
Nashik News : RBI कडून फैज बॅंकेवर निर्बंध; रक्कम काढून घेण्यासाठी बँकेत मोठी गर्दी
जुने नाशिक : रिझर्व्ह बॅंक आॅफ इंडियाने येथील फैज मर्कंटाईल बँकेची परिस्थिती लक्षात घेता बँकेवर आर्थिक निर्बंध लादले असून खातेदारांना केवळ दोन हजार रुपये देण्याची अनुमती बँकेस देण्यात आली आहे.
बॅंकेवर निर्बंध लादल्याचे समजल्यानंतर खातेदारांनी बँकेतून आपापली रक्कम काढून घेण्यासाठी बँकेत मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. भद्रकाली पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला असला तरी खातेदारांमध्ये मात्र प्रचंड भीती निर्माण झाली आहे. (Restrictions on Faiz Bank by RBI Huge crowd in bank to withdraw amount Nashik News)
फैज बँकेस आरबीआयकडून निर्बंध लादण्यात आल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले, त्यानुसार शनिवारी (ता.४) विविध अफवांचे पेव फुटले. खातेदारांनी बँकेतील आपापली रक्कम काढून घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.
त्यांना रक्कम मिळत नसल्याने खातेदार आणि बँकेचे अधिकारी कर्मचारीसह यांच्यात वाद होऊन प्रचंड तणाव निर्माण झाला. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार यांनी बँक अधिकारी पदाधिकारी आणि नागरिकांशी चर्चा करत धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव तर दूर झाला.
रिझर्व्ह बॅंकेकडून ३१ मार्चपर्यंत दीड कोटीच्या ठेवी ठेवण्याचे आदेशित केले आहे. तसे झाल्यास लवकरच निर्बंध उठण्याची शक्यता आहे. निर्बंध न उठल्यास आपले पैसे बुडून तर जाणार नाही ना अशी भीती खातेदारांनी व्यक्त केली.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
दुसरीकडे बँकेची परिस्थिती उत्तम असल्याचे बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बँकेकडे दोन कोटी नऊ लाख रोख रक्कम असून ४ कोटी ८७ लाखाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी अर्थात शासकीय सुरक्षा ठेव आहे.
असे सुमारे सात कोटी तसेच बँकेत प्राप्त व्याज अशी एकूण दहा कोटीची ठेव बँकेकडे आहे. सात कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे अशी एकूण सुमारे १६ कोटी ९५ लाख ठेवी बँकेचे असल्याचेही सांगण्यात आले.
"बँकेची परिस्थिती उत्तम आहे, खातेदारांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कुठल्याही अफवांना बळी पडू नये. पाच लाखापर्यंत ठेवी असलेल्यांना तीन महिन्याच्या आत त्यांची रक्कम पूर्णपणे मिळणार आहे." - सलीम मिर्झा, अध्यक्ष, फैज मर्केटाईल बँक.