास फोन; फसवणूकीचा गुन्हा दाखल


या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य अरुण पाटील यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती कळविली. अग्निशमन दलाच्या आठ ते दहा जवानांनी गुरुवारी सायंकाळी एक तास व शुक्रवारी सकाळी साडेसहा ते सायंकाळी साडेसहा अशी एकूण १३ तास नदीपात्रात सौरभचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहीम अपयशी ठरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रारंभी टेहरे पूल ते गिरणा केटीवेअर नंतर गिरणा केटीवेअर पूल ते मडकी महादेव यादरम्यान सुमारे सहा किलोमीटर अंतरात नदीपात्रात शोध घेतला. तथापि, सौरभचा मृतदेह हाती लागला नाही, असे अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी ‘सकाळ’ला सांगितले. मनपा अग्निशमन दल व पोलिसांनी दुर्घटनेची नोंद केली आहे.

हेही वाचा: मुक्त विद्यापीठात प्रवेशासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

loading image
go to top