esakal | रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच; नऊ तासांनी केलं रेस्क्यू
sakal

बोलून बातमी शोधा

tourists reskued

रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : बडादेा (गुजरात) येथील पर्यटक रात्रभर कळसूबाई शिखराच्या पश्चिमेच्या भावली धरणाजवळील कुलंग किल्ल्यावर अडकून पडले होते. पहाटे चार ते दुपारी एकपर्यंत चाललेल्या मोहिमेनंतर सगळ्यांना खाली उतरविण्यात यश आले. सोमवारी (ता. ३०) सायंकाळी १३ जण किल्ल्यावर रस्ता चुकले होते.


कळसूबाई शिखराच्या पश्चिमेला समुद्र सपाटीपासून एक हजार ४७० मीटरवरील कुलंग किल्ल्यावर साधारण साडेसातशे मीटरवर बडोदा येथील १३ पर्यटक रस्ता चुकले. त्यात आठ पुरुष, दोन महिला आणि तीन मुलींचा समावेश होता. रात्री किल्ल्यावरच मुक्काम करण्याचा बेत आखत पर्यटकांनी दुपारी तीनला किल्ला चढण्यास सुरवात केली. मात्र, रात्री किल्ल्यावर ते रस्ता भरकटले. त्यातील नीता मिश्रा यांच्या मोबाईलला नेटवर्क मिळाल्याने त्यांनी गुजरातला नातेवाइकांशी संपर्क साधून माहिती दिली. नंतर गुजरात येथून त्यांच्या नातेवाइकांनी मध्यरात्री गुगलवर माहिती शोधून नाशिकचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अर्जुन कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला. कुऱ्हाडे यांनी त्यांना धीर देत चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकप्रमुखांशी संपर्क साधून रेस्‍क्यूची तयारी केली. पहाटे चारला पथक किल्ल्याच्या पायथ्याशी पोचले. फसलेल्या पर्यटकांना ठिकाणाची माहिती व्यवस्थित देता येत नसल्याने दोन पथके तयार करण्यात आली. पर्यटकांपैकी एकाचाच मोबाईल सुरू ठेवून इतरांच्या मोबाईलच्या बॅटऱ्या वाचविण्याचा सल्ला देत दोन्ही पथक वेगवेगळ्या भागातून किल्ल्यावर चढले. सकाळी नऊला त्यांना फसलेले पर्यटक एका खडकावर असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांच्याकडील सामान व सगळ्यांना सुरक्षित खाली आणताना दुपारी एक वाजला. तब्बल नऊ तासांच्या मोहिमेनंतर आकाश कसोरे, विजय सोलंकी, माधवी वामतोरे, प्रभूदस्त प्रसाद, ग्लिम्स रॉयल, ग्लोरियस रॉयल, स्टेलोंन क्रिस्टी, नीता मिश्रा, न्यास मिश्रा, चिलसी परमार, रेक्स मास्टर, प्रमोद अँडरसन, जोशीन देवेन यांना सुखरूप किल्ल्याखाली आणण्यात यश आले. त्यानंतर सगळ्यांना घोटी पोलिस ठाण्यात नेण्यात आले. विनापरवानगी पर्यटनाबद्दल त्यांना दंड करण्यात आला.

हेही वाचा: जर्मनीतील स्पर्धेत सहा नाशिककर ठरले ‘आयर्नमॅन’मध्यरात्री अडीचच्या सुमारास गुजरात राज्यातून फोन आल्यापासून सोमवारी दुपारी एकपर्यंत अविरत मोहीम चालली. पर्यटक रस्ता भरकटले होते. ते जेथे अडकले होते. तेथील माहिती त्यांना सांगता येत नसल्याने आधी दुसऱ्याच किल्ल्यावर एका पथकाला जावे लागले. मात्र, अखेर ही मोहीम यशस्वी झाली. सगळ्यांनी नाशिकच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आभार मानले.
-अर्जुन कुऱ्हाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

मध्यरात्री फोन आल्यानंतर चांदोरी येथून किरण वाघ, बाळू आंबेकर, वैभव जमदाडे, आकाश गायखे, फकिरा धुळे, शरद वायखंडे, विलास गडाख, विलास गांगुर्डे, सुरेश शेटे आदी सहकाऱ्यांचे पथक पहाटे चारपर्यंत किल्ल्याच्या पायथ्याशी पोचले. सकाळी नऊला पर्यटक सापडल्यानंतर दुपारी एकपर्यंत त्यांना खाली आणले.
-सागर गडाख, प्रमुख, आपत्ती व्यवस्थापन पथक, चांदोरी

हेही वाचा: नाशिक : भाजप कार्यालय तोडफोड प्रकरणी अखेर शिवसैनिकांना जामीन

loading image
go to top