अबब! पिंपळगाव मोर येथे अडीच वर्षात नेमले 18 ग्रामसेवक! : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ZP Nashik latest marathi news

Nashik News : अबब! पिंपळगाव मोर येथे अडीच वर्षात नेमले 18 ग्रामसेवक!

नाशिक : जिल्हयात एखाद्या गावाला ग्रामसेवक मिळत नाही परंतु, पिंपळगाव मोर (ता. इगतपुरी) गावाला अडीच वर्षात तब्बल १८ ग्रामसेवक मिळाले आहेत. मात्र हा केवळ पदभार असून कुणीही दोन -तीन महिने पूर्ण करत नसल्याने गावाचा विकास रखडला आहे.

आजमितीस ग्रामपंचायतीच्या खात्यात वित्त आयोगाचे सुमारे दीड कोटी रुपये पडून असूनही गटविकास अधिकारी मात्र या प्रश्‍नाकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याने गतिमान प्रशासनाच्या घोषणेला येथे ब्रेक लागला आहे.

विशेष म्हणजे ग्रामसेवक नसल्याने गावातील राजकीय वजनदार व्यक्तीकडे ग्रामसेवकाकडे असलेल्या महत्त्वाच्या की राहिल्या आहेत. प्रशासनाच्या गलथानपणामुळे हा सारा खेळखंडोबा होऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. (18 Gram Sevak appointed in Pimpalgaon Mor in two half years Development stalled due to neglect of administration Nashik News)

पिंपळगाव मोरेचे ग्रामसेवक आॅगस्ट 2022 मध्ये पदमुक्त झाल्यापासून आतापर्यंत १८ ग्रामसेवकांकडे पदभार देण्याचा विक्रम जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत व इगतपुरी तालुका पंचायत समितीने केला आहे.

यातील प्रत्येक ग्रामसेवकांनी विविध कारणांनी पदभार सोडत पळ काढला, मात्र तो गटविकास अधिकाऱ्यांनी मान्य केलाच कसा हा प्रश्‍न आहे. ग्रामसेवकांच्या या खो-खोमध्ये गावात १४ व १५ व्या वित्त आयोगाची सुमारे दीड कोटींची कामे रखडली आहेत. निधी पडून आहे.

पिंपळगाव मोर हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गावे. ग्रामसेवक निकम रजेवर गेल्यानंतर भरवीर येथील ग्रामविस्तार अधिकारी संतोष जाधव यांच्याकडे २६ ऑगस्ट २०२० ला अतिरिक्त पदभार दिला.

त्यानंतरही आलेल्यांनी तोच कित्ता गिरविला, पण गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांना परवानगी दिलीच कशी? प्रत्येक ग्रामसेवकाने थोडे दिवस आदेशाचे पालन करून वेगवेगळी कारणे देत काढता पाय घेतला, त्यांना रोखण्यात का आले नाही? काहींनी तर पदभार स्वीकारण्यापूर्वीच रजेवर जाणे पसंत केले.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

काही रुजू होताच रजेवर गेले, त्यामुळे आतापर्यंत १८ ग्रामसेवकांकडे अतिरिक्त पदभार सोपविण्याचा विक्रम करण्यात आला आहे.

गावातील अंतर्गत राजकीय कलहाला बळी पडून गटविकास अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सातत्याने प्रभारी ग्रामसेवकांकडील पदभार काढण्याची भूमिका घेतली असे सांगितले जात आहे. कोणत्याही ग्रामसेवकांच्या कारकिर्दीत वित्त आयोगाच्या दीड कोटींच्या निधीचे नियोजन होऊ शकले नाही व ती कामे मार्गी लागू शकली नाहीत. यामुळे तो निधी दीड वर्षांपासून पडून आहे.

"मध्यतंरी रत्नागिरी येथून आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ग्रामसेवकाला पिंपळगाव मोर ग्रामपंचायतीत नियुक्ती देण्यात आली होती. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेने त्यांना अद्याप कार्यमुक्त केलेले नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार केला असून साधारणपणे एप्रिलमध्ये पिंपळगाव मोरला ग्रामसेवक नियुक्त होतील."

- रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

टॅग्स :NashikGram Sevak