11th Admission Process : अकरावी प्रवेशाची पहिली यादी 19 ला; अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रकिया या तारखेपासून | 11th admission first list on 19th june nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

11th admissions process

11th Admission Process : अकरावी प्रवेशाची पहिली यादी 19 ला; अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रकिया या तारखेपासून

11th Admission Process : इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून, अकरावीच्‍या प्रवेश प्रक्रियेला वेग आलेला आहे.

शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेशाकरिता पहिल्‍या फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरु होणार आहे. तर पहिली निवड यादी १९ जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे. (11th admission first list on 19th june nashik news)

नाशिक महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. त्‍यानुसार विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरण्यास सांगितलेले होते.

दरम्‍यान निकाल जाहीर झाल्‍यानंतर पहिल्‍या प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे. महाविद्यालय, शाखा यांचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी आवश्‍यक असलेला अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया ८ जूनपासून सुरु होणार आहे.

दरम्‍यान सध्या जारी वेळापत्रकात काहीसे संभ्रम निर्माण झालेले आहे. पहिल्‍या रकान्यात अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत १२ जून दर्शविलेली असताना, तिसऱ्या रकान्यात मात्र १५ जूनच्‍या रात्री दहापर्यंत मुदत दर्शविलेली आहे.

दरम्‍यान, शनिवारी (ता.३) सायंकाळी आठपर्यंत सहा हजार ५३७ विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले होते. अर्जाचा भाग एक पडताळणी करून घेतलेल्‍या विद्यार्थ्यांनाच केवळ अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. अर्जाच्‍या भाग दोनमध्ये किमान एक तर कमाल दहा महाविद्यालये पसंतीक्रमानुसार नोंदविता येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असे आहे प्रवेशाचे वेळापत्रक...

कॅप राउंडसाठी अर्जाचा भाग दोन भरण्याची मुदत ८ ते १२ जूनपर्यंत दिलेली आहे. दरम्‍यान अर्जाचा भाग १ भरलेल्‍या विद्यार्थ्यांची तात्‍पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार असून, यासंदर्भात हरकती नोंदविण्यासाठी १३ ते १५ जूनदरम्‍यान मुदत असेल.

याच दिवशी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १६ ते १८ जून हा कालावधी डेटा विश्‍लेषणासाठी राखीव ठेवलेला आहे. तर १९ जूनला पहिल्‍या फेरीसाठीची निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी २२ जूनपर्यंत संधी उपलब्‍ध करून दिली जाईल.

पुढील फेऱ्यांचे नियोजन असे

सध्याच्‍या संभाव्‍य वेळापत्रकानुसार दुसरी नियमित फेरी २३ ते ३० जूनदरम्‍यान, तिसरी नियमित फेरी १ ते ९ जुलै या कालावधीत राबविली जाईल. तर चौथी विशेष प्रवेश फेरी १० ते १८ जुलै या कालावधीत राबविण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केलेले आहे.